राष्ट्रीय क्षयरोग संस्था (स्थापना –१९५९ )

भारतीय आयुर्विज्ञान संस्था परिषदेने १९५५ ते ५८ पर्यंत केलेल्या पाहणीनुसार पूर्ण देशभर फुफ्फुसाच्या क्षयाचे प्रमाण वाढत आहे असे आढळून आल्याने १९५९ साली भारतीय शासनाने ‘राष्ट्रीय क्षयरोग संस्था’ स्थापन करण्याचे आयोजित केले आणि तेथे सर्व प्रकारच्या क्षयावर काम चालते. म्हैसूरच्या महाराजांनी या संस्थेसाठी जागा उपलब्ध करून दिली, तर जागतिक आरोग्य संघटनेने तांत्रिक साहाय्य व युनिसेफने उपकरणे मिळवून दिली.

स्थापनेनंतर ही संस्था क्षयरोगावरील संशोधन आणि क्षयरोग निर्मूलन व उपचार यामध्ये सक्रिय भाग घेत आहे. क्षयरोग हा अत्यंत चिवट रोग असल्याने त्यासाठी चिकित्साविषयक, साथरोगशास्त्रीय व सामाजिक पैलूवर प्रयोग करण्यात आले. त्यामध्ये देशभरातील वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय सहायक व्यक्तीना प्रशिक्षित करणे, जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार क्षयरोग उपचार कार्यक्रम ठरवणे यावर भर दिला गेला. क्षयरोगाच्या उपचारासाठी विशेष निर्माण केलेल्या डॉटस् [Directly Observed Treatment Short-Course (DOTS)] उपचार पद्धतीत आठवड्यात एक दिवसाआड असे तीन वेळा वैद्यकीय अधिकाऱ्याच्या उपस्थितीत रुग्णाला औषधे खाण्यास दिली जातात.

राष्ट्रीय क्षयरोग संस्थेने केलेल्या संशोधनामुळे संपूर्ण देशात लागू होऊ शकेल, अशी क्षयरोग नियंत्रण प्रणाली विकसित झाली. प्रत्येक जिल्ह्यासाठी क्षयरोग केंद्रात हे कार्यक्रम नीट राबवण्यासाठी संस्थेतर्फे व्यक्तींना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार  प्रशिक्षण दिले जाते. राष्ट्रीय स्तरावर विकसित झालेल्या प्रणालीचे यश पाहून इतर देशांनीही हा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली.

राष्ट्रीय क्षयरोग संस्थेची मुख्य उद्दिष्ट्ये :

  • सध्या (२०२०) असलेले क्षयरोग्यांचे प्रतिलाख लोकसंख्येतील चारचे प्रमाण घटवून एकपर्यंत आणणे.
  • थुंकी परिक्षणातून नव्याने सापडलेल्या व नियमित रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उपचार करणे.
  • ज्या जुनाट रुग्णांमध्ये औषधे लागू पडत नाहीत अशा रुग्णांवर लक्ष ठेवणे.
  • खाजगी रुग्णालयातून मिळणाऱ्या क्षयावरील उपचारातील परिणामकारकता वाढवणे.
  • एचआयव्हीग्रस्त रुग्णांना क्षयाचा संसर्ग अधिक प्रमाणात होत अशा रूग्णांमधील क्षयामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे.

संस्थेअंतर्गत सन १९६२ पासून देशात राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाने सन १९९३ पासून काही निवडक ठिकाणी पथदर्शक तत्त्वांवर प्रत्यक्ष निरीक्षणाखाली अल्पमुदतीच्या सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात केली. पथदर्शी प्रकल्पाच्या उत्साहवर्धक कामगिरीवरून सन १९९८ पासून केंद्र शासनाने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा प्रसार करण्याचे ठरविले आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम देशभर राबवण्यात येतात.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा