गीयमन, रॉजर चार्ल्स लुई : ( ११ जानेवारी, १९२४ )

गीयमन रॉजर चार्ल्स लुई यांचा जन्म बर्गंडी ह्या फ्रान्सच्या पूर्व भागातील शहरात झाला. त्यांचे वडील यांत्रिकी अवजारे बनवत होते.  रॉजर गीयमन ह्यांचे एम.डी. पर्यंतचे शिक्षण फ्रान्समध्येच झाले. पुढील शिक्षणासाठी ते कॅनडामधील माँन्ट्रीयल ह्या शहरात आले. माँन्ट्रीयलमध्ये त्यांनी विख्यात संप्रेरक (hormone) वैज्ञानिक हान्स सेली ह्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले.  रॉजर गीयमन, माँन्ट्रीयल विद्यापीठात इन्स्टिट्यूट ऑफ एक्स्पेरिमेंटल मेडिसीन अँड सर्जरीमध्ये संशोधन करू लागले. १९५३ मध्ये त्यांना पीएच.डी. मिळाली. सुरुवातीला सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी बेलर कॉलेज ऑफ मेडिसीन ह्या अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातील हयुस्टन शहरात काम स्वीकारले. याच संस्थेत पुढे ते प्राध्यापक झाले. त्यापुढे त्यांनी संशोधनावर भर दिला. साल्क इन्स्टिट्यूट ऑफ बायॅालॅाजिकल स्टडीज, ला होया, कॅलिफोर्निया येथे त्यांनी संप्रेरक विज्ञानात संशोधन केले. त्यांच्या पूर्वीच्या संशोधकांना हे माहीत होते की मेंदूच्या तळाशी अध:श्चेतक (hypothalamus) भागाच्या खाली असलेल्या देठासाख्या भागाच्या टोकावर पियुषिका ग्रंथी (pituitary gland) असते. पियुषिका अनेक संप्रेरकी ग्रंथींचे नियमन करते. पूर्वी पियुषिका ग्रंथी संप्रेरक ग्रंथीची राणी म्हणून ओळखली जात असे. रॉजर गीयमन यांच्या आधी ब्रिटीश शरीररचनाशास्त्रज्ञ, जॉफ्रे हॅरीस यांचा पियुषिका ग्रंथीचे नियमन मेंदूच्या तळाशी असलेला अध:श्चेतक करतो असा अंदाज    होता.

पियुषिका ग्रंथीचे नियमन अध:श्चेतक करतो हे रॉजर गीयमन यांनी प्रयोगातून सिद्ध केले. रॉजर गीयमन ह्यांच्या चमूने अध:श्चेतक अवटु (thyroid) नियामक (TRH, वृद्धीसंप्रेरक नियामक – GHRH), कायिक वृद्धी स्थिरक सोमॅटोस्टॅटीन (somatostatin) ही तीन संप्रेरके अध:श्चेतकामध्ये स्त्रवतात हे सिद्ध केले. संवेग वहन (conduction of impulse) आणि संवेग निर्मिती शिवाय चेतासंस्थेत संप्रेरके स्त्रवतात हे त्यांनी निर्विवादपणे सिद्ध केले. हे शोधण्यासाठी पाच टन वजन भरेल एवढ्या मेंढ्यांच्या मेंदूमधून त्यांनी पन्नास लाख अध:श्चेतक वेगळे केले आणि त्यांच्या विश्लेषणातून संप्रेरके मिळवली. रॉजर गीयमन यांनी वेदनांची जाणीव न होऊ देणारा व वेदना शामकांचा प्रथिन संप्रेरकांचा एक नवा गट शोधून काढला.

मेंदू, पियुषिका, अध:श्चेतक आणि अवटु, वृषण, बीजांडे यातील संप्रेरकांचे परस्पर नियंत्रण समजल्यामुळे शरीराचे संप्रेरक संबंध गर्भधारणा, दुग्धस्त्रवण (lactation), प्रसूती यांचा अभ्यास सुरू झाला. रॉजर गीयमन, अँण्ड्र्यू श्याली आणि रोसलीन यालो या तिघांना पथदर्शक कामाबद्दल १९७७ सालचे शरीरक्रियाशास्त्र आणि वैद्यक विषयाचा नोबेल पुरस्कार दिला गेला.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा