लॅन्डस्टायनर, कार्ल : (१४ जून,१८६८ – २६ जून, १९४३)

कार्ल लॅन्डस्टायनर यांचा जन्म व्हिएन्ना येथे झाला. वडील लिओपोल्ड प्रख्यात वृत्तपत्र संपादक व पत्रकार होते. त्यांचे निधन कार्ल सहा वर्षाचा असताना झाले व आई फॅनी हॆस हिने त्यांचे संगोपन केले. कार्ल हे १८९१ साली युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएन्नामधून डॉक्टर झाले व त्यासुमारास त्यांनी जीवरसायनशास्त्रामध्ये शोधनिबंध लिहिला. जीवरसायनशास्त्रात (Biochemistry) पारंगत होण्यासाठी त्यांनी पाच वर्षे नामवंत शास्त्रज्ञांसमवेत काम केले. नंतर, जनरल हॉस्पिटल येथे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना रोगप्रतिकारशक्तिची (Immunity) प्रक्रिया व प्रतिद्रव्याची (ॲन्टीबॉडी) कार्यपद्धती यात त्यांना विशेष रस होता. लवकरच त्यांना शरीररचना शास्त्रातील विकृतीमध्ये (पॅथॉलॉजिकल ॲनॉटॉमी ) प्रोफसर ही पदवी बहाल केली गेली. वीस वर्ष त्यांनी या शास्त्रात अथक परिश्रम केले व अनेक शोधनिबंध लिहिले. सिफिलिस (Syphilis) या रोगापासून संरक्षण कसे मिळते याचा अभ्यास, वॉसरमन रिॲक्शन, रोगप्रतिकारशक्ति उद्युक्त करण्यासाठी हॅप्टेनचा (Hapten) उपयोग आणि रक्तारूण मूत्रता (हिमोग्लोबिन्यूरिया) यावरचे शोधनिबंध त्यांनी प्रसिद्ध केले.

पोलिओने मृत्यु पावलेल्या रोग्यांच्या मज्जारज्जू (Spinal Cord) मधून विषाणूंचा स्त्राव गोळा करून तो वानरांना इंजेक्शनद्वारे टोचला. पोलिओ हा विषाणूंमुळे होणारा रोग वानरांमध्येही पसरू शकतो हे त्यांनी सिद्ध केले. पोलिओ कशामुळे होतो, कसा प्रादुर्भाव होतो व रोगप्रतिकारशास्त्राचा आधार घेऊऩ तो कसा आटोक्यात आणायचा याचा त्यांनी शोध घेतला. लॅन्डस्टायनर यांचे योगदान शरीररचनाशास्त्रातील विकृती, ऊतिशास्त्र (Histology) आणि प्रतिक्षमताशास्त्र (Immunology) या क्षेत्रात वाखाणण्याजोगे आहे.

