चक्रवर्ती, आनंदा मोहन : ( ४ एप्रिल १९३८ – १० जुलै २०२०)

 आनंद चक्रवर्ती यांचा जन्म सैंथिया (Sainthia), कोलकाता येथे झाला. कोलकाता येथील रामकृष्ण मिशन विद्यामंदिर आणि सेंट झेविअर महाविद्यालयात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. पश्चिम बंगालमधील कोलकाता विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली. आनंद मोहन चक्रवर्ती हे भारतीय-अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. न्यूयॉर्क येथील शेनेक्टडी (Schenectady) मधील जनरल इलेक्ट्रिक कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागात काम करत असतांना तेलाचे खंडन करणारा नवीनच जीवाणू त्यांनी जनुक–अभियांत्रिकी (Genetic Engineering) या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रयोगशाळेत तयार केला. या जीवाणूचे नाव आहे स्यूडोमोनास.

तेलाचे खंडन करणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या चार प्रजाती त्यावेळी अस्तित्वात होत्या. परंतु तेलात या जंतूंना सोडल्यावर एकमेकामधील स्पर्धेमुळे तेलाच्या खंडन प्रक्रियेला मर्यादा निर्माण झाल्या. तेलाचे खंडन करणारी जनुके प्लाझमीडच्या सहाय्याने या चार प्रजातींमध्ये एकमेकात हस्तांतरित होऊ लागली. जनुकांची ही अस्थिर वागणूक ही खरी समस्या आहे हे चक्रवर्ती यांनी ओळखले. त्यांनी अशा प्लाझमीड हस्तांतरणामुळे परिवर्तीत झालेल्या जीवाणूंना जंबुपार (अल्ट्रा व्हायोलेट) किरणांचा मारा करून तेलाचे खंडन करणाऱ्या चार जनुकांना एकाच जीवाणूत स्थिर करून एका नव्याच जीवाणूची निर्मिती केली. त्या जीवाणूला स्यूडोमोनास पुटिडा  (Pseudomonas putida) म्हणून ओळखले जाते. या जंतूची तेलाचे खंडन करण्याची क्षमता दुपटीने वाढल्याचे त्यांनी सिद्ध केले. अशा रीतीने पर्यावरणात प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या तवंगातील दोन तृतियांश हायड्रोकार्बन्सचे खंडन करण्याची क्षमता या जीवाणूत निर्माण झाली होती. या जीवाणूकडे आंतरराष्ट्रीय समुदायातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधले गेले. चक्रवर्ती यांनी या जीवाणूसाठी अमेरिकन एकस्व अधिकार मिळावे म्हणून अर्ज केला. या पूर्वी लुई पाश्चर यांना दोन जीवाणूंचे एकस्व अधिकार प्राप्त झाले होते आणि चक्रवर्ती यांना याच जीवाणूसाठी युनायटेड किंग्डमचे एकस्व अधिकार प्राप्त झाले होते. असे असून सुद्धा त्यांना अमेरिकेचे एकस्व अधिकार नाकारण्यात आले. चक्रवर्ती यांचा अमेरिकन एकस्व अधिकारासाठी चाललेला हा लढा विज्ञान क्षेत्रात खूपच गाजला. अखेरीस १९जून १९८० रोजी मनुष्यनिर्मित जिवंत सूक्ष्मजीव हा एकस्व अधिकार प्राप्त करण्यासाठी पत्रे आहेत कारण हे निर्मिती किवा वस्तू तयार करणे या सदरात बसतात असा निकाल अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि विज्ञान क्षेत्रात जनुक अभियांत्रिकी तंत्राचा वापर करून निर्माण केलेले असे अनेक सूक्ष्मजीव जगभर प्रकाशात आले.

