उलाम, स्टेनिसवाफ (स्टॅनिस्लाव) मार्टिन : (१३ एप्रिल १९०९ – १३ मे १९८४)
पोलंड मधील ल्वोव (Lwów) येथे एका सधन कुटुंबात उलाम यांचा जन्म झाला. त्यांचे वडील वकील होते. ल्वोव पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून १९३२ साली त्यांनी एम.ए. पदवी प्राप्त केली आणि त्याच संस्थेतून १९३३ साली काझिमीर्झ कुराटोवस्की (Kazimierz Kuratowski) यांच्या मार्गदर्शनाखाली उलाम यांना शुद्ध गणितात डॉक्टरेट मिळाली.
उलाम यांना १९३५ मध्ये अमेरिकेतील न्यूजर्सी येथील सेंटर ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीजतर्फे निमंत्रित केले गेले. पुढील पाच वर्षे त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड (Harvard) आणि मॅडिसन येथील विस्कॉन्सिन (Wisconsin Madison) विद्यापीठात अध्यापन केले. तसेच ‘मानरक्षी रुपांतरण’ सिद्धांताच्या (Ergodic theory) संशोधनातही ते व्यस्त राहिले. १९४१ साली त्यांना कोलोरॅडो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळाली तसेच अमेरिकेचे नागरिकत्वही मिळाले. १९४३ मध्ये (त्यावेळी गुप्त असलेल्या) लॉस अलमॉस (Los Almos), न्यू मेक्सिको येथे अमेरिकेचा अणुबॉम्ब तयार करण्यासाठी राबवला जात असलेल्या ‘मॅनहॅटन’ प्रकल्पात सहभागी होण्यासाठी त्यांना बोलावले गेले. उलाम यांनी असा बॉम्ब अवकाशात सोडण्यासाठी, त्यात अणुमीलन (संमीलन) कशाप्रकारे करण्यात यावे, याचे गणिती उत्तर शोधले. उलाम यांचा समावेश भौतिकशास्त्रज्ञ एडवर्ड टेलर यांच्या गटात होता. टेलर आणि उलाम यांनी एकत्रितपणे तयार केलेले टेलर-उलाम संकल्पन (Teller–Ulam design) हे ताप (आण्विक) न्यूक्लियर शस्त्रांमधील आद्य ठरले. आज वापरल्या जाणाऱ्या सर्व ताप आण्विक शस्त्रास्त्रांचा पाया म्हणजे टेलर–उलाम संकल्पन हे होय.
उलाम यांनी जे. सी. एवर्ट (J. C. Evertt) यांच्यासह अग्निबाणांच्या न्यूक्लिय प्रणोदनावर संशोधन केले. जेव्हा या संबंधी प्रोजेक्ट रोव्हर अंतर्गत काम चालू होते, त्यावेळी रोव्हरच्या औष्णिक अग्निबाणाला पर्याय म्हणून छोटया-छोटया आण्विक स्फोटांचा प्रणोदनासाठी उपयोग करावा, असे उलाम यांनी सुचवले. नंतर हा प्रकल्प ओरायन प्रकल्प (Orion Project) म्हणून ओळखला जाऊ लागला. १९४६ साली अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील पेनिसिल्व्हानिया विद्यापीठात ENIAC (Electronic Numerical Integration and Computers) ह्या महाकाय संगणकाची निर्मिती करण्यात आली. त्या आरंभीच्या काळात संगणकाचे महत्त्व ओळखणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे उलाम होते. ज्यांची उत्तरे माहीत नाहीत अशा फलांसाठी संख्याशास्त्रातील पध्दती वापरणे इलेक्ट्रोनिक संगणकाच्या मदतीने व्यवहार्य होईल, हे उलाम यांनी जाणले. उलाम आणि ग्रीक-अमेरिकन शास्त्रज्ञ निकोलस मेट्रोपोलीस (Nicholas Metropolis) यांनी १९४९ मध्ये संगणक आधारित मॉन्टे कार्लो या नावाने ओळखली