हेस्टिंग्ज, जॉन वूडलँड ‘वूडी’ : ( २४ मार्च, १९२७ ते ६ ऑगस्ट, २०१४)

जॉन वूडलँड वूडी हेस्टिंग्ज यांचा जन्म मेरिलँडमधील साल्सबरी येथे झाला. १९४४ ते १९४७ या काळात ते स्वार्थमोर (Swarthmore) महाविद्यालयात शिकले आणि बी.ए. पदवी संपादन केली. नंतर त्यांनी प्रिन्सटन विद्यापीठातून नेव्ही वी १२ हे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठीचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांनी इ.एन.हार्वे यांच्या मार्गदर्शनाखाली जॉन हॉपकिन्स विद्यापीठात पीएच.डी. आणि डी. माकाल्रोय ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट डॉक्टरेटसाठी काम केले. चार वर्षे त्यांनी उत्तर पश्चिम विद्यापीठाच्या जीवशास्त्र विभागात अध्यापन केले. पुढील दहा वर्षे ते इलिनॉईस विद्यापीठात सहकारी प्राध्यापक होते, तर त्या पुढील दहा वर्षे ते हार्वर्ड विद्यापीठात जीवशास्त्राचे प्राध्यापक होते आणि १९८६ पासून हार्वर्ड विद्यापीठात ते पोल मंगेल्स्डोर्फ प्राध्यापक आणि रेण्वीय जीवशास्त्र तसेच पेशीजीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

जॉन वूडलँड वूडी हेस्टिंग्ज प्रकाश जीवशास्त्राच्या क्षेत्रात काम करीत होते. झोप आणि जागेपण या चक्राच्या (circadian rhythms, or the sleep-wake cycle) अभ्यासात तसेच जैविक प्रकाश (bioluminescence) निर्मितीच्या क्षेत्रात त्यांनी अभ्यास सुरू केला. त्यांचे संशोधन मुख्यत्वे जीवाणूमधील प्रकाशनिर्मिती (bacterial luminescence) आणि डायनोफ्लेजीलेटस( dinoflagellates) यावर केंद्रित आहे. याशिवाय त्यांनी बऱ्याच बाकीच्या जीवांनी प्रकाश निर्मिती केल्याच्या जीव रासायनिक आणि रेण्वीय प्रक्रिया ह्या विषयावर शोधनिबंध प्रकाशित केले. त्यांच्या प्रयोगशाळेत पहिल्यांदा कोरम सेन्सिंग अस्तित्वात असल्याचा शोध लागला. जीवाणूमधील जैविक घड्याळाचा शोध त्यांनी लावला. यासाठी त्यांनी डायनोफ्लेजीलेटमधील प्रकाशनिर्मिती आणि पेशींमधील प्रथिनांचा आणि हिरव्या प्रकाशनिर्मिती करणाऱ्या प्रथिनांच्या ऊर्जा प्रदानाचा अभ्यास केला.

ते मॅसेच्यूसेटसमधील वूड्स हॉल येथील समुद्री जीवशास्त्रीय प्रयोग शाळेशी ५० वर्षांहून जास्त काळ संलग्न होते तिथे ते शरीरशास्त्र ह्या विषयाच्या अभ्यासक्रमाचे संचालक होते. प्रकाशनिर्मिती करणाऱ्या जीवाणूवरील त्यांच्या कामामुळे त्याच्याशी संबंधित जीवरासायनिक प्रक्रिया तसेच फ्लेवीनचा शोध, त्याची लुसिफरेस (Luciferase) संप्रेराकासाठी कच्चा माल म्हणून वापरले जाण्याची माहिती, लुसिफरेसमधील जनुकीय नियंत्रण, कोरम सेन्सिंग अर्थात जीवाणून मधील संवाद अस्तित्वात असल्याचा पहिला पुरावा इत्यादी शोधांना गती आली.

त्यांनी लुसिफरेस आणि लुसिफेरीनच्या रचनांचा तसेच त्यांच्या जनुकीय नियंत्रणाचा, त्यांच्या पेशींमधील अस्तित्वाचा आणि सिंटीलोन (Scintilons) नावाच्या प्रकाश फेकणाऱ्या पदार्थांमधील त्यांच्या असण्याचा शोध लावला.  Lingulodinium polyedrum चा प्रतिकृती म्हणून उपयोग करून त्यांनी माणसाच्या झोप, जागा आणि वेळ बदलल्यानंतर होणारे झोपेतील बदल तसेच बाकीच्या रोजच्या कृतीमधील ताल आणि नियम ह्यांचा अभ्यास केला. त्यांनी प्रकाशनिर्मितीमध्ये लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मोजमापाचे तंत्र शोधून काढले. त्यातील रासायनिक प्रक्रिया तसेच ऊर्जेची आवश्यकता आणि प्रवाहित होणे, कोएन्झाईम ए (coenzyme A) ची निकड आणि कार्य ह्यांचा त्यांनी शोध लावला.

हेस्टिंग्ज यांनी ४०० च्या वर शोधनिबंध लिहिले आहेत. त्यांनी सहकाऱ्यांच्याबरोबर तीन पुस्तकांचे लिखाण केले. त्यांच्या आयुष्यात त्यांना अनेक बहुमान मिळाले; त्यातील काही ठळक असे: गुगेनहाईम फेलो, जॉन हॉपकिन्स सोसायटी ऑफ स्कॉलर्समध्ये निवड, अमेरिकन अकादमी ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये निवड, फ्रांसमधील ओरसे येथील क्यूरी फाउंडेशनमध्ये NATO सिनियर फेलो इन सायन्स म्हणून निवड, जर्मनीमधील बॉन येथे अलेक्झांडर वान हम्बोल्ट फेलो म्हणून निवड, जपानमधील ओसाका येथे यमाडा फाउंडेशन फेलो म्हणून निवड, NIMH मेरीट पुरस्कार, फेलो ऑफ अमेरिकन अकादमी ऑफ मायक्रोबायोलोजी, अमेरिकन सोसायटी ऑफ फोटोबायोलोजीचा जीवन गौरव पुरस्कार, फेरेल पुरस्कार. त्यांची निवड नॅशनल अकादमी ऑफ सायन्सवर झाली आणि त्यांना सर्केडीयन रीदम्सच्या झोप आणि जागेपणाच्या चक्रामधील कामाबद्दल फेरेल पुरस्काराने गौरवण्यात आले.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे