श्रॉटर, जोसेफ : ( १४ मार्च, १८३७ – १२ डिसेंबर, १८९४ )

जोसेफ श्रॉटर हे जर्मन शास्त्रज्ञ एक नावाजलेले बुरशीतज्ज्ञ होते. त्यांचे शालेय शिक्षण ब्रेसलाउ (पोलंड) येथे झाले. सन १८५५ मध्ये त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीस ब्रेसलाउ येथे आणि १८५६ मध्ये ते बर्लिन येथील फ्रिडरीख–विल्हम अकादमी येथे शिक्षणसाठी गेले. १८५९ मध्ये त्यांना डॉक्टर ऑफ मेडीसीन ही पदवी प्राप्त झाली आणि त्याच वर्षी ते पर्शिअन सैन्यात रुजू झाले. त्यांची एकूण सेवा आणि फ्रान्स पर्शिअन युद्धकाळातील महत्त्वपूर्ण योगदानामुळे १८८० साली त्यांना कर्नलपदी बढती मिळाली आणि त्यांनी ब्रेसलाउ येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. या काळात त्यांना स्पान्दौ (Spandau) रस्ताल्त (Rastalt) आणि ब्रेसलाउ (Breslau) या ठिकाणच्या सैनिक तळावर सेवा करण्याची संधी मिळाली.

ते १८८६ साली ब्रेसलाउ विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले आणि १८९० मध्ये ते प्राध्यापक झाले.  या काळात त्यांनी अनेक प्रकारच्या बुरशीचा शोध लावला. यामध्ये मुख्यत्वेकरून ॲलारुडीसकस (Aleurodiscus) सिरतिओमिक्सा (Ceratiomyxa) क्लाव्हुलीना (Clavulina) डीडालिओप्सिआ (Daedaleopsia) डीक्रानोफोरा (Dicranophora), हायग्रोफोरॉप्सीस (Hygrophoropsis), प्लास्मोपारा (Plasmopara), स्क्लेरोस्पोरा (Sclerospora), सोरोस्फेरा (Sorosphaera) इत्यादी महत्त्वपूर्ण बुरशींचा समावेश आहे. याचबरोबर या विषयावर त्यांच्या नावे अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

विविध शास्त्रज्ञ १८७५ च्या काळात जीवाणू शुद्धावस्थेत मिळवण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीने करत होते. कापलेल्या बटाट्याच्या पृष्ठभागावर जंतूंना वाढवण्याचे प्रयत्न जोसेफ यांनी करून बघितले. उकडलेल्या बटाट्याच्या पृष्ठभागावर त्यांनी रंगद्रव तयार करणारे जीवाणू शुद्ध स्वरुपात वाढवले. त्यांनी स्टार्च, अंड्यातील अल्ब्युमिन, पाव आणि मॉस यांच्या मिश्रणापासून जीवाणू  शुद्ध स्वरुपात वाढवण्यासाठी, घन मध्यम तयार केले होते. हे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले असले तरी याचा आधार घेऊनच  पुढे १८८२ ते १९०० या काळात रॉबर्ट कॉक (Robert Koch) या शास्त्रज्ञाने घन पोषण माध्यमाचा प्रश्न सोडवला.

एका वैज्ञानिक मोहिमेवरून टर्की येथे परत येत असताना त्यांचा मृत्यू झाला.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे