टीचमार्श, एडवर्ड चार्ल्स : (१ जून, १८९९- १८ जानेवारी, १९६३)
एडवर्ड चार्ल्स टीचमार्श यांचा जन्म इंग्लंडमधील न्यूबरी (Newbury), बर्कशायर (Berkshire) येथे झाला. त्यांना ऑक्सफर्ड येथील बिलिऑल (Billiol) महाविद्यालयातील खुली गणितीय शिष्यवृत्ती मिळाली आणि प्रसिद्ध गणिती जी. एच. हार्डी (G. H. Hardy) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे गणिताचे अध्ययन सुरू झाले. त्याच महाविद्यालयातून त्यांना स्नातक पदवी तर मिळालीच पण उत्कृष्ट गणिती कामगिरीबद्दल पुन्हा शिष्यवृत्तीही दिली गेली. लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये ज्येष्ठ अधिव्याख्याता (Senior Lecturer) म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्याचबरोबर ऑक्सफर्ड येथील मॅग्दालिन (Magadalen) महाविद्यालयात देखील त्यांना सात वर्षांसाठी फेलोशिप मिळाली.
पुढे लिव्हरपूल येथील विद्यापीठात शुद्ध गणिताचे प्राध्यापक म्हणून टीचमार्श यांची नेमणूक झाली. तेथे दोन वर्षे अध्यापन केल्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात सॅव्हिलिअन प्राध्यापक (Savilian Professor) म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आणि अखेरपर्यंत ते तेथेच कार्यरत राहिले.
विश्लेषणात्मक अंकशास्त्र (Analytical number theory), फोरिएर विश्लेषण आणि फोरिएर संकलक (Fourier Analysis and Fourier Integrals) तसेच गणितीय विश्लेषणात, टीचमार्श यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विश्लेषणात्मक अंकशास्त्रात टीचमार्श व नॉर्वेजिअन गणिती विगो ब्रुन (Viggo Brun) यांनी गणित श्रेढीतील मूळ संख्यांच्या वितरणाचा उद्बंध देणारे जे प्रमेय सिद्ध केले, ते आता Brun–Titchmarsh theorem म्हणून ओळखले जाते.
Titchmarsh Convolution Theorem या प्रमेयात टीचमार्श यांनी दोन फलांच्या संवलनाच्या अवलंबांचे गुणधर्म वर्णन केले आहेत. तसेच हिल्बर्ट रूपांतरणासंबंधीचे (Hilbert Transformation) टीचमार्श यांनी सिद्ध केलेले प्रमेय टीचमार्श थिअरम म्हणून ओळखले जाते.
जपानी गणिती कोडायरा (Kodiara) व टीचमार्श या द्वयीने एक सूत्र (Titchmarsh–Kodiara formula) शोधून काढले ज्याची उपयोजिते क्वांटम मेकॅनिक्स, परिकर्मी सिद्धांत (operator theory) आणि अर्ध-साध्या ली गटावरील संवादी विश्लेषण (harmonic analysis on semi-simple Lie groups) विषयांत आढळतात.
टीचमार्श यांनी १९३० साली The Zeta–Function of Riemann हे पुस्तक लिहिले ज्यात त्यांनी, जर्मन गणिती रीमान (Riemann) ह्यांनी विकसित केलेल्या आणि विश्लेषणात्मक अंकशास्त्र, भौतिकशास्त्र, संभाव्यता सिद्धांत व उपयोजित संख्याशास्त्र यामध्ये महत्त्वाच्या ठरलेल्या रीमान झीटा फलाची तपशीलवार माहिती दिली आहे. फलांच्या अभ्यासावर प्रकाशित झालेले, The Theory of Function हे टीचमार्श यांचे व्यापक पुस्तक त्याविषयातील गणितींना उपयुक्त ठरले.
टीचमार्श यांनी, विकलन समीकरणांच्या उचित फलांच्या श्रेणी विस्ताराच्या सिद्धांतामध्ये संशोधन (theory of series expansions of eigen functions of differential equations) सुरू केले. त्याधारे त्यांनी Eigen function Expansions Associated With Second Order Differential Equations या पुस्तकांचे दोन खंड प्रसिद्ध केले. सर्वसामान्य लोकांना गणितातील मूलभूत संकल्पना समजावून सांगणारेही पुस्तक Mathematics for the General Reader टीचमार्श यांनी लिहिले.
टीचमार्श यांना एफ.आर.एस. (Fellow of Royal Society) हा बहुमान मिळाला. लंडन मॅथेमॅटिकल सोसायटीचे ते अध्यक्ष होते. शेफिल्ड (Sheffield) विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरवले. डी मॉर्गन मेडल (De Morgan Medal), सिल्व्हेस्टर मेडल सिनियर बर्विक (Senior Bervick) पारितोषिक देऊन टीचमार्श यांच्या गणिती कार्याचा गौरव करण्यात आला.
संदर्भ :
- http://www-history.mcs.st-and.ac.uk/Biographies/Titchmarsh.html
- http://www-history.mcs.st-and.ac.uk/PictDisplay/Titchmarsh.html
समीक्षक: विवेक पाटकर