निकोलस, आर्थस मॉरीस : ( ९ जानेवारी, १८६२  –  २४ फेब्रुवारी, १९४५ )

निकोलस मॉरीस आर्थस यांचा जन्म फ्रान्समधील अँजर्स (Angers) येथे झाला. सॉरबॉन ( Sorbonne )  येथे त्यांनी शरीरक्रियाशास्त्र, पदार्थविज्ञान तसेच वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले. अल्बर्ट डास्त्री (Albert Dastre) या शरीरक्रियातज्ञाचे ते विद्यार्थी होते आणि त्यांचे तांत्रिक सहाय्यक म्हणून त्यांनी काही वर्षे काम केले. अल्बर्ट डास्त्री यांच्याबरोबर त्यांचा पहिला शोधनिबंध ग्लायकोजनेसिसवर (Glycogenesis) प्रसिद्ध झाला. त्यांनी निसर्गविज्ञान शाखेमध्ये पीएच.डी. साठी रक्त गोठण्याच्या क्रियेवर अभ्यास करून प्रबंध सादर केला. रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये कॅल्शियम हा महत्त्वाचा घटक हे त्यांनी दाखविले. रक्त आणि दूध यांच्यातील काही समान गुणधर्मानुसार कॅल्शियम हा दूध गोठण्याच्या क्रियेमध्येसुद्धा आवश्यक घटक आहे हे त्यांनी दाखवले. परंतु रक्त आणि दूध या दोन्हींच्या गोठण्याच्या क्रियेसाठी वितंचकांची (enzymes) सुद्धा आवश्यकता असते. आर्थस यांनी दूध आणि रक्तातील प्रथिनांचा तसेच दूध पचनाच्या आणि दूध व रक्त गोठण्याच्या क्रियेवर सखोल अभ्यास केला.

आर्थस यांनी केसिन आणि फायब्रीन या प्रथिनांचा रासायनिकदृष्ट्या तुलनात्मक अभ्यास करून त्यांचे गोठण्याचे (coagulation) गुणधर्म वेगवेगळे असतात हे दाखविले. पुढे त्यांनी या विषयावर पुस्तक प्रकाशित केले. त्यांनी दुधावरील संशोधन चालूच ठेवले आणि जठरामध्ये दूध असेल तर दूध गोठण्यासाठी लागणाऱ्या विकरांचे विमोचन जास्त प्रमाणात होते हे त्यांनी दाखविले.

परंतु पुढे त्यांनी  रक्त गोठण्याच्या क्रियेवरील अभ्यासामध्ये जास्त लक्ष केंद्रित केले आणि यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी सोडियम सायट्रेटच्या रक्त गोठण्याच्या क्रियेस प्रतिबंध करणाऱ्या गुणधर्माचा अभ्यास केला. यामुळे सोडियम सायट्रेटला रोग उपचारामध्ये महत्त्व प्राप्त झाले. रक्त गोठण्याच्या अभ्यासामध्ये त्यांनी अठरा वर्षांचा कालावधी खर्च केला. शरीरक्रिया तसेच शस्त्रक्रियेसाठी हे संशोधन अतिशय उपयुक्त होते.

प्रथिनांचे विघटन करणाऱ्या ट्रिप्सीनसारख्या विकरांचा अभ्यासदेखील आर्थसनी केला. प्रथिनांचे रासायनिक पृथःकरण अजून संदिग्ध अवस्थेत असताना, वितंचके ही रासायनिक संयुगे नाहीत, परंतु त्यांचे गुणधर्म हे प्रकाश किंवा चुंबकाच्या भौतिक क्रियेसारखे आहेत की ज्यामुळे एखाद्या पदार्थावर त्यांचा परिणाम होऊन त्याचे विघटन होते, या एल. यागर (L. Jager) यांच्या मूळ कल्पनेला आर्थसनी पुष्टी दिली.

