मोह, ह्युगो फॉन : ( ८ एप्रिल, १८०५ – १ एप्रिल, १८७२ )

ह्युगो फॉन मोह यांचा जन्म जर्मनीमधील स्टुटगार्ट या गावी एका सधन कुटुंबात झाला होता. शालेय शिक्षण पूर्ण करीत असतांना त्यांना वनस्पतीशास्त्र आणि खनिजशास्त्राच्या वाचनाची गोडी निर्माण झाली. टयूबिंगेन (Tubingen) विद्यापीठातून वैद्यकीय अभ्यासक्रम त्यांनी पुरा केला. त्यांनतर ते म्युनिकला गेले आणि तेथे त्यांना वनस्पतीशास्त्रात रुची असणारे काही समकालीन सहाध्यायी भेटले. तेथे त्यांना संशोधनासाठी वनस्पतीशास्त्रातील अनेक विषय गवसले. या विषयांचा अभ्यास त्यांचा त्यांनीच केला.  इ.स. १८२८ मध्ये त्यांनी आपल्या संशोधन कार्यास सुरुवात केली आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत ते हा कामाशी एकनिष्ठ राहिले. इ.स. १८३२ मध्ये बर्न विद्यापीठात तर १९३५ मध्ये टयूबिंगेन विद्यापीठात त्यांना प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. स्वतः ला लागणारी उपकरणे स्वतः बनविण्याचा त्यांचा छंद होता. अगदी सूक्ष्मदर्शकदेखील त्यांनी बनविला होता.

त्यांच्या सिद्धांताप्रमाणे पेशींमधील केंद्रक हे प्रोटोप्लाझम (Protoplasm) नावाच्या रवाळ अशा स्त्रावामध्ये तरंगत असते. हा प्रोटोप्लाझम म्हणजे पेशीतीलजिवंतपणा म्हणावयास हरकत नाही. एखादी पेशी जिवंत आहे, एखादा प्राणी, वनस्पती किंवा सूक्ष्मजीव जिवंत आहे म्हणजे नेमके काय या प्रश्नाचे उत्तर म्हणजे प्रोटोप्लाझम हे आहे. पेशींच्या हालचालीत, कार्यामध्ये आणि अस्तित्वात या प्रोटोप्लाझमचाच सहभाग असतो. ब्राऊन यांनी त्यापूर्वी काही वर्षे केंद्रकाचा शोध लावला होता. प्रोटोप्लाझम हा शब्दप्रयोग प्रथम झेकोस्लोव्हाकियाचे शास्त्रज्ञ इव्हॉनगेलीसपुरकुंज ( Jan Evangelista Purkinje) यांनी अंडयामध्ये असलेल्या स्रावाचे वर्णन करण्यासाठी वापरला होता. पण आता हा शब्दप्रयोग फॉन मोह यांनी ज्यासाठो केला त्याच अर्थासह स्वीकारला गेला आहे. फॉन मोह यांनी प्रोटोप्लाझमचे जे पेशी आवरणाभोवती वलय बनलेले असते त्याला अनादी पिशवी म्हणजे प्रिमोरडीएल (Primordial) अर्टिकल असा शब्दप्रयोग सुचविला होता. पेशी विभाजनाच्या वेळी प्रोटोप्लाझममध्ये कसे बदल होतात ह्याचे वर्णन त्यांनी केले होते. सतराव्या शतकात अनेक संशोधकांनी सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने वनस्पती आणि प्राणी शरीरातील अनेक भागांचा सखोल अभ्यास करून त्याचे विवरण देण्याचा प्रयत्न केला होता. यातूनच पेशी सिद्धांत विकसित होत गेला. पेशी हा शब्दप्रयोग सरावात प्रथम रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने बुचाच्या झाडाच्या सालाचे निरीक्षण करताना वापरला होता. जर्मन वनस्पतीशास्त्रज्ञ श्लायडन (Schleiden) यांनी ह्या पेशी सिद्धांताची मुहूर्तमेढ केली होती. त्यांनी म्हंटले होते की उत्क्रांतीच्या प्रारंभी ज्या छोटया वनस्पती होत्या त्या सर्व एकपेशीय आहेत तर त्यानंतर उत्क्रांत होत गेलेल्या सर्व वनस्पती अनेक पेशीय आहेत. थिओडोर स्वान यांनी त्यात प्राण्यांसंबंधी देखील अशाच निष्कर्षांची जोड दिली आणि या स्वान- श्लायडन जोडगोळीने पेशी सिद्धांताचा ढाचा बनविला. फॉन मोह यांनी प्रोटोप्लाझम हा स्त्राव जीवाचा भौतिक पाया आहे हे प्रभावीपणे स्पष्ट करून पेशींच्या विभाजनाने पेशी बनतात हे सांगितले आणि हाच पेशी सिद्धांत आता स्वीकारला गेला.

रॉयल स्वीडीश अकादमी ऑफ सायन्सेसने त्यांना परदेशी सभासद म्हणून स्वीकारले.

संदर्भ :

  • ‘Biographical index of former fellows of the royal society of Edinburgh 1783-2002’ (pdf) The Royal Society of Edinburgh July 2006 ISBN 0902 198 84 x
  • Karl Deutsche Biographie (NDB) (in German) 17, Berlin Duncker & Humbolt pp.690-691 (full text online)

समीक्षक : रंजन गर्गे