टॉड, अलेक्झांडर रॉबर्टस ) : ( २ ऑक्टोबर, १९०७ – १० जानेवारी, १९९७ )
अलेक्झांडर रॉबर्टस टॉड यांचा जन्म ग्लासगो येथे झाला. त्यांचे वडील उद्योगपती होते. त्यांचे शिक्षण ॲलनग्लेन स्कूलमध्ये झाले. त्यांनी ग्लासगो विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. प्राथमिक संशोधनाचे प्रशिक्षण टी.एस. पॅटरसन यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आणि याच विद्यापीठातून बार्च यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पित्तातील आम्लांच्या रसायनशास्त्रावर पीएच.डी. संपादन केली. त्यांनी नोबेले पुरस्कार विजेते रॉबर्ट रॉबिन्सन यांच्याबरोबर ॲन्थोसायनिन व इतर रंगीत पदार्थांचा अभ्यास केला. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त केली. ही त्यांची दुसरी पीएच.डी. होती. नंतर टॉड एडिबंर्ग विद्यापीठात जी. बरनर यांच्या गटात सामील झाले. मग लिस्टर इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेन्टीव्ह मेडिसन, चेल्सी येथे त्यांनी काम केले व नंतर लंडन विद्यापीठात जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले.
मॅन्चेस्टर विद्यापीठात असतांनाच टॉड यांनी डीएनए व आरएनएच्या मूलभूत घटक असणाऱ्या न्यूक्लिओसाइडस व न्यूक्लिओटाइडस यांच्यावर काम केले. यात शर्करा आणि फॉस्फेटच्या रेणूंची रचना त्यांनी नेमकी शोधून काढली. ते निवृत्त होईपर्यंत केंब्रिज विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ॲडिनोसीन ट्रायफॉस्पेट (ATP), ॲडिनोसीन डायफॉस्पेट (ADP), ॲडिनोसीन मोनोफॉस्पेट (AMP), फ्लेविन ॲडॅनीन डायन्यूक्लिओटाइड (FAD) या जीवरसायानांच्या रचना त्यांनी निश्चित केल्या आणि त्यांचे संश्लेषण केले. या त्यांच्या कार्यामुळे वॉटसन आणि क्रीक यांनी सांगितलेल्या डीएनएची रचना अधिक स्पष्ट झाली. त्यांनी जीवनसत्त्व बी १२ ची रचना स्पष्ट केली तसेच जीवनसत्व बी-१, ई आणि ॲन्थोसायनिनच्या रचना व त्यांचे संश्लेषण केले. १९५७ मध्ये टॉड यांच्या न्यूक्लेओटाइडसच्या संशोधनास रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. टॉड यांच्या या संशोधनाने रसायनशास्त्र व जीवरसायनशास्त्रात वेगाने प्रगती झाली.
टॉड यांच्या संशोधनास अनेक विद्यापीठे व देशांमध्ये मान्यता मिळाली. त्यात ग्लासगो विद्यापीठाची डी.एस्सी पदवी, किल (Kiel) विद्यापीठ, ग्लासगोकडून मानद डॉक्टरेट, तसेच मानद डी.एस्सी. पदव्या लंडन, माद्रिद, इक्सेटर, वेल्स या विद्यापीठातून मिळाल्या. त्याशिवाय, रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्ट्रीचे मेलडोला मेडल, डेव्ही मेडल, लव्हासियर मेडल यांचा समावेश आहे. त्यांची सन्माननीय सभासद म्हणून न्यूयार्क येथील न्यूयार्क ॲकेडमी ऑफ सायंसेसमध्ये नियुक्ती झाली. रॉयल ऑस्ट्रेलियन रासायनिक संस्थेचे ते मानद संशोधन सदस्य होते. १९६०-६९ या दरम्यान टॉड यांनी रासायनिक सोसायटी लंडनचे अध्यक्ष पद भूषविले.
टॉड यांना आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक घडामोडीत रूची होती. ते ब्रिटिश राष्ट्रीय समितीचे तसेच आंतरराष्ट्रीय प्युअर अँड अप्लाईड केमिस्ट्री या संस्थेचे अध्यक्ष होते. १९५२ मध्ये टॉड यांची ब्रिटीश सरकारच्या विज्ञानविषयक धोरण सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. ते न्यूफ्लेड फौंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त होते.
टॉड यांचा केंब्रिज येथे मृत्यू झाला.
समीक्षक : रंजन गर्गे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.