शरीरक्रियाशास्त्रातील व्याख्याता म्हणून सॉरबॉन येथे काम केल्यानंतर, आर्थस यांची शरीरक्रियाशास्त्र, रसायनशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणून फ्रायबर्ग (Fribourg) विद्यापीठात नियुक्ती झाली. नंतर लिल (Lille ) येथील पाश्चर इन्स्टिट्यूटच्या प्रयोगशाळेचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. यावेळी अल्बर्ट काल्मेटी हे पाश्चर इन्स्टिट्यूटचे प्रमुख होते. या ठिकाणी त्यांनी रक्त आणि विषारी प्रथिनांवर अभ्यास केला. पुढे त्यांना मार्से (Marseilles) विद्यापीठाच्या मेडिकल स्कूलमध्ये व्याख्याता हे पद देण्यात आले आणि शेवटी लॉझॅन (Lousanne) विद्यापीठाच्या फिजिऑलॉजिकल इन्स्टिट्यूटमध्ये शरीरक्रियाशास्त्राचे प्राध्यापक आणि संचालक म्हणून नियुक्ती झाली. सेवानिवृत्तीपर्यंत ते याच पदावर तेथे राहिले.

शार्ल रिशे (Charls Richet) आणि पॉल पोर्टीये (Paul Portier) यांनी ॲनाफायलॅक्सीस (anaphylaxis) या ॲलर्जीच्या प्रकाराचा  शोध लावला. ॲनाफायलॅक्सीस म्हणजे शरीराची प्रतिकारशक्ती कमी असताना एखाद्या विषारी घटकांच्या संपर्कामुळे वाढलेली संवेदनशीलता असा अर्थ होता. याचवेळी आर्थस यांचा ॲलर्जीवर स्वतंत्रपणे अभ्यास चालू होता. एखाद्या प्राण्यावर दुसऱ्या प्राण्याच्या शरीरातील प्रथिनांचा काय परिणाम होतो हे ते अभ्यासत होते. यासाठी त्यांनी घोड्यांच्या शरीरातील रक्तद्रव (serum) संवेदनाक्षम (sensitized) सश्यांच्या त्वचेमध्ये टोचले. याचा सश्यांच्या संपूर्ण शरीरामध्ये परिणाम न होता केवळ ज्या ठिकाणी ते टोचले त्याच ठिकाणी सूज (edema) आणि पेशी नष्ट (necrosis) झालेल्या दिसल्या. मग आर्थस यांनी आपल्या संशोधनाची रिशे आणि पोर्टीये यांच्या ॲनाफायलॅक्सीस प्रकारच्या ॲलर्जीबरोबर तुलना केली आणि स्थानिक ॲनाफायलॅक्सीस (local anaphylaxis) किंवा आर्थस रिॲक्शन  (Arthus reaction) असे नाव दिले. अर्थातच आर्थस रिॲक्शन या प्रकारच्या ॲलर्जीचा शोध लागला.

शरीरक्रियेतील संशोधनाबरोबरच आर्थस हे एक चांगले शिक्षक होते. त्यांनी अनेक संदर्भ ग्रंथ लिहिले. निवृत्तीनंतर ते फ्रायबर्गला परत आले. येथे त्यांना  इन्स्टिट्यूट ऑफ बॅक्टेरियॉलॉजी अँड हायजीनचे संचालकपद देण्यात आले.

वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे फ्रायबर्गमध्ये निधन झाले.

संदर्भ :

  • Debus, Allen G. et al., ed., ‘Marquis’ – Who’s Who, Inc., 1968.
  • Sigerist, Henry E., ‘Introduction to ‘Maurice Arthus’ Philosophy of Scientific Investigation’, Bulletin of the History of Medicine, 14 (1943), 368–372.
  • Nicolas Maurice Arthus http://www.whonamedit.com/doctor.cfm/22.html
  • Nicolas Maurice Arthus, in World Who’s Who in Science.

समीक्षक : रंजन गर्गे