जोशी, आर. एन. (रामचंद्र नारायण) : (१३ एप्रिल, १९३७ –  ) रामचंद्र नारायण जोशी यांचा जन्म कोल्हापूर, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण आर्यर्विन हायस्कुल, कोल्हापूर येथे झाले. त्या नंतर त्यांनी कोल्हापूरमधील राजाराम कॉलेजमधून बी. एससी. पदवी प्राप्त केली. त्यावेळी तेथे वनस्पतीशास्त्रामधील उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे ते मुंबईला आले आणि तेथील शासकीय विज्ञान संस्थेमधून (Institute of Science) एम. एस्सी. संशोधन (M. Sc. by Research) आणि पीएच्. डी. ही उच्च पदवी वनस्पतीविकृतीशास्त्रामध्ये (Plant Physiology) १९६४ साली प्राप्त केली. डॉ. जोशी यांना महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारच्या विविध शिष्यवृत्या उच्च शिक्षण घेताना प्राप्त झाल्या होत्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वनस्पतीशास्त्र या विषयाचे अध्यापन केले. अध्यापनाबरोबरच पर्ण प्रथिन (Leaf Protein) या विषयात संशोधन करून विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्थ केले. डाळवर्गीय वनस्पती, काही गवतांचे वाण आणि कंद, भाज्यांची टाकून दिलेली हिरवी पाने, पर्ण प्रथिनांबरोबरच दुभत्या जनावरासाठी पौष्टिक आहार सुद्धा देतात हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य गाभा होता. स्त्रिया आणि मुले यांच्या आहारातील प्रथिनांची कमतरता कशी भरून काढता येईल या विचारांनी प्रेरित होऊन याच विषयातील पुढील संशोधनासाठी ते १९६७ मध्ये आंतराष्ट्रीय ख्यातीचे जीवरसायनशास्त्रज्ञ डॉ. एन. डब्लु. पिरी (N. W. Pirie) यांच्या मार्गदर्शनासाठी इंग्लंडमधील रॉथमस्टेड (Rothamsted Experimental Station) येथे गेले. मायदेशी परत येताना त्यांना रॉयल सोसायटी (Royal Society) व आय.बी.पी. (International Biological Programme) या आंतरराष्ट्रिय संस्थांकडून पानामधून प्रथिने वेगळी करण्यासाठी अद्यावत यंत्र सामग्री भेट मिळाली. डॉ. जोशी यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून पर्ण प्रथिनांवर उच्च दर्जाचे संशोधन केले. ‘मील्सफॉर मिलियन फॉउंडेशन’ (Meals for Millions Foundation, U.K) आणि स्वीडिश सरकारच्या फेलोशिप त्यांना या संशोधनासाठी प्राप्त झाल्या. ते अमेरिकेतील टेनेसी विद्यापीठात (Tennessee State University) १९८९-९० या काळात अभ्यागत प्राध्यापक होते. डॉ. जोशी यांनी आंतराष्ट्रीय शोधपत्रिकांमध्ये १५० च्यावर शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १९ विद्यार्थ्यांनी पर्ण प्रथिनामध्ये उच्च संशोधन करुन पीएच्. डी. पदवी प्राप्त केली.

औरंगाबाद येथे १९८२ साली झालेल्या पर्ण प्रथिन परिषदेचे (International Conference on Leaf Protein Research) ते अध्यक्ष होते. औरंगाबाद जवळील बिडकीन येथे त्यांनी पर्ण प्रथिन प्रकल्प राबवला आणि गरीब मुलांसाठी प्रथिनांची कमतरता पडू नये यासाठी पर्ण प्रथिने मोठया प्रमाणावर पुरवण्याची योजना तयार करुन प्रत्यक्ष अमलात आणली.

जोशी भारतीय सांख्यकी संस्था, कलकत्ता (Indian Institute of Statistics) या संस्थेच्या कार्यकारणी मंडळावर तांत्रिक सल्लागार होते. त्यांनी सोसायटी फॉर ग्रीन व्हेजीटेशन रिसर्च (Society for Green Vegetation Research) आणि इंडियन बोटॉनिकल सोसायटी (Indian Botanical Society) चे उपाध्यक्ष पद सुद्धा भूषविले आहे. जोशी यांनी औरंगाबाद येथील पर्ण प्रथिन प्रकल्पानिमित्त भारतातील व परदेशातील (इंग्लंड, यू.एस.ए., कॅनडा, आयर्लंड, स्वीडन, जपान, इटली, इजिप्त,थायलंड, रशिया, फ्रान्स इ.) अनेक संस्था व विद्यापीठातून निमंत्रक म्हणून व्याख्याने दिली आहेत. मराठी भाषेमध्ये त्यांनी पर्ण प्रथिनावर ‘पर्णसत्व :पौष्टिक अन्न वरदान’ या माहितीपूर्ण पुस्तकाची निर्मिती सुद्धा केली आहे. भारत सरकारने  १९८२ साली प्रा. जोशी यांच्या पर्ण प्रथिन संशोधनावर आधारित मुल्कराज आनंद लिखित आणि दिग्दर्शित एक सुरेख माहितीपट तयार करून देशात सर्वत्र प्रसिद्ध केला.

संदर्भ :

  • जोशी, रा. ना., पर्णसत्व: पौष्टिक अन्न वरदान, कौशिक प्रकाशन, सातारा.
  • Graham, H and Telek, L. Leaf Protein Concentrates, AVI Publishing Co., Westport, CT, USA. (1983).
  • Pirie, N.W., Leaf Protein and its by-products in Human and Animal Nutrition, Cambridge University Press, U.K. 2nd Ed. 1987

मीक्षक : शरद चाफेकर