जीवशास्त्रातील गाढा अभ्यास, अचूक निरिक्षण आणि वर्णऩ करणारा शास्त्रज्ञ अशी त्यांची ख्याती होती. परंतु लॅन्डस्टायनर यांचे नाव इतिहासात कोरले गेले ते त्यांचे मानवी लाल रक्तपेशींवरच्या (RBCs) कार्याबद्दल. १९०१ साली त्यांनी लाल रक्तपेशींचे वर्गीकरण केले. या त्यांच्या संशोधनासाठी १९३० साली त्यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. मनुष्याला इतर प्राण्यांचे जर रक्त दिले तर त्या रक्तातील पेशींच्या गुठळ्या निर्माण होतात (Agglutination) व पेशी नष्ट होतात हे लॅन्डॉइज (Landois) या शास्त्रज्ञाने १८७५ साली सिद्ध केले होते. लॅन्डस्टायनर यांनी सिद्ध केले की कुठलेही मानवी रक्त रोग्याला दिले तर असाच परिणाम होतो आणि त्याचा विपरित परिणाम म्हणजे कावीळ, रक्तारूण मूत्रता (हिमोग्लोबिन्यूरिया) होऊन रोगी दगावू शकतो. १९०९ सालापर्यंत त्यांच्या कामाचे महत्त्व कोणाला समजले नाही तरीही त्यांनी प्रयत्न चालूच ठेवले. त्यांनी मानवी रक्ताचे वर्गीकरण ए, बी, एबी आणि ओ (A, B, AB and O) ह्या गटांमध्ये केले. रक्ताचे संक्रमण (Transfusion) करताना रोग्याला त्याच्याच गटाचे रक्त द्यावे. अन्य गटाचे दिले तर नवीन रक्तपेशी नष्ट होतात व जिवाला धोका निर्माण होतो. मानवी रक्तगट हे त्यांच्या रक्तात तयार होणाऱ्या प्रतिजन (Antigens) वर अवलंबून असतात व ते अनुवंशिक असतात. यामुळे अनिश्चित पितृत्त्व (Paternity) पण कळू शकते. त्यानंतरचे संशोधन त्यांनी हॉलंड येथे व नंतर न्यूयॉर्कच्या रॉकफेलर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च येथे चालू ठेवले. विविध प्राण्यांमधील रक्तारूणमधले (हिमोग्लोबिन) वैशिष्ट्य, अत्याधिहर्षतेची (ॲनॅफिलॅक्सि) कारणे त्यामुळे जगाला कळली.

रॉकफेलर इन्स्टिट्यूटमध्ये लेवीन (Levine) आणि वायनर (Weiner) ह्या शास्त्रज्ञांबरोबर लॅन्डस्टायनर यांनी रक्त गटातील उपगट देखील शोधून काढले. या अभ्यासामुळे नवजात बालकांमध्ये होणाऱ्या रक्तविलयनता (हिमोलिटिक ) रोगाची कारणे कळली. रक्तातील ऱ्हीसेस घटक (Rhesus Factor) हेही त्याचे कारण असल्याचे त्यांना कळले. त्यानुसार मानवी रक्त Rh +ve, and Rh –ve ह्या गटांमध्ये मोडते. त्यांच्या ह्या संशोधनामुळे पहिल्या महायुद्धात लाखो लोकांचे प्राण वाचवता आले. लॅन्डस्टायनर यांना रक्त संक्रमणशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएन्ना, ऑस्ट्रिया-हंगेरी तसेच रॉकफेलर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थामध्ये काम केले. औषधशास्त्र, विषशास्त्र हे त्यांच्या कामाचे प्रमुख विषय होते. त्यांना नोबेल पारितोषिकाव्यतिरिक्त, फॉरेन मेंबर ऑफ रॉयल सोसायटी (For Mem RS) , लॅस्कर-डिबॆकी क्लिनिकल मेडिकल रिसर्च अवॉर्ड (मरणोत्तर) यांनी सन्मानित करण्यात आले. संपूर्ण कारकिर्दीत त्यांचे एकूण ३४६ शोधनिबंध प्रकाशित झाले. लॅन्डस्टायनर यांनी आपले सर्व आयुष्य रक्तगट, प्रतिजन, प्रतिद्रव्य, हॅप्टेन्सचे जैवरसायनशास्त्र आणि रोगप्रतिकारशास्त्र यासाठी वेचले. त्यांचा आयुष्याचा शेवटही प्रयोगशाळेतच कामात व्यस्त असताना झाला. त्यांचे गाजलेले पुस्तक म्हणजे The Specificity of Serological Reactions, Harvard University press, 2014.

संदर्भ :

  • 1946 Lasker award for clinical medicine.
  • Biography at the Nobel e-Museum.
  • Karl Landsteiner — It’s in the Blood! A Documentary History of Linus Pauling, Hemoglobin and Sickle Cell Anemia.
  • National Academy of Sciences Biographical Memoir: Landsteiner.

समीक्षक : रंजन गर्गे