वॉल्ड, जॉर्ज डेविड : ( १८ नोव्हेंबर, १९०६ – १२ एप्रिल, १९९७ )

जॉर्ज डेविड वॉल्ड यांचा जन्म अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झाला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी एका मित्राच्या सहाय्याने रेडिओ तरंगग्राही बनवला होता. आपल्या मुलाची तंत्रज्ञानाची आवड बघून त्याच्या अल्पशिक्षित पालकांनी त्याला प्लंबर, सुतार, इलेक्ट्रीशिअन असे शिक्षण देणाऱ्या ब्रुकलीन तंत्रशाळेत घातले.

त्यांनी आपल्या प्रयत्नाने न्यूयॉर्क विद्यापीठाची विज्ञानातील पदवी आणि कोलंबिया विद्यापीठाची प्राणीशास्त्रातील पीएच्.डी. मिळवली. सेह्लीग हेख्त ह्या शरीर क्रियावैज्ञानिकाच्या मार्गदर्शनामुळे त्यांना प्राणी व मानवी आणि दृष्टीसंबंधी संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली. डोळ्यातील प्रकाशसंवेदी थर डोळ्याच्या (रेटीना) पडद्यात प्रकाश संवेदी काष्ठपेशी (रॉड) आणि शंकूपेशी पेशी असतात. काष्ठपेशी आणि शंकूपेशीमध्ये रंगद्रव्ये म्हणजे वर्णके असतात. तर काष्ठपेशीमध्ये ऱ्होडॉप्सिन हे रंगद्रव्य असते. जॉर्ज वॉल्ड यानी काष्ठपेशीतून ऱ्होडॉप्सिन वेगळे करून कोणत्या तरंगलांबीच्या प्रकाशाचे, किती शोषण होतेते पंक्ति अनुदीप्तिमापीच्या (spectrometer) सहाय्याने शोधून काढले. शंकूपेशींमध्ये आयोडॉप्सिन (Iodopsin) हे रंगद्रव्य असते हे जॉर्ज वॉल्डनी दाखवून दिले. ऱ्होडॉप्सिन (Rhodopsin) व आयोडॉप्सिन रंगद्रव्ये डोळ्याच्या पडद्यातून वेगळी करणे मात्र त्यांना शक्य झाले नाही. आयोडॉप्सिनवर प्रकाशाचा परिणाम होऊन त्याचे विघटन व तसे त्यानंतर तयार झालेली संयुगे यावरील संशोधन पुढील काळात झाले.

प्रकाश तरंगामुळे डोळ्याच्या पडद्यातील रंगद्रव्यातील जीवरासायनिक बदल हा त्यांच्या संशोधनाचा केद्रबिंदू होता. जॉर्ज वॉल्ड ह्यांच्या प्रयोगांमधून सिद्ध झाले की डोळ्याच्या पडद्यात जीवनसत्त्व ‘अ’ चे रेणू रासायनिक बदलांचे कारण आहेत. जॉर्ज वॉल्ड यांच्या अभ्यासामुळे दृष्टि, रंगदृष्टि आणि रंगांधळेपणा याबद्दल बरीच महत्त्वाची माहिती मिळाली. यातील एक म्हणजे जीवनसत्त्व -अ च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो.

ऱ्होडॉप्सिनवर प्रकाश पडला की विघटनाने त्यातून दोन प्रकारचे रेणू तयार होतात. ऑप्सिन प्रथिन आणि जीवनसत्त्व-अ युक्त  रेटिनाल रेणू. रेटिनालचे मूळ नाव रेटिनिन आहे. रासायनिकदृष्ट्या ते रेटिनाल्डीहाईड आहे. हे स्पष्ट करणाऱ्या संशोधनाबद्दल जॉर्ज वॉल्ड यांना हल्दान हार्ट्लाईन आणि राग्नार ग्रानिट या शास्त्रज्ञांबरोबर १९६७ सालचा शरीरक्रियाशास्त्र आणि वैद्यक विषयाचा नोबेल पुरस्कार दिला गेला.

जॉर्ज वॉल्ड हे उत्तम शास्त्रज्ञ होतेच शिवाय उत्तम आणि निर्भय नागरिकही होते. प्रसंगी ते सरकार विरोधी भूमिका घ्यायला कचरत नसत. आण्विक अस्त्रे नकोत अशी भूमिका ते ठामपणे सतत मांडत राहिले.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा