इटाकुरा, कैची : ( १८ फेब्रुवारी, १९४२ )

 कैची इटाकुरा यांचा जन्म टोकियो, जपान येथे झाला. ते सेंद्रिय रसायन शास्त्रज्ञ आहेत. १९७० साली टोकियो फार्मास्युटीकल कॉलेज मधून त्यांनी पीएच.डी. पदवी घेतली. इटाकुरा हे डीएनएचे तुकडे करण्याच्या तंत्रात (डीएनए स्प्लायसिंग) अतिशय वाकबगार होते आणि या त्यांच्या तंत्रज्ञानाचे आर्थर रिग्ज यांनी कौतुक केले आणि त्यांनी आपल्या कामासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यामुळे डीएनएचे प्रमाणबद्ध तुकडे करण्यात मदत झाली. यातूनच पुढे डीएनए पुनर्बांधणी तंत्रज्ञानाचा (रिकॉम्बिनंटडीएनए टेक्नोलॉजी ) विकास झाला.

इटाकुरा यांनी १९७७ साली यशस्वीपणे सोमटोस्टेटीनचे जनुक तयार केले. हा एक संप्रेरक असून, तो मानवी मेंदूमध्ये स्त्रवत असतो. हे मानवी डीएन इन्शुलिन तयार करण्याच्या दिशेने एक पुढचे पाऊल होते. खोरानांच्या संशोधनात्मक कार्याचा उपयोग करून, इटाकुरा यांनी एक तंत्रज्ञान विकसित केले, ज्यात जनुकांच्या यशस्वी निर्मितीमध्ये लागणारा वेळ हा वर्षांवरून आठवड्यावर आला. प्रथमच सोमटोस्टेटीनचे जनुक इ. कोलाय  (E.coli) या जीवाणूच्या जनुकामध्ये रोपित करण्याचे श्रेय त्यांना जाते.

जेनेनटेक या कंपनीने १९७८ मध्ये रिग्ज आणि इटाकुरा यांच्याशी कंत्राट केले. बोयार आणि इटाकुरा यांनी मानवी इन्शुलिन तयार करण्याचे संकेत (कोड) असलेले प्लास्मिड तयार केले. इटाकुरा आणि रिग्ज यांच्या नावे १९८२ साली ह्युम्युलिन (Humulin) चे एकस्व (पेटंट) घेतले. त्याला अन्न आणि औषध संघटनेने मान्यता दिली. जेननटेक कंपनीने अनेक तंत्रज्ञानाची एकस्वे घेतली ज्यांना आता रिग्ज-इटाकुरा एकस्वे म्हणून ओळखले जाते.

मानवी इन्शुलिन यशस्वीपणे तयार करण्याचे संपूर्ण श्रेय कैची इटाकुरा यांना जाते. त्यांच्या डीएनए पुनर्बांधणी तंत्रज्ञानाचा खूप मोठा प्रभाव रेण्वीय जीवशास्त्र (Molecular Biology) आणि रसायनशास्त्रावर पडला. १९८० साली ते सिटी ऑफ होप येथे वरिष्ठ संशोधन वैज्ञानिक झाले. १९८२ साली त्यांनी रेण्वीय जनुकशास्त्र (Molecular Genetics) विभागाची स्थापना केली, ज्याचे नंतर रेण्वीय आणि पेशीशास्त्र (Cellular) विभाग असे नामकरण झाले. कैची इटाकुरा नंतर सिटी ऑफ होपच्या जनुकशास्त्र प्रयोग शाळेचे संचालक झाले.

कैची इटाकुरा न्यूयॉर्क अकादमी ऑफ सायन्सचे सदस्य झाले. त्यांना जुवेनैल डायबिटीस रिसर्च फाउंडेशनच्या डेविड रॅम्बो विज्ञान पुरस्काराने सन्मानित केले गेले.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.