बॉस्कोविच रॉजरियुस जोसिफस : (१८ मे १७११ – १३ फेब्रुवारी १७८७) बॉस्कोविच यांचा जन्म रागुसा (Ragusa) या आताच्या क्रोएशियातील राज्यात झाला. त्यांचे शिक्षण रागुसातील कॉलेजियम रगुसियमच्या विद्यालयात झाले. त्यांचे पुढचे शिक्षण रोममधील कॉलेजियम रोमानियम मध्ये झाले. इथे त्यांनी शास्त्रांचा अभ्यास करताना गणित आणि पदार्थविज्ञान यात आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवली. याच पार्श्वभूमीवर कॉलेजियम रोमानियम येथे १७४०मध्ये ते स्वतःच्या गणित प्राध्यापकांच्या जागी रुजू झाले. त्यांनी सूर्याच्या विषुववृत्ताचे मापन केले आणि सूर्याच्या पृष्ठभागावरील डागांच्या निरीक्षणांवरून त्याचा भ्रमणकाळ ठरविला.
बेनेडिक्ट, १४ वे पोप यांनी बॉस्कोविच यांना गणिती समस्या सोडविण्यासाठी सल्लागार म्हणून नेमले होते. या संदर्भातील एक उदाहरण असे – रोममधील सेंट पिटर चर्चच्या घुमटाला तडा गेल्यामुळे तो कोसळण्याच्या स्थितीत होता. बॉस्कोविच यांनी त्या संदर्भात पाच एककेंद्रीय वर्तुळाकार लोखंडी पट्ट्या घुमटाला बसवण्याची केलेली गणिताधारित सूचना चर्चने अंमलात आणली होती.
साधारण १७५० ते १७५२ या कालावधीत रोम परिसरातील रेखावृत्ताचा चाप (Arc) मोजण्यासाठी आणि पॅपल (Papal) राज्याचा भौगोलिक नकाशा बनविण्यासाठी, बॉस्कोविच आणि इंग्लिश जेसुईट, ख्रिस्तोफर मेर (Christopher Maire) या दोघांना नेमले होते. या भूपृष्ठमितीय सर्वेक्षणाचे तपशील दोघांनी १७५५मध्ये दि स्टेप्स ऑफ दि पॅपल टेरिटरीज ऑफ दि साउथ बाय मिन्स ऑफ दि एक्सपिडिशन्स, टू मेझर आउट दि टू आय रोट अ पीपी. मेर अँड बॉस्कोविच (‘De Litterariaexpeditione per pontificiamditionemaddimetiendos duos meridianigradus a PP. Maire et Boscovicli’) या शीर्षकाखाली प्रकाशित केले होते. १७५७ मध्ये बॉस्कोविच यांनी स्वतंत्रपणे त्या सर्वेक्षणाचा सारांशही प्रकाशित केला. १७५३मध्येच चंद्रावर वातावरण नसल्याचा शोधही त्यांनी लावला होता.
१७५८ मध्ये व्हिएन्नात असताना बॉस्कोविच यांनी त्यांचे गाजलेले काम थिअरी ऑफ नॅचरल फिलॉसॉफी डिराइव्हड टू दि सिंगल लॉ ऑफ फोर्सेस विच एक्झिस्ट इन नेचर (‘Philosophiæ naturalis theori aredacta adunicamle gemvirium in natura existentium’) प्रसिद्ध केले. यात त्यांनी विकसित केलेल्या, आण्विक आणि बलाच्या उपपत्ती होत्या. याच पुस्तकातून, निरीक्षणांच्या संचाला एकघाती संबंधाचे अन्वायोजन (linear relationship fit) करण्यासाठीची त्यांनी विकसित केलेली, वस्तुनिष्ठ कार्यप्रणाली, जगापुढे आली.