जाणारी एक पद्धत (Monte Carlo Method) विकसित केली, ती संख्याशास्त्रातील यादृच्छिक नमूना निवड (रँडम सॅम्पलिंग) यावर आधारित आहे. गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि इतरही अनेक शास्त्रांमध्ये जेव्हा कुठलीही नियमित गणिती पद्धती वापरणे शक्य नसते, त्यावेळी ही पद्धत वापरली जाते. मुख्यत: इष्टतमीकरण (optimisation), संख्यात्मक संकलन (numerical integration) आणि संभाव्यता वितरण (probability distribution) यांतील समस्या सोडवण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला जातो. तसेच कॉम्प्यूटेशनल बायोलॉजी आणि कॉम्प्यूटर ग्राफिक्समध्ये तिचा वापर केला जातो. उलाम यांच्या नावाशी अनेक गणिती संकल्पना जोडलेल्या आहेत. उदा., उलाम मॅट्रिक्स, बोर्सुक-उलाम प्रमेय (Borsuk-Ulam Theorem), हिर्स-उलाम-रस्सिअस स्थिरता (Hyers-Ulam-Rassias stability) प्रश्न, उलाम संख्या, उलाम नागमोडी-चक्र (spiral) आणि उलामच्या अटकळी.
उलामयांचे आणखी एक उल्लेखनीय योगदान म्हणजे भौतिकशास्त्रातील फर्मी-पास्ता-उलाम-सिंगोयु (Tsingou) प्रश्नसंशोधन. या प्रश्नात काही क्लिष्ट भौतिकप्रणाल्या आहेत. उदा., स्फटिकताप-समतोल स्थितीत जाताना (crystal evolving towards thermal equilibrium) अपेक्षेविरुध्द पद्धतीने कार्य करताना आढळतात, तरी त्यांचे स्पष्टीकरण देण्यात उलाम यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. हे संशोधन अरेषीय विज्ञानाच्या (non-liner science) अभ्यासाला चालना देणारे ठरले. १९६३ साली सियाम (SIAM – Society for Industrial and Applied Mathematics) या संस्थेने, उलाम यांना जॉन फॉन न्यूमन व्याख्यान (John Von Neumann Lecture)देण्यासाठी आमंत्रित केले. हा एक मोठा सन्मान मानला जातो. उलाम यांना अनेक विद्यापीठांनी मानद पदव्या प्रदान केल्या. १९६५ पर्यंत उलाम अमेरिकेतील हार्वर्ड, विस्कॉन्सिन, कोलोरॅडो, फ्लोरिडा या सारख्या नामांकित विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते, तसेच लॉस अलमॉस येथील संशोधन केंद्रातही त्यांचे संशोधन चालूच होते. १९६८ पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत ते कोलोरॅडो येथील विद्यापीठात जैविक गणिताचे (Biomathematics) प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.
गणितातील १५० हून अधिक शोधनिबंधांच्या जोडीला उलाम यांची खालील पुस्तके प्रकाशित झाली : १) प्रॉब्लेम्स इन मॉडर्न मॅथेमॅटीक्स, २) एकलेक्शन ऑफ मॅथेमॅटीकल प्रॉब्लेम्स, ३) मॅथेमॅटीक्स अँड लॉजिक, ४) सेट्स, नंबर्स अँड युनिव्हर्सेस, ५) सायन्स, कॉम्प्यूटर्स अँड पीपल – फ्रॉम दि ट्री ऑफ मॅथेमॅटीक्स.
संदर्भ :
- http://www.atomicarchive.com/Bios/Ulam.shtml
- https://www.britannica.com/art/biography-narrative-genre
- http://www-groups.dcs.st-and.ac.uk/~history/ShortBiogs.html
- https://www.nytimes.com/
समीक्षक : विवेक पाटकर.