ओहसुमी, योशिनोरी : ( ९ फेब्रुवारी,१९४५ )
दुसऱ्या महायुद्धाची अखेर चालू असतांना ओहसुमी यांचा जन्म फुकुओका या जपान मधील एका गावात झाला. त्यांच्या पत्नीचे नाव मारीको. मुळात रसायनशास्त्रात रस असलेल्या या शास्त्रज्ञाने नंतर रेणवीय-जीवशास्त्र हा आपल्या संशोधनाचा विषय निवडला. १९६७ साली त्यांनी बी. एस्सी. आणि १९७४ साली पीएच.डी. या पदव्या टोकियो विद्यापीठातून प्राप्त केल्या. पोस्ट डॉक्टरेट फेलो म्हणून न्यूयॉर्क येथील रॉकफेलर विद्यापीठात १९७४ ते ७७ या कालावधीत त्यांनी उंदरांचे बाह्य पात्रात फलन या विषयावर संशोधन केले. त्यात मी निराश झालो होतो असे ते २०१२ साली म्हणाले होते. नंतर त्यांना यीस्टच्या संशोधनात त्यांचे उद्दिष्ट सापडले. १९७७ साली ते टोकियो विद्यापीठात परतले. १९९६ साली ओकाझाकी येथील मुलभूत जीवशास्त्राच्या राष्ट्रीय संस्थेत ते प्रोफेसर म्हणून रुजू झाले. २००४ ते २००९ या कालावधीत ते जपानमधील हायाम येथील ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटी ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी येथे कार्यरत होते.
प्रो. ओहसुमी यांचे संशोधन पेशीच्या जीवनचक्राबाबत असून काही पेशी स्वनाश पावतात तर त्यांचे काही भाग दुरुस्तीसाठी पाठविले जातात या बाबत आहे. याला स्वभक्षण (ऑटोफेजी ऑटो म्हणजे स्वतः आणि फेजी म्हणजे खाणे) असे म्हणतात. स्वभक्षण क्रिया पेशीमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. या क्रियेत पेशीद्रवात नको असलेल्या विविध घटकांचे विशिष्ठ पद्धतीने खंडन केले जाते आणि काही प्रथिनांसारख्या पेशीघटकांची पुनर्निर्मिती केली जाते. स्वभक्षण क्रियेचे प्रमुख चार प्रमुख प्रकार आहेत.
- बृहत कण भक्षण (मॅक्रोऑटोफेजी) [Macro Autophagy]
- सूक्ष्म कण भक्षण मायक्रोऑटोफेजी [ Micro Autophagy]
- सोबत असलेल्या कणाच्या माध्यमातून भक्षण (चापेरॉनच्या माध्यमातून ऑटोफेजी) [Chaperone mediated Autophagy]
- तंतुकणिका भक्षण मायटोफेजी [Mitophagy] बिघडलेल्या तंतुकणिकेचे स्वभक्षण .
स्वभक्षण क्रियेत दुपदरी पापुद्रे असलेल्या स्वभक्षण पिशवीची ऑटोफेगोसोमची [ Autophagosome] निर्मिती होते. पेशीद्रवातील सर्व अनावश्यक घटक या पिशवीत एकत्र केले जातात. स्वभक्षण पिशवीचा प्रवास ऑटोफेगोसोम, लयकारिकेच्या (लायसोसोम, Lysosome) दिशेने सुरू होतो. लयकारिका व स्वभक्षण पिशवी एकत्र येतात. लयकारिकेतील हायड्रोलेज (Lysosome hydrolase) विकराच्या सहाय्याने सर्व अनावश्यक घटकांचे विघटन होते.
प्राणी शरीरात नव्या पेशी सतत तयार होतात. उदा., मानवी शरीरात प्रतिसेकंदाला ३० लाख लाल रक्तपेशी तयार होतात आणि त्यासाठी एक लाख अब्ज हिमोग्लोबिनचे रेणू तयार होतात. दर सात वर्षांनी मानवी शरीराचा जणू पुनर्जन्म झालेला असतो. कारण शरीरातील आधीच्या पेशींची जागा नव्या पेशींनी घेतलेली असते. मज्जापेशी मात्र अखेरपर्यंत तशाच राहतात. शरीरात २०० प्रकारच्या पेशी विविध इंद्रियांमध्ये कार्यरत असतात. आतड्यातील पेशी चार दिवस, रक्तपेशी चार महिने तर पांढऱ्या पेशी एक वर्ष काम करू शकतात. दररोज शरीरातील पाच ते सात हजार कोटी पेशींचे कार्य संपुष्टात येते. उपासमार, प्रतीकारशक्तीचा ऱ्हास, विषाणूंचा हल्ला, वय झाल्यावर स्वयंनाश करायला पेशींना कोण सांगते? नव्या पेशींना स्वयंनाश केलेल्या पेशींमधील अनेक प्रथिने आणि रसायने आयती तयार मिळतात. त्यांचा पुनर्वापर होतो आणि ऊर्जेची बचत होते. त्यांचे म्हणणे असे की ही प्रक्रिया उत्क्रांतीपासूनची आहे. पेशींच्या स्वभक्षण क्रियेद्वारा शरीराला १७० ग्राम प्रथिने तयार मिळतात. डॉ. ओहसुमी यांनी चय आणि अपचय यांच्यातील समन्वय साधण्यासाठी आवश्यक २१ जनुकांचा मागोवा घेतला आहे. या प्रक्रियेत काही बिघाड झाल्यास अनेक रोग होतात. विशेष म्हणजे त्याला कारणीभूत असलेली जनुके त्यांनी शोधली. यातून कर्करोग, कंपवात, मज्जासंस्थेच्या व्याधी, मधुमेह अशा रोगावर औषधे तयार करता येतील असा त्यांचा दावा आहे.
त्यांनी यीस्ट या सूक्ष्मजीवावर संशोधन केले. स्वभक्षण क्रियेबद्दल अनेक वर्षापासून त्यांना माहिती होती. मात्र त्याचे विश्लेषण त्यांनी प्रथमच केले. या विषयावर १९९० साली फक्त २१ शोधनिबंध प्रसिद्ध झाले होते. २०१५ साली या विषयाचे महत्त्व वाढल्यामुळे ४२०० शोधनिबंध प्रसिद्ध झाले. या विषयात ओहसुमी यांनी टोकियो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे २५ वर्षे संशोधन केले. या कामासाठी त्यांना २०१६ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक स्वतंत्रपणे मिळाले.
ओहसुमी यांना फुजीहारा विज्ञान संस्थेतर्फे फुजीहारा पारितोषिक, जपान अकादमीचे जपान अकादमी पारितोषिक, आशाई शिम्बूनतर्फे त्यांना आशाई पारितोषिक, मूलभूत विज्ञानातील संशोधनाबद्दल क्योटो पारितोषिक, जीवशास्त्रातील आंतरराष्ट्रीय पारितोषिक, गर्डनर (Gardiner) पारितोषिक, केइओ (Keio) वैद्यकशास्त्र पारितोषिक आणि रोझेन्स्तैल (Rosenstiel) पारितोषिक असे विविध सन्मान त्यांना प्राप्त झाले. याशिवाय त्यांना जैव-वैद्यकशास्त्रातील विली (Wiley) पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/nobel…/ohsumi-facts.html
- https://www.theguardian.com › Science › Nobel prizes
समीक्षक : मुकुंद बोधनकर