हेस, विलियम : (१९१३ ते १९९४)

विलियम हेसउर्फ बिल यांचा जन्म एडमंडसटाउन पार्क, रथफार्न्हेम, डब्लीन (Edmondstown Park, Rathfarnham, Dublin) येथे झाला. पुढे ते लंडनला रहायला गेले. ८ व्या वर्षापासून त्यांना घरी एका शिक्षिकेची शिकवणी होती. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी सेंट कोलंबा, राथफर्नहॅम, डब्लिन (St Columba’s College, Rathfarnham, Dublin) येथे त्यांना प्रवेश मिळाला.

बिल सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, शरीरशास्त्रज्ञ आणि जनुकशास्त्रज्ञ होते. त्यांचे अशा प्रकारचे योगदान अनपेक्षित होते. कारण त्यांना कोणत्याही जैविक संशोधन संस्थेत कामाचा अनुभव नव्हता. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी भारतामध्ये त्यांनी भोगलेली परिस्थिती आणि १९५०च्या सुमारास त्यांना युनायटेड किंग्डममध्ये मिळालेले संशोधनाचे स्वातंत्र्य, त्यांच्या गुणांना पोषक ठरले. ते स्वतः प्रयोगशील होते. प्रयोगांचे काम संपवून त्यांनी आपल्या पहिल्या पुस्तकाचे लेखन केले. त्यांनी लंडनच्या  हॅमरस्मिथ (Hammersmith) हॉस्पिटलमध्ये आणि एडिनबर्ग विद्यापीठात दोन संशोधन समूह तयार केले. नावीन्य आणि निर्मिती या बाबतीत हे दोन्ही समूह उत्कृष्ट होते. 

पुढे बिल यांना रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांमध्ये अधिक रुची उत्पन्न झाली. त्यांनी स्वतःचा क्रिस्टल सेट बनविला आणि त्यावर सिग्नल घेतले. अनेक वर्ष ते उत्साहाने तऱ्हेतऱ्हेचे रेडिओ बनवित. गेल्स्वर्थी, विल्यम शॉ, एच.जी. वेल्स आणि सर् अर्थर एडिंग्टन (Galsworthy, William Shaw, H.G. Wells and Sir Arthur Eddington) यांच्यामुळे त्यांना इंग्रजी विषयात रुची निर्माण झाली आणि ती पुढे कायम टिकली.

त्यांनी स्ट्रेप्टोकोकल फायब्रीनोलायसीन (Streptococcal Fibrinolysin) वर काम केले. प्रोफेसर् हंस सेचेस  (Hans Sachs) यांच्याबरोबर बिल यांनी रक्ताच्या प्रोफाईलचा अभ्यास केला. १९४१ साली बिल यांची भरती रॉयल आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये झाली. लिव्हरपूल येथे त्यांना विकृतीशास्त्रात प्रशिक्षण मिळाले आणि १९४२ मध्ये ते भारतात आले. सिमल्याजवळ कसौली येथे आर्मी इंटेरिक रेफेरेंस प्रयोगशाळेत (Army Enteric Reference Laboratory) त्यांनी मेजर म्हणून आणि कालांतराने पुण्यातील सेंट्रल मिलिटरी पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत काम पाहिले. कसौलीमधील दहा महिन्यात त्यांनी साल्मोनेलाच्या (Salmonella) असंख्य जातींचे निदान केले आणि भारत आणि श्रीलंकेत या निदानासाठी लागणारी सामुग्री पुरविली. ससे आणि पेट्री प्लेटऐवजी त्यांनी बकऱ्या आणि मोठ्या पसरट पात्राचा वापर केला. अगारचा पुनर्वापर केला. बिल यांनी तीन महिने प्रयोगशाळेतील विकृतीशास्त्र या कोर्सच्या विद्यार्थ्यांना शिकविले.