सध्या चक्रवर्ती हे कर्करोगाच्या पेशिचक्राला थांबवू शकतील अशा जीवाणूनिर्मित क्युप्रेडोक्सीन (Cupredoxin) आणि सायटोक्रोम प्रथिनांवर संशोधन करीत आहेत. चक्रवर्ती यांनी २००१ साली सी.डी.जी. थेराप्युटिक्स नावाची कंपनी डेलावेर येथे स्थापन केली आहे. शिकागो येथील इलिनॉइस विद्यापीठात ज्या पाच सूक्ष्मजीवांचे त्यांनी एकस्व अधिकार घेतले आहेत त्यांच्या गुणधर्मांच्या माहिती संदर्भात ही कंपनी कार्य करते. इलिनॉइस विद्यापीठाकडे जरी याचे एकस्व अधिकार असले तरी त्याच्या वापरासंबंधीचा संपूर्ण परवाना सी डी जी थेराप्युटिक्सलाच आहे.

चक्रवर्ती यांनी २००८ साली गुजराथमध्ये अहमदाबाद येथे अमृता थेराप्युटिक्स नावाची जैव-औषधनिर्मिती कंपनी स्थापन केली आहे. कर्करोग आणि सार्वजनिक आरोग्याला घातक अशा आपल्या शरीरात निर्माण होणाऱ्या जीवाणू निर्मित पदार्थांचा सामना करण्यासाठी या कंपनीत त्यावर उपचार, लस आणि निदान पद्धती विकसित केल्या जातात. भारतीय जैवतंत्रज्ञान विभागाकडून २०१० साली दोन वर्षाच्या संशोधनासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहनपर अनुदान प्राप्त झाले आहे.

इलिनॉइस विद्यापीठाच्या शिकागो कॉलेज ऑफ मेडिसिन येथे ते सध्या सूक्ष्मजीवशास्त्र आणि रोगप्रतिकारशास्त्र विभागात विशेष प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एक नावाजलेले शास्त्रज्ञ या नात्याने ते अमेरिकेत न्यायाधीशांचे, सरकारचे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे सल्लागार म्हणून काम बघतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या उद्योग विकास संस्थेतर्फे त्यांनी जनुक अभियांत्रिकी आणि जैवतंत्रज्ञान याचे आंतरराष्ट्रीय केंद्र स्थापन केले आहे. या केंद्राच्या विज्ञान सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. स्वीडनच्या स्टॉकहोम पर्यावरण संस्थेत देखील ते कार्यरत होते.

ते मिशिगन जैवतंत्रज्ञान संस्था, मॉन्टॅना स्टेट विद्यापीठाचे बायोफिल्म अभियांत्रिकी केंद्र, मिशिगन स्टेट विद्यापीठाचा परिस्थितीकी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, कॅनडा येथील जीवाणू रोग केंद्र आणि विज्ञान, स्वस्थ्य व न्यायालय आईनस्टीन संस्था अशा अनेक संस्थांशी निगडीत आहेत. बगिंग कॅन्सर (‘Bugging cancer’) आणि डेअरिंग टू ड्रीम (‘Daring to dream’) ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

चक्रवर्ती यांना अमेरिकेच्या औद्योगिक संशोधन संस्थेचा उत्तम शास्त्रज्ञ पुरस्कार, अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थेचा विशेष शास्त्रज्ञ पुरस्कार, राष्ट्रीय स्वास्थ्य संस्थेचा मेरीट पुरस्कार, अमेरिकन सैन्य दलाचा विशेष सेवा पुरस्कार, अमेरिकन सोसायटी फॉर मायक्रोबायालॉजीचा प्रॉक्टर अँड गॅम्बल (Procter and Gamble) पर्यावरणीय जैवतंत्रज्ञान पुरस्कार, जैव-तत्त्वज्ञान या विषयातील Golden Eurydice award आणि २००७ साली भारत शासनाचा पदमश्री  हा नागरी पुरस्कार त्यांना देण्यात आला होता.

वयाच्या 82 व्या वर्षी त्यांचे शिकागो येथे निधन झाले.

संदर्भ :

  • ‘Environment Oil Eating Bug’ Time 22 September 1975. Retrieved 28 September 2009.
  • Chakrabarti, Ananda 2006 Archived from the original on 5 October 2009 – Retrieved 28.

     समीक्षक : मुकुंद बोधनकर