हिलमन, मॉरीस राल्फ : ( ३० ऑगस्ट, १९१९ – ११ एप्रिल, २००५ )

मॉरिस राल्फ हिलमन यांचा जन्म माइल्स सिटी मॉन्टाना येथे झाला. त्यांचे बालपण फार्ममध्ये काम करण्यात गेले. त्यांच्या यशाचे श्रेय ते कोंबडीच्या फलित अंड्याना देतात. कारण विषाणू वाढीसाठी कोंबडीची अंडी हे उत्तम माध्यम आहे. आर्थिक चणचणीमुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेणे अशक्य होते. अशा वेळी त्यांच्या मोठ्या भावाने केलेली मध्यस्थी, कुटुंबियांचा पाठिंबा व स्कॉलरशिपच्या मदतीने मॉन्टॅना स्टेट युनिव्हर्सिटीतून त्यांनी पदवी मिळवली. शिकागो युनिव्हर्सिटीत मिळालेल्या फेलोशिपमुळे त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्रात पीएच.डी. मिळवली. क्लॅमिडिया संसर्गावर त्यांनी या संशोधनासाठी काम केले. विषाणूऐवजी क्लॅमिडिया ट्रॅकोमॅटिस या फक्त पेशीमध्ये वाढणार्‍या जीवाणूंमुळे संसर्ग होतो हे त्यांनी प्रयोगातून सिद्ध केले.

आज लहान मुलांना दिल्या जाणार्‍या दिल्या जाणाऱ्या चौदा लसींपैकी आठ लसी हिलमन ह्यांनी शोधून काढलेल्या आहेत. अमेरिकन संरक्षण विभागाच्या वॉल्टर रीड मेडिकल रिसर्च केंद्रात त्यांनी श्वसनविकारांवर काम केले. मर्क आणि कंपनीच्या लस संशोधन केंद्राचे पंचेचाळीस वर्षे ते प्रमुख होते. या काळात त्यांनी जपानी मेंदूज्वर (Encephalitis), गालगुंड, साधा गोवर, जर्मन गोवर ( रुबे (कांजिण्या, मस्तिष्क पटल दाह, फुफ्फुसशोथ, यकृतशोथबी) Hepatitis B), ह्या रोगांवरील लसी शोधून काढल्या. इन्फ़्लुएन्झाच्या लसीच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनाची पद्धत त्यांनी विकसित केली. संपूर्ण जगात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या MMR (Measles, Mumps, & Rubella) Vaccine चा शोधही हिलमन ह्यांनीच लावला.

मॉरीस हिलमन ह्यांच्या संशोधनामुळेच यकृतशोथए (Hepatitis A) विकार निर्माण करणारा विषाणू व सिमिअन (माकडांतील) विषाणू SV40 हे सापडले. विषाणू संसर्गाने पेशी मृत होतात पण मरण्यापूर्वी अशा पेशीइंटर फेरॉननावाची खुणेची प्रथिने स्त्रवतात. या खुणेच्या प्रथिनामुळे इतर पेशींना विषाणूंच्या आस्तित्वाच्या हल्ल्याची सूचना मिळते. मॉरीस हिलमन यांच्यामुळे इंटरफेरॉन शुद्ध स्वरूपात वेगळे करता येऊ लागले. त्यामानाने कमी वापरात असणाऱ्या लसींची गणना केली तर एकूण चाळीसपेक्षा जास्त लसी ह्या एकट्या संशोधकाने शोधल्या आहेत.

मानवी श्वसनविकारांवरील ज्ञानाचा वापर करून मॉरीस हिलमननी कोंबड्यांच्या महामारीवर म्हणजे रानीखेत रोगावर(Marek’s disease) त्यांनी स्वतः  विकसित केलेली लस शोधून काढल्यामुळे लक्षावधी पक्षी वाचू लागले.

पेन्सिल्व्हानियामधील फिलाडेल्फिया येथे कर्करोगाने त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा