एडवर्ड जेन्नर, एडवर्ड : (१७ मे, १७४९ – २६ जानेवारी, १८२३)
एडवर्ड जेन्नर यांचा कार्यकाल हा विज्ञानयुगाच्या प्रारंभीचा होता. विषाणू माहीत नसतांना त्याच्याविरुद्ध त्यांनी लस तयार केली. इंग्लंडमधल्या ग्लुस्टरशायर परगण्यातील बर्कले या गावी त्यांचा जन्म झाला होता. देवी या संसर्गजन्य प्रतिबंधक रोगावर लस तयार करण्यात त्यांना यश मिळाले होते. केवळ देवी प्रतिबंधक लस तयार केली एव्हढ्यापुरतेच त्यांचे कार्य मर्यादित रहात नाही तर त्यांना ही जी संकल्पना सुचली तिचा वापर इतर संसर्गजन्य रोगांसाठी करता आला आणि अशा अनेक रोगांविरुद्ध आता सहजपणे लशी उपलब्ध आहेत.
कोणतेही औपचारिक शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण त्यांना सुरुवातीच्या काळात उपलब्ध होऊ शकले नव्हते कारण त्यांचे वडील एडवर्ड ५ वर्षांचा असतांनाच मृत्यू पावले. वयाच्या आठव्या वर्षांपासून डॅनियल लुडलो नावाच्या एका शल्यचिकित्सकाकडे मदतनीस म्हणून त्यांनी काम सुरु केले. लहानपणी एका गवळणीचे काही शब्द त्यांच्या कानावर पडले. तिला देवी रोग झाला नाही कारण तिला गाईना होणारा कांजिण्यांसारखा रोग झाला होता. हे शब्द एड्वर्डच्या कानावर पडले आणि त्यावर त्याच्या मनात विचारचक्र सुरु झाले. एडवर्डची निरीक्षण क्षमता आणि आकलन शक्ती चांगली होती शल्य चिकित्सकाकडे काही वर्षे उमेदवारी केल्यावर एडवर्डने लंडनमध्ये सेंट जॉर्ज इस्पितळात वेळचे प्रख्यात शल्य चिकित्सक जॉन हंटर यांच्याकडे आपले वैद्यकीय शिक्षण सुरू केले. हंटर केवळ शल्य चिकित्सक होते असे नाही तर ते एक जीवशास्त्रज्ञदेखील होते. हंटर निसर्गशास्त्रज्ञ होते हंटर आणि या दोघांमध्ये जो स्नेहभाव निर्माण झाला तो कायम चालू राहिला. त्यांच्या समकालीन असलेल्या कॅप्टन कुक यांनी आपल्या सागरी सफरींमधून जे सागरी जैविक नमुने आणले होते त्यांचे वर्गीकरण करण्याचे काम जेन्नर यांनी केले होते. पण त्याच्याबरोबर सफरीवर जायचे निमंत्रण मात्र त्यांनी स्वीकारले नव्हते! हंटर यांच्याकडे पदवी प्राप्त करून जेन्नर आपल्या गावी परत आले आणि तिथे त्यांनी आयुष्यभर रुग्ण सेवा केली. जेन्नर यांना इतर विषयांमध्ये रुची होती. त्यांनी भूगर्भविज्ञान अभ्यासले होते. १७८४ साली फ्रान्समधील जोसेफ माँटगोलफायर यांनी केलेले हायड्रोजन फुग्यांचे प्रात्यक्षिक त्यांना इतके आवडले की नंतरच्या वर्षी त्यांनी स्वतः असे बलून्स दोनदा बनवून हवेत पाठविले. त्या बलून्सनी २० किलोमीटरचा प्रवास यशस्वीपणे केला. त्यांना पक्षांचा अभ्यास करण्याची खूप आवड होती. कोकिळेवर केलेल्या अभ्यासातून त्यांचा जो शोध निबंध प्रसिद्ध झालात्यासाठी त्यांना रॉयल सोसायटीचे सन्माननीय सदस्यत्व दिले होते.
जेन्नर यांचे कार्यक्षेत्र ग्रामीण भागात होते. त्यांचे बहुतेक रुग्ण कृषी क्षेत्रातील होते आणि त्यांच्याकडे गाई आणि बैल मोठया प्रमाणावर होते. १७८८ साली इंग्लडमध्ये देवीची जोरदार साथपसरली होती. त्यावेळी जेन्नर यांच्या गावातील अनेक लोक या साथीतून आश्चर्यकारकरित्या बचावले होते. जेन्नर यांच्या लक्षात आले की हे जे बचावलेले लोक होते त्यांना आधी कधी तरी गायींना होणारा देवीसदृश कांजिण्यांसारखा रोग होऊन गेला होता आणि त्यांना देवी आल्या नव्हत्या. लहानपणी त्या गवळणीचे ऐकलेले शब्द त्यांना पुन्हा पुन्हा आठवत होते. गावातील लोकांना देवी रोग झाला नाही हेही ते पाहत होते. त्याचवेळी देवी रोगावर उपाय म्हणून वापरण्यात येणारी एक प्रणाली तुर्कस्तानात प्रचलित होती त्या पद्धतीने त्या प्रदेशात काम करणाया अधिकाऱ्याच्या पत्नीने इंग्लंडमध्ये वापरण्याचा प्रयत्न सुरू केला होता. ती पद्धत पण त्यांच्या कानावर आली होती या पद्धतीत देवी आलेल्या रोग्याच्या शरीरावरील पुरळातील स्राव घेऊन तो निरोगी माणसाच्या हाताला जखम करून त्यावर चोळला जायचा. ह्या अघोरी उपायात कधी कधी निरोगी माणूस रोग होऊन दगावण्याचा धोका खूप जास्त होता पण नाईलाज म्हणून लोक तो उपाय करून पाहात होते.
डॉ. जेन्नर यांनी १७९६ मध्ये आपली निरीक्षणे आणि कल्पनाशक्ती यांच्या साहाय्याने जेम्स फिफ्स नावाच्या ८ वर्षाच्या छोटया मुलावर आपले प्रयोग सुरु केले. जेम्सच्या हाताला दोन बारीक जखमा केल्या आणि त्यात गाईंच्या कांजिण्यांच्या पुरळातील स्राव मिसळला. त्यानंतर त्या मुलाला थोडा ताप आला पण काही दिवसांनी तो पूर्ण बरा झाला. काही आठवड्यांनी त्या मुलाला देवीच्या पुरळामधला स्राव पुन्हा एकदा जखमेवर लावला पण त्या मुलाला नंतर देवीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. गुरांना लॅटिनमध्ये व्हॅक्का असे म्हणतात. त्यावरून या विषाणूला व्हॅक्सिनिया असे नाव दिले गेले. लसीकरणाच्या प्रक्रियेला त्यावरून व्हॅक्सिनेशन ही संज्ञा रूढ झाली.
जानेवारी १८२३ च्या सुरुवातीला जेन्नर यांना अर्धांगवायुचा जोरदार झटका आला. त्यातून ते बरे होऊ शकले नाहीत आणि त्यात त्यांचे निधन झाले. त्यांना बरेच सन्मान मिळाले, त्यांना ब्रिटिश संसदेने त्यांच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी भरघोस आर्थिक मदत देखील केली होती.
समीक्षक : रंजन गर्गे