नाईक, वासुदेव नारायण : ( २० जून, १९३३ –  १९ ऑक्टोबर, २०१२)

वासुदेव नारायण नाईक यांचा जन्म मराठवाडयामधील परभणी जिल्हयात असलेल्या पालम या लहान गावात झाला. शालेय शिक्षण परभणी येथे पूर्ण करुन ते कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजातून बी.एस्सी. झाले. वनस्पतीशास्त्रात एम.एस्सी. करण्यासाठी त्यांनी मुंबईचे सिद्धार्थ महाविद्यालय निवडले. वनस्पतींची ओळख, त्यांचे वर्गीकरण हा त्यांच्या आवडीचा आणि संशोधनाचा विषय होता म्हणून एम.एस्सी. झाल्यावर ते बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (Botanical Survey of India) या भारत सरकारच्या वनस्पती सर्वेक्षण केंद्रात वैज्ञानिक म्हणून रुजु झाले. शिलाँग परिसरात पाच वर्षे काम करुन ते पुन्हा अध्यापन क्षेत्राकडे वळले. वनस्पतींना त्यांच्या बाह्य रुपावरुन आणि पुष्परचनेवरुन ओळखून त्या क्षेत्रात विद्यार्थ्याना शिकवून तज्ञ निर्माण करणे, हा हेतू त्यामागे होता.

श्री रामकृष्ण महाविद्यालय, उस्मानाबाद येथे वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाच त्यांनी ‘टॅक्सानामी’ (Taxonomy) या विषयात संशोधनास सुरुवात करुन पीएच्.डी. पदवी प्राप्त केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विभागामध्ये अध्यापक म्हणून रुजु झाले. शिलाँगच्या अनुभवाचा त्यांना विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात विद्यार्थ्यांबरोबर संशोधनात खूपच फायदा झाला. प्रपाठक म्हणून ते १९९२ साली सेवानिवृत्त झाले. मराठवाडयामधील गवतांच्या विविध प्रजाती हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य गाभा होता. नाईक यांचे गवत कुळावरील (Family Poaceae) संशोधन आजही अनेकांना मार्गदर्शक ठरत आहे. त्यांनी त्यांच्या संशोधक विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन Alternanthera, Alysicarpus, Amaranthus, Blumea, Chlorophytum and Dipcadii या वनस्पती जातींवर सखोल अभ्यास केला.

नाईक यांचा फ्लोरा ऑफ मराठवाडा (‘Flora of Marathwada’) हा प्रबंधरुपी ग्रंथ त्यांच्या सपुष्प वनस्पतींच्या कामाचा नमुना आहे. त्यांनी त्यांच्या अध्यापन आणि संशोधन कालखंडात ७५ पेक्षा जास्त संशोधन निबंध आणि १२ पुस्तके प्रकाशित केली आणि अनेक विद्यार्थांना एम.एस्सी. आणि पीएच्.डी. साठी मार्गदर्शन केले. त्यांचे टॅक्सानॉमी ऑफ अँजीओस्पर्म (‘Taxonomy of Angiosperms’) हे प्रसिद्ध झालेले पुस्तक विद्यार्थी आणि शिक्षक आजही वापरत आहेत. आतापर्यंत या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. नाईक यांना २००० साली त्यागी सुवर्णपदक दिले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागामधील संग्रहालयात असलेले ८०,००० वनस्पतींचे नमुने काळजीपूर्वक जतन केले जाणे, हे व्ही. एन. नाईक यांच्या कार्याचे प्रतीक आहे. त्यांच्या कारकिर्दीत याच संग्रहालयातून २००९ सालापर्यंत Aarhus University Herbarium, Denmark; Royal Botanic Garden, Kew, England; Rijkx Herbarium, Leiden, Netherlands and Botanical Institute of Zurich, Switzerland, येथे अनेक वनस्पतींची देवाणघेवाण झाली. अनेक संशोधक विद्यार्थ्यांनी शोधलेल्या नवीन वनस्पती प्रजातींना नाईक यांचे नाव त्यांच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे. Alysicarpusnaikianus, Crotolarianaikiana, Fimbristylisnaikii आणि  Utricularianaikii ही त्याची काही उदाहरणे आहेत.

नाईक यांचा औषधी वनस्पतींचा विशेष अभ्यास होता. त्यांचे Identification of Common Indian Medicinal Plants हे पुस्तक वनस्पती आणि आयुर्वेद शास्त्राचा अभ्यास करणार्‍यांसाठी उपयोगी पडते. त्यांचे मराठवाडयातील सामान्य वनौषधी  हे पुस्तक अभ्यासनीय आहे.

वासुदेव नाईक आयुष्याच्या अंतापर्यंत संशोधन कार्यात मग्न होते. महाराष्ट्रातील वनौषधी संपत्तीच्या सर्वेक्षणासंबंधित राजीव गांधी विज्ञान-तंत्रज्ञान आयोगाने पुरस्कृत केलेल्या प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन, हे त्यांचे वनस्पतीशास्त्रासाठी शेवटचे योगदान ठरले.

संदर्भ :

  • Naik, V.N. (1998). Flora of Marathwada-Vols.1&2, Amrut Prakashan, Aurangabad,1182pp.
  • Naik, V.N. (2012) Identification of Common Indian Medicinal Plants, Scientific publishers, New Delhi.
  • Naik, V.N. (1998) मराठवाडयातील सामान्य वनौषधी, अमृत प्रकाशन, औरंगाबाद

मीक्षक : शरद चाफेकर