वॉरेन, रॉबिन : ( ११ जून, १९३७ )

रॉबिन वॉरेन यांचा जन्म ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड येथे झाला. रॉबिन हा मद्य उत्पादक रॉजर वॉरेन आणि नर्स असलेल्या हेलेन वेर्को यांचा सर्वात मोठा मुलगा. आईच्या प्रभावामुळे रॉबिन यांना वैद्यकिय व्यवसायाबद्दल ओढ निर्माण झाली. वेस्टबॉर्न पार्कमधून प्राथमिक शिक्षण आणि सेंट पीटर्स कॉलेजमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी कॉमनवेल्थ शिष्यवृत्ती मिळाली. अ‍ॅडलेड विश्वविद्यालयातून एमबीबीएस पदवी पूर्ण केल्यानंतर ते निवासी वैद्यकीय अधिकारी आणि रॉयल अ‍ॅडलेड हॉस्पिटल येथे उपचारात्मक मानसशास्त्र विभागात प्रबंधक म्हणून रुजु झाले. येथील कामाचे स्वरुप रक्त व अस्थीमज्जा नमुन्यांची नोंद करणे, मल-मूत्र चिकित्सा, त्यात आढळणारे रोगकारक परजीवीं जीवाणू, विषाणू तसेच त्वचा व नखांमधे आढळणाऱ्या बुरशी यांवरील विविध चाचण्या करणे या प्रकारचे होते. विकृतीशास्त्र अभ्यासात रस निर्माण झाल्याने वर्षभरानंतर ते विकृतीशास्त्र विभागात व्याख्याता म्हणून काम करू लागले. मुख्यत्वे रोगग्रस्त शरीर आणि ऊती विकृतीशास्त्राशी संबंधित असल्याने रॉयल मेलबोर्न येथे उपचारात्मक विकृतीशास्त्र विभागाचे प्रबंधक म्हणून काम पाहू लागले. त्यांना त्यावेळी डेव्हिड कॉलिंग आणि बर्था अनगार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना रुधिरशास्त्र (haematology) आणि सूक्ष्मजीवशास्त्राचा (Microscopy) अभ्यास करता आला.

१९७० च्या सुमारास जठर ऊतीपरीक्षण (gastric biopsy) करण्यास नुकतीच सुरुवात झाली होती. जठरव्रण (पेप्टीक अल्सर) हे तणावपूर्ण जीवनशैली आणि त्यामुळे जठररसातील आम्लाचे अतीस्त्रवण यामुळेच होतात असा समज होता. रॉबिन यांना एका रुग्णाच्या जठर ऊती परिक्षणात हेलिकोबॅक्टर पायलोरी  या जीवाणूचे अस्तित्व निदर्शनास आले. आम्लयुक्त वातावरणात जीवाणू जगू  शकत नाहीत असा समज सर्वमान्य असल्याने वैज्ञानिकांनी त्यांचे निरीक्षण फेटाळून लावले.

बॅरी मार्शल यांच्यासोबत वैद्यकिय विकृतीशास्त्राचा अभ्यास त्यांनी पुन्हा सुरु केला. सुमारे शंभर आद्यांत्र व्रण (duodenal ulcer), जठर व्रण (gastric ulcer) व जठरशोथ (gastritis) ग्रस्तरुग्णांचे ऊतीपरीक्षण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आद्यांत्र व्रण, जठर व्रण जठरशोथग्रस्त सर्व रुग्णांच्या ऊतीपरीक्षणात जीवाणूंचे अस्तित्व आढळले. सात वर्षांच्या अभ्यासानंतर अन्न मार्ग व्रणांचे कारक हेलिकोबॅक्टर पायलोरी  जीवाणू संसर्ग आहे. योग्य उपचारानंतर हे व्रण पूर्ण बरे होऊ शकतात. हेलिकोबॅक्टर पायलोरी  जीवाणू संसर्ग निदानासाठी सी-युरिया ब्रेथ टेस्ट (C-urea breath-test) ही सुलभ चाचणी त्यांनी विकसित केली. त्याबरोबर या रोगांवरील नवीन उपचारपद्धती विकसित झाली. या पद्धतीत प्रतिजैविके (antibiotics) आणि आम्लस्राव प्रतिबंधक (acid-secretion inhibitors) यांचा समावेश होता. जपान, जर्मनी आणि इतर देशात त्यांना व्याख्यानासाठी बोलावल्यामुळे त्यांच्या संशोधनाचे महत्व जागतिक वैद्यकीय जगताच्या लक्षात आले. विकृतीशास्त्रातील या योगदानाचा सन्मान म्हणून २००५ साली बॅरी मार्शल यांच्यासह शरीरक्रियाविज्ञान व वैद्यक विभागातील नोबेल पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

रॉबिन यांना मिळालेल्या इतर पुरस्कारामध्ये वॉरेन अल्बर्ट फाऊंडेशन पुरस्कार, पॉल एहर्लिच ल्युडविग डार्मस्टेइडर पुरस्कार आणि कंपॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा बहुमानाचा पुरस्कार यांचा समावेश आहे.

संदर्भ :

 समीक्षक : मोहन मद्वाण्णा


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.