ग्रीनबर्ग, एव्हरेट पीटर : ( १९४८ )
एव्हरेट पीटर ग्रीनबर्ग यांचा जन्म अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झाला. ग्रीनबर्ग यांनी जीवशास्त्रातील बी.ए. ही पदवी वेस्टर्न वॉशिंग्टन विद्यापीठातून मिळवली तर सूक्ष्मजीवशास्त्रातील एम.एस. ही पदवी आयोवा विद्यापीठातून आणि पीएच.डी. पदवी मॅसाच्यूसेटस विद्यापीठातून मिळवली. ते सिएटलमधील वॉशिंग्टन विद्यापीठात सूक्ष्मजीवशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या संशोधनाचे विषय सामाजिक सूक्ष्मजीवशास्त्र, कोरम सेन्सिंग, जैविक पापुद्र्यांचे जीवशास्त्र आणि रोगकारक जनुकांचे नियंत्रण असे आहेत. कोरम सेन्सिंग म्हणजे सूक्ष्मजंतूंचे संवादशास्त्र. या त्यांच्या रासायनिक संवादांचा परिणाम मानवी आरोग्य, शेती आणि पर्यावरण यावर होत असतो. सूक्ष्मजंतू आपल्या पेशीच्या बाहेर रसायनांच्या स्वरुपात संकेत सोडतात आणि एकमेकांशी संवाद साधतात. खाली दिलेल्या आकृतीत बरखोलडेरिया सेपॅसिया (Burckholderia cepacia) हा जीवाणू एएचएल (Acyl homoserin Lacton) नावाच्या रसायनाद्वारा एकमेकाशी संवाद साधतो. विब्रिओ फिश्चेरिया (Vibrio fischeria) नावाचा जीवाणू हवाईन बोब्टेल स्क्विड (Hawaiin bobtail squid) नावाच्या माश्यावर वास्तव्य करून विशिष्ट रसायनाद्वारा प्रकाश बाहेर टाकून त्या माशाला मार्ग दाखवतो. सूक्ष्मजंतूंची ही संवाद प्रक्रिया म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्रातील एक अत्यंत प्रभावी अभ्यास क्षेत्र बनले आहे.
एवेरेट पीटर ग्रीनबर्ग यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पीएच्. डी. पदवी घेतल्यानंतर कोर्नेल विद्यापीठाच्या शिक्षकपदी काम केले, त्यानंतर आयोवा विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात आणि त्यानंतर वॉशिंग्टन विद्यापीठात ते रुजू झाले. नॅशनल अकादमी ऑफ सायन्स, अमेरिकन अकादमी ऑफ आर्ट्स आणि सायन्स, अमेरिकन अकादमी ऑफ मायक्रोबायोलोजी आणि अमेरिकन असोसिएशन फॉर अडव्हान्समेंट ऑफ सायन्सेसचे ते निवडून आलेले सदस्य आहेत. कोरम सेन्सिंगच्या क्षेत्रात त्यांना खूपच मान आहे आणि त्याची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. ग्रीनबर्ग यांच्या प्रयोगशाळेत अगदी नव्याने उदयास आलेल्या सामाजिक सूक्ष्मजीवशास्त्र या विषयावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. त्याच्या तीन बाबींवर त्यांचे विशेष लक्ष होते; सूक्ष्मजीवाणूंमधील रासायनिक संवाद, जीवाणूंचे आदिकालापासून पातळ पापुद्रे तयार करून एका जागी स्थिर राहण्याची जीवनशैली आणि प्रतिजैविकांपासून स्वतःला वाचवून त्यायोगे जगण्यासाठीची धडपड आणि बाकीच्या जीवांच्या संग्रहांपासून स्वतःचे संग्रह वेगळे आणि एकत्रित ठेवण्याची क्रिया मानवी शरीरात रोग घडवून आणण्यासाठी या सगळ्याच प्रक्रिया महत्त्वाच्या ठरतात. ग्रीनबर्ग यांनी आपले संपूर्ण लक्ष स्यूडोमोनास एरोजिनोसा (Pseudomonas aeruginosa) या अतिशय रोगकारक जीवाणूंचा अभ्यास करण्यावर केंद्रित केले. हा जीवाणू टोकाचे आणि खूप काळ चालणारे आजार घडवून आणतो. कोरम सेन्सिंगमुळे काही जीवाणूंच्या प्रजाती आपल्या स्वतःच्या संख्येचे आणि संख्या घनतेचे नियंत्रण करू शकतात आणि त्याच्या प्रती काही विशिष्ट जनुके तयार करून आपली प्रतिक्रिया नोंदवतात. स्यूडोमोनास एरोजिनोसाच्या जनुकांच्या नियंत्रणावर सुरू असलेले संशोधन या शोधासाठी एक आदर्श ठरले आहे. पापुद्र्याच्या निर्मितीसाठी कोरम सेन्सिंग आवश्यक आहे आणि त्यामुळे त्याचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. ग्रीनबर्ग ह्यांच्या प्रयोगशाळेत या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या संप्रेरकांचा शोध लावला आहे ज्यामुळे पापुद्र्याच्या निर्मितीचा अभ्यास शक्य झाला आहे आणि नवीन औषधोपचार शोधून काढता येऊ लागला आहे.
संदर्भ :
- Feltner JB, Wolter DJ, Pope CE, Groleau MC, Smalley NE, Greenberg EP, Mayer-Hamblett N, Burns J, Déziel E, Hoffman LR, Dandekar AA, 2016 Oct; 7 5: LasR Variant Cystic Fibrosis Isolates Reveal an Adaptable Quorum-Sensing Hierarchy in Pseudomonas aeruginosa.
- Majerczyk C, Schneider E, Greenberg EP, 2016 May; 5 : Quorum sensing control of Type VI secretion factors restricts the proliferation of quorum-sensing mutants.
- Schaefer AL, Oda Y, Coutinho BG, Pelletier DA, Weiburg J, Venturi V, Greenberg EP, Harwood CS, 2016 Aug; 7 4: A LuxR Homolog in a Cottonwood Tree Endophyte That Activates Gene Expression in Response to a Plant Signal or Specific Peptides.
समीक्षक : रंजन गर्गे