अस्त्राखान, लाझारस : ( २७ जून, १९२५ – २ ऑगस्ट, २००३)
लाझारस अस्त्राखान हे एक जनुकशास्त्रज्ञ होते ज्यांनी अणु जीवशास्त्रात काही अतिशय महत्त्वाचे प्रयोग केले. लाझारस अस्त्राखान आणि इलीयात वोल्कीन यांनी टेनेसे येथील ओक रिज राष्ट्रीय प्रयोगशाळेत (Oak Ridge National Laboratory in Tennessee) केलेल्या प्रयोगामुळे अनेक जीवशास्त्रज्ञ गोंधळले. परंतु ह्याच प्रयोगामुळे पुढे जाऊन जीवांमधील सगळ्या प्रक्रियांच्या मुळाशी असलेल्या मेसेंजर आरएनएचा (mRNA) शोध लागला. त्या काळी, १९५७ साली जीवशास्त्रातील सगळ्यात मोठी समस्या ही होती की जिवंत पेशींमध्ये डीएनएमध्ये अनुवांशिकतेची कोडच्या स्वरुपात असलेली माहिती, कशा प्रकारे प्रथिने तयार करते, हे उलगडले नव्हते.
त्या आधी, चारच वर्षांपूर्वी, डीएनएचे वास्तव्य ज्या केंद्रकात असते, त्याची रचना जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रीक या शास्त्रज्ञांनी शोधून काढली होती. परंतु प्रथिने रायबोसोम नावाच्या, केंद्रकाच्या बाहेर असलेल्या छोट्या कारखान्यात तयार होतात असे समजले जाई. तेव्हा असा अंदाज होता की रायबोसोम हे केंद्रकात बनविले जात असावे आणि त्याला डीएनएकडून माहिती जाऊन विशिष्ट प्रकारची प्रथिने तयार केली जात असावीत, जी नंतर पेशींच्या परिघाबाहेर सरकवली जात असावीत. रायबोसोमचे मुख्य तत्त्व डीएनएचे जवळचे रासायनिक बंधू आरएनए होते आणि त्यामध्ये ती माहिती बाळगायची ताकद असावी, असा अंदाज होता. वोल्कीन-अस्त्राखान प्रयोगाने हे सिद्ध केले की आरएनए दोन प्रकारचे असतात एक जे रायबोसोममध्ये सापडतात, ज्यांचे आयुष्य जास्त असते आणि दुसरे ज्यांचे आयुष्य कमी असते परंतु त्यांचे कार्य काय आहे ते निश्चित माहित नव्हते. हा दुसऱ्या प्रकारचा रायबोसोम तयार तेव्हाच होतो जेव्हा एखादा विषाणू, जीवाणूवर हल्ला करतो आणि त्यापासून तयार होणाऱ्या जनुकांची रचना विषाणूसारखी असते, जीवाणूसारखी नाही. ३२ व्या वर्षी त्यांना पीएच.डी. मिळाली परंतु त्यांच्या शोधांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला नाही. कारण ते शोध आधीच्या शोधांच्या पठडीत बसत नव्हते. त्यांनी आणि वोल्कीन यांनी, त्यांचे प्रयोग अनेक वेळा करून पहिले आणि मग त्यांच्या लक्षात आले की त्यांचे निष्कर्ष पटत नसले तरी बरोबर आहेत.
एप्रिल १९६० मध्ये केंब्रिज, लंडन येथे एका बैठकीत क्रीक, ब्रेनर आणि मोनोड ह्यांना त्यांच्या टिपणांचा अभ्यास करताना लक्षात आले की कोणता तरी एक घटक ह्या सगळ्या निष्कर्षांमध्ये गायब आहे जो पेशींच्या केंद्राकामधील डीएनएपासून बाजूला असलेल्या रायबोसोमपर्यंत माहिती पोहोचवतो. हा घटक वोल्कीन-अस्त्राखान प्रयोगाने सिद्ध झालेला औट घटकेचा आरएनए असावा, हे त्यांनी मान्य केले.
लाझारस अस्त्राखान १९६१ मध्ये केस वेस्टन रिसर्व्ह विद्यापीठात (Case Western Reserve University) रुजू झाले जिथे त्यांनी आपली राहिलेली कारकीर्द व्यतीत केली आणि १९९० मध्ये निवृत्त झाले.
त्यांच्या शोधांना किंवा निष्कर्षांना कोणतेच श्रेय किंवा पारितोषिक मिळाले नाही. खरे तर त्यांच्या शोधावरच पुढची डीएनएच्या दुपटीकरणाची आणि प्रथिनांच्या निर्मितीच्या प्रक्रियेची उकल झाली.
लाझारस अस्त्राखान यांचा मृत्यू इस्रायल येथे गेले असता कर्करोगाने झाला.
संदर्भ :
- निकोलस वेद, ऑगस्ट २, २००३. (NICHOLAS WADE, 2, 2003)
- Brenner, ,My Life in Science BioMed Central, London (2001)
- Crick, , What Mad Pursuit: A Personal View of Scientific Discovery Basic, Cambridge, Mass (1988)
- Gros, The messenger
- Lwoff, , Ullmann , A. (Eds.), Origins of Molecular Biology: A Tribute to Jacques Monod, Academic Press, London (1979), pp. 117-124
- Volkin, What was the message? TIBS, 20 (1995), pp. 206-209
समीक्षक : रंजन गर्गे