गर्टी, थेरेसा कोरी : ( १५ ऑगस्ट, १८९६ – २६ ऑक्टोबर, १९५७ )
गर्टी थेरेसा कोरी यांचा जन्म चेकोस्लोव्हाकियाची राजधानी प्राग (Prague) येथे झाला. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत घरी शिक्षण घेतल्यानंतर लाइसिअम येथील मुलींच्या शाळेत त्या दाख़ल झाल्या.

पदवीनंतर तेट्चेन (Tetschen) रिअल जिमनॅशिअममधून प्रवेश चाचणी उत्तीर्ण झाल्या. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी प्राग विद्यापीठातून औषधनिर्माण विज्ञानातील पदवी मिळविली. गर्टी यांचे काका औषधविज्ञातील शिक्षक होते. त्यांच्या आवडी जुळल्याने त्यांनी एकत्र आपला पहिला शोधनिबंध प्रसिद्ध केला. औषधनिर्माण विज्ञानातील डॉक्टरेट त्यांनी मिळविली. त्यांच्या विवाहानंतर त्या व त्यांचे पती या दोघांना व्हिएन्नामधील अनेक दवाखान्यांमधे रुजु होण्याची संधी होती. व्हिएन्नामधील अस्थिर स्थितीमुळे त्यांनी कॅरोलिनेन बालरुग्णालयात दोन वर्ष काम केले. नंतर ते अमेरिकेतील बफॅलो या शहरात आले. स्टेट इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ मॅलिग्ननंट डिसिजेस येथे विकृतिशास्त्रज्ञ म्हणून त्यांची नेमणूक झाली. येथे एकत्र काम करण्यापासून त्याना परावृत्त करण्याचे प्रयत्न झाले. यावर मात करत गर्टी आणि कार्ल यांनी ग्लुकोज (शर्करा) चयापचय प्रक्रियेवर संशोधन केले. ऊर्जानिर्मितीतील विविध बदलांचे हे संशोधन नाविन्यपूर्ण ठरले. औषधनिर्माण विज्ञानातील हे संशोधन कोरी चक्र म्हणून ओळखले जाते. रेखितस्नायू (striated muscles) चयापचयामध्ये ग्लायकोजेनचे रूपांतर लॅक्टिक आम्लामध्ये होत असते. लॅक्टिक आम्ल स्नायूमध्ये साठत राहिल्यास स्नायू लवकर थकतात. त्यात वेदना होतात. यासाठी लॅक्टिक आम्लाचे पुन्हा ग्लायकोजनमध्ये रूपांतर होण्यासाठीची विकरे यकृतात असतात. गर्टी कोरी यांनी या चक्रावरील केलेल्या मूलभूत संशोधनामुळे या चक्रास कोरी चक्र असे नाव मिळाले आहे. हे चक्र स्नायूंना एटीपीचा अखंड पुरवठा होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
पुढे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन यांनी कार्ल याना औषधिक्रियाविज्ञान विभाग प्रमुख म्हणून केले. परंतु गर्टी यांना समान गुणवत्ता असताना संशोधन सहायकाचे पद दिले. १९४७ साली कार्ल व गर्टी यांना शरीरक्रियाविज्ञान व औषधनिर्माण विज्ञानातील नोबेल पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळविणा-या त्या पहिल्या अमेरिकन महिला जीवरसायनशास्त्रज्ञ होत्या. नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर गर्टी जीवरसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून रुजु झाल्या. त्यांना त्यानंतर अनेक पुरस्कार मिळाले.
त्या अस्थिमज्जातंतुमयता-मज्जातंतुकाठीण्य या दुर्धर कर्करोगाने आजारी असताना (Osteo-Myelofibrosis also myelofibrosis) त्यांनी संशोधन सुरुच ठेवले. मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. गर्टी व कार्ल यांच्या संशोधनाचा सन्मान म्हणून चंद्रावरील एका विवराला (क्रेटर) कोरी क्रेटर असे नाव दिले आहे.
संदर्भ :
समीक्षक : मोहन मद्वाण्णा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.