सेंटर फॉर मायक्रोबायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट : 

सेंटर फॉर मायक्रोबायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही सायन्स टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, भोपाळ (मध्यप्रदेश) ची संस्था आहे. या संस्थेची स्थापना संशोधनामध्ये व शिक्षणामध्ये निष्णात असणाऱ्या एकूण नऊ व्यक्तींच्या समूहाने केली आहे. या नऊ व्यक्ती विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये निष्णात असून तांत्रिकदृष्ट्या अतिशय सक्षम आहेत. संस्थेच्या सल्लागार मंडळामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील अतिशय विद्वान मंडळींचा समावेश आहे. यामध्ये अत्याधुनिक व सुसज्ज अशा प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञानामधील वेगवेगळे प्रयोग केले जातात. यामध्ये वनस्पतींचे जैवतंत्रज्ञान, औद्योगिक जैवतंत्रज्ञान, रेण्वीय जीवशास्त्र (मोलेक्युलर बायोलॉजी) यामध्ये होणाऱ्या विविध प्रयोगांचा समावेश आहे. पदवी, पदव्युतर व पीएच. डी. साठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक सुविधा पुरविण्याचे महत्त्वपूर्ण काम ही संस्था करते. संस्थेमध्ये सात दिवसांपासून सहा महिन्याच्या कालावधीचे वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. यामध्ये वनस्पतीविज्ञान, जैवतंत्रज्ञान, औद्योगिक जैवतंत्रज्ञान, रेण्वीय जीवशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र या मधील वेगवेगळ्या घटकांचा समावेश असतो.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे