माहेश्वरी, पंचानन : ( ९नोव्हेंबर,१९०४– १८मे,१९६६ ) पंचानन माहेश्वरी यांचा जन्म राजस्थानातील जयपूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण जयपूरमधील एविंग ख्रिस्तियन स्कूलमध्ये झाले. त्यानंतर ते एविंग ख्रिस्तियन कॉलेजातून बी. एस्सी आणि एम. एस्सी झाले. वस्तुत: वैद्यकीय शिक्षणाकडे कल असलेल्या माहेश्वरी यांच्यावर त्यांच्या महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक विनफीड दुडगॉन (Winfied Dudgeon) यांचा प्रभाव असल्याने ते वनस्पतीशास्त्राकडे ओढले गेले. माहेश्वरी यांनी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शरीर- रचनाशास्त्र (anatomy) आणि भ्रूणशास्त्र ( embryology) याविषयात पीएच्.डी. केले. त्यांनी आग्रा, लखनौ, अलाहाबाद, ढाका आणि दिल्ली येथे अध्यापनाचे काम केले. वनस्पतीशास्त्रातील सर्व उपविषयांचा त्यांचा अभ्यास चांगला असल्याने, ते एक विद्यार्थीप्रिय शिक्षकहोते. इंग्लंड आणि यूरोपमधील जॉर्ज टीश्लर (George Tischler) आणि कार्ल श्राफ (Karl Scharf) या वनस्पतीशास्त्रज्ञांशी त्यांचा संपर्क होता. यूरोप आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञ त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे अभ्यासासाठी (sabbaticals) येत असत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागात भ्रूणशास्त्र आणि ऊतीशास्त्राचे संशोधन केंद्र स्थापन करून नावारूपाला आणले होते. त्यांनी सपुष्प वनस्पतींची फलनक्रिया (Fertilization) घडवून आणली.  याचा उपयोग पुढे सपुष्प वनस्पतीमधील लैंगिक विसंगतीचा अडथळा दूर करण्यासाठी झाला. प्रस्थापित भ्रूणशास्त्र तज्ञांच्या मते सपुष्प वनस्पतींमधील भ्रूणपोष ही एक अपंग ऊती आहे आणि त्यात रूपजननाचा (मॉर्फोजेनेसीस) अभाव असतो. माहेश्वरी स्कूलने भ्रूणपोषणात रुपजननाचे पुरावे आपल्या संशोधनाद्वारे दिले. माहेश्वरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भ्रूणशास्त्रातील गुणवैशिष्ट्यांचा उपयोग वर्गीकरणातील अडचणी दूर करण्यासाठी केला. अगुणीत (हॅप्लोईड)  वनस्पती मिळवण्यासाठी परागकोश (अंथर) कल्चरचा उपयोग केला. त्यांच्या या शोधाने एक नवे दालन उघडले गेले. या तंत्राचा उपयोग पुढे अनेक पिकांमध्ये विविधता निर्माण करण्यात झाला. माहेश्वरी यांनी बो-हाविया (Boerhavia) आणि रुमेक्स (Rumex) या वनस्पतींच्या अनियमित द्वितीय वाढीवर (Anomalous secondary growth) संशोधन केले. पाण्यात वाढणाऱ्या जगातील सर्वात लहान बीजीय वनस्पती वोल्फि या चुकीच्या विचाराने उत्क्रांतीमधील पहिला टप्पा समजली जायची. पंचानन माहेश्वरी यांच्या संशोधनामुळे असे लक्षात आले की ही वनस्पती अत्यंत भ्रूणशास्त्रीय वैशिष्ट्ये दर्शविते आणि तिची उत्पत्ती `अळू` कुळातील वनस्पतीपासून पश्चगमापी  (Retrogressive) उत्क्रांतीद्वारे झाली. माहेश्वरी यांनी बीजाणूशास्त्र (Palynology),पेशीशास्त्र (Cytology), रासायनिक वर्गीकरणशास्त्र (Chemotaxomy) आणि शरीररचनाशास्त्र या सर्वांचा एकत्रित अभ्यास करून वर्गीकरण मांडण्यावर भर दिला. हा दृष्टीकोन नंतर अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठातील वर्गीकरणतज्ज्ञ जी. एच. लॉरेन्स यांनी त्यांच्या टॅक्सोनॉमी ऑफ व्हेस्क्यूलर प्लांटस  या पुस्तकात वापरला.

पंचानन माहेश्वरी यांनी ‘फायटो मॉर्फोलॉजी’ नावाच्या विज्ञानपत्रिकेचे प्रकाशन सुरू केले आणि बोटॅनिका नावाचे वनस्पतीशास्त्रावर एक मासिक सुरू केले. दिल्लीच्या एनसीईआरटी संस्थेसाठी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके लिहिली.

न इंट्रोडक्शन टू एम्ब्रोयॉलॉजी ऑफ अँजिओस्पर्स  हे त्यांचे पुस्तक जगात सगळीकडे वापरले जाते. हे पुस्तक रशियन भाषेतही भाषांतरीत झाले आहे. त्यांनी नवी दिल्ली येथील वनसंपदेची  सचित्र  माहिती प्रसिद्ध केली आहे. तसेच त्यांचे रिसेंट ॲडव्हान्सेस इन एम्ब्रोयॉलॉजी हे पुस्तकही प्रकाशित आहे.

त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी आपापले शोधकार्य त्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माहेश्वरी यांना पुढील नावाने अर्पण केले आहे, Panchananiajaipurensis ( एका बुरशीवरील काम), Isoetespanchananii, oldenlandiamaheshwarii.

माहेश्वरी यांना ब-याच भारतीय आणि परदेशी सायन्स ॲकेडेमींच्या  फेलोशिप्स मिळाल्या असून त्यातील सर्वोच्च फेलोशिप लंडनच्या रॉयल सोसायटीची  एफआरएस ही आहे. त्याशिवाय त्यांना इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. १९६८ सालच्या इंडियन सायन्स कॉंग्रेसचे ते जनरल प्रेसिडेंट म्हणून नाम निर्देशित झाले होते, पण तत्त्पूर्वीच त्यांचे अकाली निधन झाले.

संदर्भ :

  • ‘Resonance’, March, 2003
  • ‘Current Science’,Vol.87(2), 25 December, 2004

समीक्षक: नागेश टेकाळे