ब्लॅकवेल, डेव्हिड : (२४ एप्रिल, १९१९ – ८ जुलै, २०१०)
इलिनॉयमधील सेन्ट्रॅलिया नांवाच्या छोट्या नगरात, अफ्रिकन दांपत्यापोटी ब्लॅकवेल जन्मले. जरी त्या काळी कृष्णवर्णीयांनी कृष्णवर्णीयांसाठीच्याच शाळेत शिकावे असा संकेत होता, तरी त्यांचे शालेय शिक्षण मिश्रवर्णिय विद्यार्थ्यांच्या शाळेत झाले. वयाच्या सोळाव्या वर्षी, त्यांनी अर्बाना शाम्पेनस्थित युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉयमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी पीएच.डी. मिळविली. लगेचच त्यांना न्यू जर्सीतल्या प्रिन्सटनमधील इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्सड् स्टडी या उच्च दर्जाच्या संशोधन संस्थेत, एक वर्षाची पाठ्यवृत्ती मिळाली.
बार्तो रूज येथील (Baton Rouge) सदर्न युनिव्हर्सिटीत त्यांना हंगामी नियुक्ती मिळाली. बर्कलेच्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील संख्याशास्त्रज्ञ जर्झी नेमन (Jerzy Neyman) यांनी त्यांची भेट घेतली तेव्हा ब्लॅकवेल यांच्या ज्ञानाने ते खूपच प्रभावित झाले. यामुळेच नेमननी ब्लॅकवेल यांना त्यांच्या विद्यापीठात येण्यासाठी गळ घातली. परंतु त्या काळातील वर्णाधारित विरोधामुळे ती नियुक्ती होऊ शकली नव्हती. त्यानंतर अटलांटातील क्लार्क महाविद्यालयात त्यांची व्याख्याता म्हणून नेमणूक झाली. १९४४ साली ते होवार्ड (Howard) विद्यापीठात रुजू झाले आणि तीन वर्षांतच प्राध्यापक आणि गणित विभागप्रमुख झाले. ते तिथे १९५४ पर्यंत कार्यरत राहिले.
ब्लॅकवेल १९५४ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियात निमंत्रित प्राध्यापक म्हणून रुजू झाले. वर्षभरातच विद्यापीठाने त्यांना नव्याने स्थापित संख्याशास्त्र विभागात पूर्णवेळाचे प्राध्यापकपद दिले. आणखी वर्षभरात त्यांना संख्याशास्त्र विभागाचे अध्यासन देण्यात आले. इथे १९८८ मधील निवृत्तीनंतरही ते प्रोफेसर एमेरिटस म्हणून कार्यरत राहिले.
येथेच ॲबे गिर्शिक (Abe Girshick) यांच्याबरोबर त्यांनी संख्याशास्त्रात बरीच वर्षे एकत्रितपणे काम केले. दरम्यानच्या रँड (RAND) कॉर्पोरेशनशी संबंध आल्यामुळे त्यांना खेळशास्त्रातही (Game Theory) रस निर्माण झाला. हातात भरलेले पिस्तूल असलेले दोन लढवय्ये जेव्हा एकमेकांवर चाल करून जातात, तेव्हा किती वेळात कोण कुणावर प्रथम गोळीबार करेल ? अशा स्वरूपाचे प्रश्न त्यांनी तपासले होते. या समस्या शीत युद्धाच्या त्या काळातील दोन राष्ट्रांतील संघर्षाशी जुळणाऱ्या होत्या. अशा समस्यांवर संशोधन करता करता ब्लॅकवेल या क्षेत्रातील अग्रेसर तज्ज्ञ बनले. गिर्शिक यांच्यासह त्यांनी थिअरी ऑफ गेम्स अँड स्टॅटिस्टिकल डिसिजन्स (‘Theory of Games and Statistical decisions’) हे पुस्तक लिहिले. त्यानंतर बेसिक स्टॅटिस्टिक्स (‘Basic Statistics’) हे बेजियन (Bayesian) विचारसरणीवरील पहिले पाठ्यपुस्तकही ब्लॅकवेल यांनी लिहिले.