आर्मीसाठी येणाऱ्या पेनिसिलीनच्या प्रत्येक डब्ब्याची चाचणी घेण्याची जबाबदारी बिल यांच्याकडे होती. यासाठी त्यांनी युनायटेड किंग्डममध्ये प्रशिक्षण घेतले आणि प्रयोगशाळेत पेनिसिलीनवर कसे नियंत्रण करता येईल यावर पुस्तक लिहिले. ते भारतातील सगळ्या प्रयोगशाळेत वापरले गेले. भारतात त्यांना जैविक जनुकशास्त्रात (Microbial Genetics) रुची निर्माण झाली. युद्धकालातील शैक्षणिक आणि प्रशासकीय अनुभवांमुळे त्यांना स्वतंत्रपणे संशोधन करता आले आणि त्यांचे ११ शोधनिबंध प्रसिद्ध झाले.

जपानमधील युद्धसमाप्तीनंतर ते डब्लिनला परत आले आणि त्रिनिटी महाविद्यालयात (Trinity College) जीवाणूशास्त्र शिकवू लागले. त्यांच्या संपूर्ण संशोधनाच्या कार्यावर त्यांना डब्लिन विद्यापीठाने पीएच.डी. बहाल केली.

लंडनमधील हॅमरस्मिथमधील रॉयल पदव्युत्तर वैद्यकीय शाळेत सिनिअर अध्यापक म्हणून ते कार्यरत झाले. केंब्रिज येथे गेल यांनी आयोजित केलेल्या जीवाणू रसायनशास्त्राच्या प्रशिक्षण शिबिरात त्यांचा संबंध ई.कोलाय (Escherichia coli) या जंतुमधील कॉन्जुगेशन (Conjugation) ह्या प्रजननाच्या पद्धतीशी आला. या संबंधी त्यांनी कव्हाली (L. Cavalli) यांची मदत घेतली. त्यानंतर जीवाणूमध्ये कॉन्जुगेशनसाठी जबाबदार असणाऱ्या मध्यस्थाचा तसेच एच.एफआर्. स्ट्रेनचा (HFr High Frequency Recombinant strains) यशस्वीरीत्या शोध लावला. कॉन्जुगेशनसाठी लागणाऱ्या ऊर्जेच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या गरजांबद्दल देखील त्यांनी संशोधन केले. बिल यांना  हॅमरस्मिथ हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय संशोधन कौन्सिल युनिट आणि जीवाणूंचे जनुकशास्त्र संशोधन युनिट स्थापन करण्यासाठी पाचारण केले गेले. बिल प्रथम एक संशोधक आणि त्यानंतर प्रशासक आणि व्यवस्थापक होते. त्यांनी The Genetics of Bacteria and their Viruses हे पुस्तक लिहिले ते विद्यार्थी आणि संशोधकांना मार्गदर्शक ठरले. जागतिक स्तरावर त्यांनी जनुकशास्त्रातील संशोधनावर चार कोर्सेस घेतले कोर्सवर आधारित Experiments in Microbial Genetics हे पुस्तक त्यांनी लिहिले.

बिल यांची फेलो ऑफ रॉयल सोसायटी (FRS) म्हणून निवड झाली. ते ब्रिटीश जेनेटीकल सोसायटीचे अध्यक्ष होते. ऑस्ट्रेलियन अकादमी ऑफ सायन्सवर त्यांची निवड झाली. त्यांना संगीत, चित्रकला, कविता यात रुची होती. त्यांना आयर्लंडमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजीशियनस, रॉयल सोसायटी ऑफ लंडन, रॉयल सोसायटी ऑफ एडिनबर्ग आणि ऑस्ट्रेलियन अकादमी ऑफ सायन्स यावर फेलो म्हणून निवडले होते. त्यांना लिसेस्टर विद्यापीठाची (Leicester University) डॉक्टर ऑफ सायन्सही पदवी, डब्लिन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लॉज, केंट विद्यापीठाची आणि आयर्लंडमधील नॅशनल विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स या पदव्या बहाल केल्या गेल्या.

संदर्भ  :

  • Broda, P.; Holloway, B. (1996). ‘William Hayes’ 18 January 1913-7 January 1994Biographical Memoirs Of Fellows Of The Royal Society. 42:  Doi:10.1098/Rsbm.1996.0011.
  • ‘Library And Archive Catalogue’ Royal Society. Retrieved 13 November2010.
  • ‘William Hayes’ Royal Society Of Edinburgh. Retrieved 13 November2010.

समीक्षक : रंजन गर्गे