भास्कराचार्य प्रतिष्ठान : ( स्थापना १९७६)
भास्कराचार्य प्रतिष्ठान संस्थेत उच्च गणिताचे आणि त्यात प्रामुख्याने बीजगणित आणि अंकशास्त्र या विषयावरील संशोधन चालते. १९९२ सालापासून क्षेत्रीय मॅथेमॅटिक्स ऑलिंपियाडचे एक केंद्र भास्कराचार्य प्रतिष्ठान येथे सुरू केले गेले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना गणित ऑलिंपियाडचे प्रशिक्षण या केंद्रात दिले जाते. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे या संस्थेत इ-लर्निंग आणि गणित शिक्षणात विनाशुल्क मुक्त-संगणक प्रणालीचा वापर (फ्री ओपन सोर्स सोफ्टवेअर इन मॅथेमॅटिक्स एज्युकेशन – FOSSME) हे दोन प्रकल्प राबवले जातात. इ-लर्निंग प्रकल्पाच्या माध्यमातून वलय सिद्धांत (Ring Theory) आणि संमिश्र विश्लेषण (Complex Analysis) या विषयांवरची व्याख्याने प्रक्षेपित केली जातात. फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअर इन मॅथेमॅटिक्स एज्युकेशन या प्रकल्पाच्या माध्यमातून गणितविषयक अनेक परिसंवाद आणि कार्यशाळांचे आयोजन केले जाते. भास्कराचार्य प्रतिष्ठानात, नॅशनल बोर्ड ऑफ हायर मॅथमॅटिक्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गणित विभाग इत्यादी संस्थांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवले जातात.
संस्थेने बोना मॅथेमॅटिका हे गणित शिक्षणविषयक नियतकालिक १९९५ ते २००३ या काळात प्रसिद्ध केले. याशिवाय शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपयुक्त पुस्तके, प्राचीन भारतीय गणितज्ज्ञ आर्यभट आणि भास्कराचार्य यांच्या कार्याबद्दलची पुस्तकेही भास्कराचार्य प्रतिष्ठानतर्फे प्रसिद्ध झालेली आहेत.
भास्कराचार्य प्रतिष्ठानात ६,००० हून अधिक ग्रंथसंपदा असलेले अद्ययावत ग्रंथालय आहे. यात संदर्भग्रंथ, दुर्मिळ ग्रंथ, नियतकालिके आणि संशोधनपत्रिका आदी समाविष्ट आहेत. त्यासोबतच संस्थेत परिपूर्ण संगणककक्ष असून महाजालावरून अनेक गणितविषयक नियतकालिके, शोधनिबंध अभ्यासकांना उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही येथे केली आहे. ही संस्था MathSciNetMayhSciNet ची वर्गणीदार सभासद आहे. संस्थेत आधुनिक सोयीसुविधा असलेले चार व्याख्यानकक्ष तसेच पंधरा व्यक्तींसाठी राहण्याची सोय उपलब्ध आहे.
संदर्भ :
समीक्षक : विवेक पाटकर