द ब्रुनेल इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटेशनल मॅथेमॅटिक्स (बीआयसीओएम), युनायटेड किंग्डम : ( स्थापना- १९६६) ब्रुनेल विद्यापीठ ही ब्रिटनमधील शैक्षणिक संस्था १९६६ साली, लंडन येथे स्थापन झाली. या संस्थेत विविध विद्याशाखा असून तेथील गणित विभागात पदवीपूर्व तसेच पदव्युत्तर अभ्यासाच्या संधी आहेत. येथे विशेषतः उपयोजित गणितासंबंधी संशोधन होते आणि अनेक विद्यार्थी उच्च दर्जाचे संशोधन करून पीएच.डी. पदवी प्राप्त करतात. उपयोजित विश्लेषण (Applied Analysis), संगणकीय गणित (Computational Mathematics), संततक यामिकी (Continuum Mechanics), गणिती भौतिकशास्त्र (Mathematical Physics), संख्याशास्त्र आणि प्रवर्तन संशोधन (Operational Research) या शाखांमध्ये येथे संशोधन चालते.
ब्रुनेल विद्यापीठाच्या गणित विभागाची तीन संशोधन केंद्रे आहेत आणि त्यांपैकी एक आहे. ब्रुनेल इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटेशनल मॅथेमॅटिक्स. गणिताचे अध्यापन आणि आधुनिक संशोधन यांमध्ये या केंद्राचे मोठे योगदान आहे. या केंद्राचे मुख्य संशोधनक्षेत्र थिअरी ॲण्ड ॲप्लिकेशन ऑफ फायनाईट एलिमेण्ट मेथड्स हे आहे. संगणकीय गणित, उपयोजित विश्लेषण, यामिकी (Mechanics) आणि संगणकीय यामिकी या शाखांमध्ये संशोधनाला उत्तेजन देणे आणि सहकार्य करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. मॅथेमॅटिकल मॉडेलिंग, फायनाईट एलिमेण्ट, बाऊंडरी एलिमेण्ट, बाऊंडरी डोमेन इंटिग्रल इक्वेशन मेथड्स अँण्ड अँप्लिकेशन्स यावरील संशोधनावर विशेष लक्ष दिले जाते.
संशोधन अनुदान आणि औद्योगिक आस्थापनांबरोबरचे करार यांमधून संस्थेला अर्थसाहाय्य होते. परस्परसहकार्य हे वैशिष्ट्य असलेल्या या संस्थेत जगातील बऱ्याच देशांमधील सहाध्यायी तज्ज्ञ एकत्रितपणे संशोधनात सहभागी होतात. येथे संशोधन करून काढलेल्या तंत्रज्ञानविषयक निष्कर्षांचे संशोधन अहवाल प्रकाशित झाले आहेत आणि ते संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या The Mathematics of Finite Elements and Applications – MAFELAP या परिषदेचे आयोजन बीआयसीओएममध्ये १९७२ पासून दर तीन वर्षांनी केले जात आहे. या परिषदेत फायनाईट एलिमेण्ट मेथड्स या विशिष्ट क्षेत्राशी संबंधित जाणकार व्यक्ती नवनवीन घडामोडींसंबंधी माहितीचे आदानप्रदान करतात.
संदर्भ :
समीक्षक : विवेक पाटकर