बॉस्कोविच यांना १७५६ ते १७६३ मधील युद्धादरम्यान व्हिएन्ना (ऑस्ट्रिया), पॅरिस (फ्रान्स) आणि लंडन (इंग्लंड) येथे राजकीय मुत्सद्देगिरीसाठी पाठविण्यात आले होते. त्या दरम्यान रॉयल सोसायटीने त्यांना सदस्यत्त्व दिले आणि उत्तर अमेरिकेसाठी भूपृष्ठमितीय मोहिमेची आखणी करण्याकरीता तज्ज्ञ म्हणून शिफारस केली.
या नंतर पॅरिसमध्ये त्यांना नौदलाच्या प्रकाशिकीचे संचालकपद निवृत्तीवेतनासह देण्यात आले. १७६९ ते १७७१ या काळात त्यांनी स्वत:च आरेखित केलेल्या इटलीमधील ब्रेरा, मिलान (Brera, Milan) वेधशाळेत खगोलशास्त्र आणि प्रकाशिकीतील संशोधन जोमाने केले.
विज्ञानातील विविध शाखांमध्ये बॉस्कोविच यांनी काम केले. प्रकाशिकी, गुरुत्वाकर्षण, खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, आणि त्रिकोणमिती इत्यादी विषयांवर त्यांनी एकूण ७० शोधनिबंध लिहिले.
पृथ्वीच्या आकारासंबंधातील अभ्यासात त्यांनी विचलनाच्या केवल मूल्यांची बेरीज कमीतकमी ठेवण्याची कल्पना वापरली. त्यांच्या समस्येच्या उकलीने भूमितीचे रूप घेतले होते. ग्रहांच्या आकाशातील तीन स्थानांवरून त्यांच्या कक्षांचे परिगणन करण्याची पद्धती बॉस्कोविच यांनी दिली. ग्रहाच्या पृष्ठभागाच्या वैशिष्ट्यांच्या तीन निरीक्षणांवरून त्याच्या विषुववृत्ताचे मोजमाप करण्याची पद्धती दिली.
बॉस्कोविच यांनी स्वतंत्रपणे तसेच मायर (Maire) यांच्या मदतीने जी मूलभूत गणिती समस्या सोडवली ती म्हणजे, अशा स्वरूपाच्या n समीकरणांसाठी a आणि b गुणांकाच्या किंमती ठरविणे, ज्या उत्तम अन्वायोजन करतील.
त्यांनी १७५५ मध्ये y आणि x च्या किंमतींच्या दहा जोड्यांसाठी हे समीकरण सोडवून दहा रेषीय कलांचे (slope) गुणांक मिळविले होते. त्यांनी दोषांच्या (error) परिगणनासाठी “i=1,2,….,n” हे सूत्र शोधले.
बॉस्कोविच हे १७८२ च्या सुमारास इटलीत स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल असोसिएशन ऑफ दि सायन्सेसच्या संस्थापकांपैकी एक संस्थापक होते.
बॉस्कोविच यांच्या विचारसारणीमुळे कोपर्निकस विचारसरणीला असलेला कॅथॉलिक चर्चेसचा विरोध बोथट झाला. यांमुळे १४ वे पोप, बेनेडिक्ट, यांनी शेवटी कोपर्निकस यांचे पुस्तक बहिष्कृत पुस्तकांच्या यादीतून वगळले.
बॉस्कोविच यांच्या अद्वितीय कार्याच्या स्मरणार्थ त्यांचे नांव चंद्रावरील एका विवराला देण्यात आले आहे.
संदर्भ :
- Farebrother R. W., (2001) Boscovich, Rogerius Josephus. In Statisticians of the Centuries (Eds. C.C. Heyde and E. Seneta). Springer-Verlag, NY.82-85.
- http://www-gap.dcs.st-and.ac.uk/history/Biographies/Boscovich.html
- https://www.encyclopediaofmath.org/images/8/80/RogeriusJosephusBOSCOVICH.pdf
समीक्षक : विवेक पाटकर