श्वान, थिओडोर( ७ डिसेंबर, १८१० – ११ जानेवारी, १८८२ )

एलिझाबेथ आणि लिओनार्ड श्वान यांचा थिओडोर हा  मुलगा होता. यांचा जन्म जर्मनीमधील नॉईस या गावात झाला. श्वान यांचे महाविद्यालयीन शिक्षण जर्मनीमधील कलोन आणि बॉन येथे झाले होते. वुर्झबर्ग महाविद्यालयात त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण घेतले. वयाच्या तेविसाव्या वर्षी त्यांना वैद्यकीय पदवी प्राप्त झाली. बर्लिनमध्ये त्यांना प्रसिद्ध शरीरविज्ञानशास्त्रज्ञ जोहान पीटर म्युलर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी म्युलर शरीर विज्ञानशास्त्रावर पुस्तक लिहीत होते. त्या  पुस्तकासाठी त्यांना काही प्रायोगिक निष्कर्ष हवे होते. त्यातील काही प्रायोगिक कामे श्वान यांच्यावर त्यांनी सोपविली होती. श्वान यांनी सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने प्राणीपेशींचा अभ्यास  केला. त्यातूनच त्यांना चेतातंतूंच्या आवरणाच्या अभ्यासात ज्या पेशी सापडल्या त्यांना त्यांच्या सन्मानार्थ श्वान पेशी असे नाव मिळाले. या श्वान किंवा ग्लायल पेशी चेतापेशींना ऊर्जा पुरवण्याचे काम करतात. तसेच त्या मायलिन या चेतातंतूंच्या आवरणासाठी लागणाऱ्या पदार्थाच्या निर्मितीमध्ये हातभार लावतात.

१८३७ मध्ये श्वान यांची मॅटिहास श्लायडन या वनस्पती शास्त्रज्ञाबरोबर भेट झाली. श्लायडन यांनी त्यांच्या अभ्यासात वनस्पतीपेशींचे प्रजनन होतांना जुन्या पेशींतील केंद्रकाचे विभाजन होते हे पाहिले होते. श्वान यांचेही असेच निरीक्षण होते. या दोन्ही निरीक्षणांचा परस्पर संबंध लक्षात घेत श्वान यांनी प्रत्येक सजीव हा पेशींनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडला आणि हा श्वान-श्लायडन सिद्धांत सर्वमान्य झाला आहे. अंडे हे एकपेशीय असते व त्यापासूनच सजीव शरीरनिर्माण होते हा महत्त्वाचा सिद्धांत श्वान यांनी गर्भविज्ञानाचा अभ्यास करून मांडला. या सिद्धांताचे स्पष्टीकरण देतांना त्यांनी विविध अवयवांचे आणि नखे, पिसे आणि केस यांची उत्पत्ती पेशींपासून होते हेही सांगितले आणि सिद्ध करून दाखविले. १८३८ मध्ये त्यांनी आपले या विषयावरचे पुस्तक प्रसिद्ध केले त्याचे नाव होते Microscopic Researches into the Accordance in the Structure and Growth of Animals and Plants. पेशीशास्त्रात त्यांनी शरीरातील पेशींचे पाच प्रकारांमध्ये वर्गीकरण केले होते. वेगवेगळ्या आणि स्वतंत्र अस्तित्व असलेल्या रक्त पेशी, घट्ट जोडल्या गेलेल्या स्वतंत्र पेशी (कातडी, नखे, पिसे), एकमेकांत विलीन झालेल्या पेशी (हाडे, दात, कार्टिलेज किंवा कुर्च्या), तंतू पेशी (चेतातंतू आणि स्नायुबंध) आणि अनेक पेशींच्या विलीनीकरणातून निर्माण होणाऱ्या पेशी आणि चेतापेशी असे हे पाच प्रकार होते.

श्वान यांनी त्यांच्या अभ्यासात आणखी एक महत्त्वाचा शोध लावला होता आणि तो म्हणजे जठरात जे अन्नपचन होते त्यात हायड्रोक्लोरिक आम्लाव्यतिरिक्त आणखी एक विकर असते ते म्हणजे पेप्सीन.

सजीवांची उत्पत्ती अचानक झाली असावी या समजाला छेद देण्याचे काम श्वान यांनी केले. त्यांनी त्यासाठी अन्नपदार्थ द्रावणात उकळल्यानंतर ते जंतुविरहित राहते हे सिद्ध केले होते. द्रावण जर न उकळता साठवून ठेवले तर ते लवकरच खराब होतांना दिसते आणि त्यात जंतु वाढतांना दिसले. जर निर्मिती अचानकपणे होत असती तर उकळलेल्या द्रावणात देखील ती व्हावयास हवी होती. परंतु  उकळल्यामुळे त्यात असणारे जंतू मारले गेले आणि ते द्रावण हवाबंद ठेवल्यामुळे बाहेरून त्यात सूक्ष्म जीव जाऊ शकले नाहीत. म्हणजेच या जीवांची निर्मिती जीवांपासूनच होते आणि अचानकपणे अजैविक पदार्थांपासून होत नाही हे या श्वान यांच्या प्रयोगातून सप्रमाण सिद्ध झाले.

अल्कोहोलच्या किण्वन प्रक्रियेत यीस्टच्या जिवंत पेशींचा महत्त्वाचा कार्यभाग असतो असा सिद्धांत त्यांनी मांडला. लुई पाश्चर यांनी काही वर्षांनंतर श्वान यांचे काही प्रयोग परत केले आणि यीस्ट ह्या जिवंत पेशींचं आहेत असे सिद्ध केले.

संदर्भ :

  • Chisholm Hugh, ed. (1911) ‘Schwann Theodor’ Encyclopedia Britannica (11thed), Cambridge University Press.

समीक्षक : रंजन गर्गे