मार्ग्युलिस, लिन : ( ५ मार्च, १९३८ – २२ नोव्हेंबर २०११ )
लिन मार्ग्युलिस यांचा जन्म शिकागो येथे मॉरिस आणि लिओना वाइज अलेक्झांडर यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील अॅडव्होकेट होते. त्यांचा स्वत:चा रंग बनवायचा कारखाना होता. तर आई एक ट्रॅव्हल कंपनी चालवत होती. त्यांनी हाईड पार्क अॅकॅडेमी हायस्कूलमध्ये आणि शिकागो विद्यापीठातील लॅबोरेटरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले. पुढे त्यांनी लिबरल आर्ट्स या शाखेतील बी.ए. पदवी मिळवली. त्यानंतर विस्कॉनसिन युनिव्हर्सिटीत त्यांनी वॉल्टर प्लाउट (Walter Plout) आणि हॅन्स रिस (Hans Ris) यांच्या मार्गदर्शनाखाली जैवविज्ञानाचा अभ्यास केला आणि प्राणीशास्त्र व अनुवंशविज्ञानातील एमएस पदवी मिळवून नंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये मॅक्स आल्फर्ट (Max Alfert) यांच्याकडे संशोधनास प्रारंभ केला.
त्यांचा पीएच.डी.चा प्रबंध पूर्ण होण्याआधीच त्यांची सहायक संशोधक या पदावर ब्रॅन्डिस विद्यापीठात (Brandis University) नेमणूक झाली. बर्कले विद्यापीठामधून पीच.डी. मिळवल्यानंतर पुढच्या वर्षीपासून बोस्टन विद्यापीठात त्यांनी सतत २२ वर्षे जैवविज्ञानाचे अध्यापन केले. मार्ग्युलिस यांनी लिहिलेला ऑन द ओरिजिन ऑफ मायटोसिंग सेल्स (‘On the Origin of Mitosing cells’) हा शोधनिबंध जैवविज्ञानाच्या जर्नलमध्ये समाविष्ट झाला. (‘जर्नल ऑफ थिओरेटिकल बायोलॉजी’) पेशीसहजीवन (एंडो सिंबायोसिस) सिद्धांतातील प्रमुख मुद्दा म्हणून या शोधनिबंधाचा आवर्जून उल्लेख केला जातो. त्यांनी मॅसाच्यूसेटस विद्यापीठात प्रोफेसर पदावर काम केले. एवढ्या काळात त्यांच्या पेशी सिद्धांत हरितलवक व तंतुकणीकेमधील (Chlorophyll and Mitochondria) डीएनएच्या शोधाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
जैववैज्ञानिक जेम्स लव्हलॉक (James Lovelock) यांनी त्यांना ‘गाया’ (Gaia Theory) सिद्धांताबद्दल माहिती दिली. मार्ग्युलिस व जेम्स लव्हलॉक यांनी लिहिलेल्या एका संयुक्त शोधनिबंधामध्ये पृथ्वीला स्वतंत्र अस्तित्व आहे असे प्रतिपादन केले. यानुसार पृथ्वीचे जैविक आणि अजैविक घटक परस्परापासून स्वतंत्र आहेत. सजीवांनी घडवून आणलेल्या बदलामुळे सजीवांना जगता येण्यायोग्य स्थिति निर्माण होते. कारलीन श्वार्त्झ (Carlin Swartz) व मार्ग्युलीस या दोघांनी सजीव सृष्टीचे पाच भागांमध्ये पहिल्या वेळेस वर्गीकरण केले. याला पंचसृष्टी वर्गीकरण (Five kingdom Classification) असे म्हणतात.
त्यांनी भूवैज्ञानिक शाखेतही काम केले. मार्ग्युलिस यांना विज्ञान प्रत्येकास समजले पाहिजे असे वाटे. प्रतिष्ठित वैज्ञानिक असूनसुद्धा एडिंबर्ग विज्ञान मेळाव्यात त्या मुलांच्या घोळक्यात सतत असायच्या. त्यांनी अनेक लोकप्रिय पुस्तके लिहिली. प्रामुख्याने ही पुस्तके सामान्य व्यक्तीस विज्ञान समजावे म्हणून लिहिलेली आहेत. जागतिक हवामान बदलापासून लिंग उत्क्रांतीपर्यंत अनेक विषय त्यांनी पुस्तकातून हाताळलेले आहेत.
स्वत:ला त्या नवडार्विन व्युत्पत्तीचा (Neo Darwinism) पुरस्कर्ता समजत असत. पेशी सहजीवनात हरितलवक व तंतुकणिकांना एके काळी स्वतंत्र अस्तित्व होते. परंतु केंद्रकी पेशींमध्ये हरितलवक व तंतुकणिकांच्या समावेशामुळे सजीवांची उत्क्रांती अधिक वेगाने झाली. केवळ सैद्धांतिक पातळीवरील त्यांच्या म्हणण्यास त्यांच्या आयुष्यात भक्कम पुरावे मिळाले.
त्यांना मिळालेल्या पुरस्कारामध्ये नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेसमधील निवड, रशियाने गौरवलेल्या आणि अमेरिकेतील केवळ तीन प्रसिद्ध जीववैज्ञानिकांना मिळालेल्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश आणि लंडनमधील लिनियन सोसायटीने दिलेले डार्विन वॉलेस पदक यांचा समावेश आहे.
ॲमहर्स्ट येथे मेंदूतील रक्तस्त्रावामुळे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
समीक्षक : अं. पा. देशपांडे