सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायालॉजी : (स्थापना – १९७७)

वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद (सीएसआयआर) या केंद्र सरकारच्या  संस्थेच्या अंतर्गत हैद्राबाद येथे पेशी आणि रेण्वीय जीवविज्ञान केंद्राची (सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्यूलर बायालॉजी – सीसीएमबी) स्थापना १९७७ साली झाली. युनेस्कोची मान्यता असलेल्या जगभरातील संस्थेमधील ही एक महत्त्वाची संस्था आहे. आधुनिक जैवविज्ञानातील उच्च दर्जाचे पायाभूत, सामाजिक आणि व्यावसायिक अशा तीनही प्रकारचे संशोधन या संस्थेत केले जाते. जैववैद्यक आणि रोगनिदान, उत्क्रांती आणि विकास, अकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी प्राण्यातील जनुक नियमितता, यजमान आणि परजीवी यांच्यातील परस्पर संबंध, पारपटलविज्ञान, प्रथिन संरचना, जैवमाहिती तंत्रज्ञान, जनुक व्यक्तता आणि सैद्धांतिक जैवविज्ञान ही या संस्थेतील संशोधनाची क्षेत्रे आहेत.

पुष्पमित्र भार्गव हे या संस्थेचे संस्थापक संचालक होते आणि त्यांच्या १३ वर्षाच्या कार्यकाळात संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे मोठे कार्य त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाले. सीसीएमबीचे सर्वात मोठे यश म्हणजे डीएनए अंगुलीमुद्रण तंत्रासाठी शोधून काढलेले खुणेचे डीएनए संकेत. हे संकेत भारतीय पटेरी मण्यारच्या विषाचा वापर करून वेगळे केले गेले. यामुळे भारताचे मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचले आहे. याशिवाय सुमारे सहा कोटी भारतीयांमधील आनुवंशिक हृदयविकाराचे कारक जनुक वेगळे करण्यात संस्थेस यश मिळाले आहे. हे हृदयविकार जनुक जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने काढण्याची पद्धत विकसित केली आहे. अंदमानमधील मूळ निवासी व त्यांच्या भारतातील स्थलांतरावर डीएनए अंगुलीमुद्रण तंत्रावाटे प्रकाश टाकण्यात आला आहे.

डोळ्यांच्या सांसर्गिक रोगांचे निदान करण्यासाठी पुन:संयोजित डीएनए (रीकाँबोयंट डीएनए) तंत्रावर आधारित रोगनिदान चाचणी संच विकसित केला आहे. जादा उत्पन्न देणारी रोगप्रतिरोधक भाताची जात शोधून काढण्यात आली आहे. जैवतंत्रज्ञान उद्योगात उपयोगात येणारे मूळ जीवाणू इंडिबक्टर अल्कलीफिल्सचा उपयोग विकरे आणि जैविक रेणू यांच्या निर्मितीसाठीचा शोध. एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गस्ट्रोअँटरॉलॉजीच्या मदतीने दीर्घकालीन स्वादूपिंडदाहाला कारणीभूत सीपीए १ (CPA 1) या जीवाणूचा शोध इत्यादी महत्त्वाची कामे येथे झाली आहेत.

आधुनिक जैवविज्ञानाचा प्रसार सामान्य व्यक्तीपर्यंत व्हावा यासाठी संस्थेने खूप प्रयत्न केले. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. ज्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे अशा प्राण्यांच्या संवर्धंनासाठी लॅकोनिस नावाची प्रयोगशाळा संस्थेने सुरू केली असून आधुनिक वैज्ञानिक व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भारतीय वन्यप्राण्यांचे संवर्धन करण्याचे प्रयोग हाती घेतले जातात. सीसीएमबीने रोगनिदान चिकित्सा प्रयोगशाळा स्थापन केली असून त्यात अस्थिमज्जा रोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. यासाठी त्यांनी हैद्राबादच्या निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची मदत घेतली आहे. निजाम इन्स्टिट्यूटच्या आवारात असलेल्या प्रयोगशाळेत मूलपेशी चिकित्सा आणि कृषि जैवतंत्रज्ञानावर संशोधन केले जाणार आहे.

सीसीएमबीला अनेक पारितोषिके मिळाली असून अनेक संस्थांनी त्यांच्या कार्याला मान्यता दिली आहे. इटलीच्या थर्ड वर्ल्ड ॲकेडेमी ऑफ सायन्सेसचा पुरस्कार संस्थेला मिळाला असून संशोधनात अग्रेसर असलेली दक्षिणेतील एक अग्रेसर संस्था असाही तिचा बहुमान केला. सीसीएमबीने डीएनए अंगुली मुद्रणतंत्रासाठी शोधलेल्या डीएनए संकेतास जैवविज्ञानातील सीएसआयआर टेक्नॉलॉजी परितोषिक मिळाले आहे. जैव माहितीतंत्रज्ञान क्षेत्रातील विषयावरील आंतरराष्ट्रीय वेबसाइट एपीबायोनेटचे सदस्यत्व सीसीएमबीला मिळाले आहे.

समीक्षक : मोहन मद्वाण्णा