दरम्यान मॅथेमॅटिकल असोसिएशन ऑफ अमेरिका या संस्थेने त्यांची निवड पदवीपूर्व महाविद्यालयांतील गणित शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी केली होती. त्या संदर्भात त्यांनी दक्षिण अमेरिकेतील तीस महाविद्यालयांतून (ज्यांपैकी अधिक कृष्णवर्णियांसाठी होती) एकूण १२० व्याख्याने दिली. अफ्रिकेतील शैक्षणिक विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाने आयोजित केलेल्या परिषदेत ते सहभागी झाले होते. अभावग्रस्त विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विद्यापीठात खास कार्यक्रम राबविले होते.
स्वैरपणे बदलणारे वाहक (एव्हीसी) हे सांकेतिकीकरण सिद्धांतात वापरले जाणारे संप्रेषणासाठीचे प्रतिमान प्रथम ब्लॅकवेल, ब्रेमन (Breiman) आणि थॉमसियन (Thomasian) यांनी सादर केले. या विशिष्ट वाहकाकडे अशी अज्ञात प्रचले आहेत की जी कालांतराने बदलू शकतात. मात्र सांकेतिक शब्दाच्या संप्रेषणादरम्यानच्या प्रचलांतील बदलांमध्ये एकसमान आकृतिबंध नसतो. अशा गुणधर्मामुळे शब्दाची सांकेतिकता अबाधित राहते. प्रसंभाव्य सारणीचा वापर करून या वाहकाच्या न उपयुक्ततांचे अधिक वर्णन करता येते.
ब्लॅकवेल हे त्यांनी स्वतंत्रपणे शोधलेल्या गतिक प्रायोजनासाठीही (dynamic programming) प्रसिद्ध होत. आज ही प्रायोजनपद्धती अर्थशास्त्र आणि जनुकीय विश्लेषणासहित विज्ञानाच्या अनेक शाखांमध्ये वापरली जाते. ब्लॅकवेल यांचे जगप्रसिद्ध नवीकरण प्रमेय (renewal theorem) अभियांत्रिकीच्या शाखांमध्ये विशेष उपयुक्त ठरले आहे. तसेच भारतीय संख्याशास्त्रज्ञ सी. आर. राव यांचे नाव निगडीत असलेले राव-ब्लॅकवेल प्रमेय तर आधुनिक संख्याशास्त्राचा पायाच आहे.
ब्लॅकवेल यांनी ८० च्या वर अभ्यासपूर्ण शोधनिबंध लिहिले. ब्लॅकवेल यांना मानवंदना म्हणून फर्ग्युसन, शेपले आणि मॅक्क्वीन यांनी स्टॅटिस्टिक्स, प्रोबॅबिलिटी, ॲण्ड गेम थिअरी: पेपर्स इन ऑनर ऑफ डेव्हिड ब्लॅकवेल (‘Statistics, probability, and game theory: papers in honor of David Blackwell’) हा संग्रह संपादित केला.
संख्याशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ब्लॅकवेल यांना बरेच मानसन्मान लाभले. युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉयमधील अल्फा फाय अल्फाच्या (Alpha Phi Alpha) टाउ (Tau) विभागाच्या समूहाचे ब्लॅकवेल सदस्य होते. नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या सदस्यत्वासह अमेरिकेतल्या अनेक मान्यवर गणिती, संख्याशास्त्रीय तसेच शास्त्रीय संस्थांचे सदस्यत्वही त्यांच्याकडे होते. रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीचेही ते मानद सदस्य होते.
इंटरनॅशनल बर्नौली सोसायटी फॉर मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स ॲण्ड प्रोबॅबिलिटीचे (International Bernoulli Society for Mathematical Statistics and Probability) ब्लॅकवेल अध्यक्ष होते. हार्वर्ड, येल, कार्नेजी मेलॉन यांसह इतर अनेक विद्यापीठांनी त्यांना मानद पदव्या बहाल केल्या होत्या. त्यांना ऑपरेशन्स रिसर्च सोसायटी ऑफ अमेरिका आणि द इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स यांनी जॉन व्हॉन न्यूमन थिअरी हा सर्वोच्च पुरस्कार दिला.
संदर्भ :
- http://news.berkeley.edu/2010/07/15/blackwell/
- https://www.britannica.com/biography/David-Harold-Blackwell
- https://www.jstor.org/stable/2245499?seq=1#page_scan_tab_contents
- http://www.math.buffalo.edu/mad/PEEPS/blackwell_david.html
समीक्षक : विवेक पाटकर