देशपांडे, कालिदास शंकर : (२९ ऑगस्ट,१९४० – १६ ऑक्टोबर, २०००) कालिदास शंकर देशपांडे यांचा जन्म शिवणी, जि. लातूर येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण परभणी जिल्हयामधील पालम आणि गंगाखेड येथे पूर्ण केले. पदवीपर्यंतचे शिक्षण विज्ञान महाविदयालय, नांदेड (पूर्वीचे पिपल्स कॉलेज) येथे पूर्ण करुन वनस्पती शास्त्रामधील उच्च शिक्षणासाठी त्यांनी मराठवाडा विदयापीठ, औरंगाबाद (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ) येथे प्रवेश घेतला. याच विदयापिठातून त्यांनी १९६७ मध्ये पीएच.डी ही पदवी प्राप्त केली. विदयापीठ अनुदान आयोगाने त्यांना जेष्ठ संशोधक म्हणून १९६७ ते १९७० या कालखंडात “हेलमिन्थोस्पोअर” (Helminthospore)या तृणधान्यावर त्यांच्या वाढीच्या कालखंडात वेगाने पसरणार्‍या बुरशीवर (Fungi) काम करण्यास शिष्यवृत्ती दिली.

१९७० साली कालिदास देशपांडे, विज्ञान महाविदयालय, नांदेड येथे नव्याने स्थापन झालेल्या वनस्पतीशास्त्राच्या पदव्युत्तर शाखेचे पहिले विभाग प्रमुख झाले आणि ३६ वर्षाच्या अध्यापन आणि संशोधन क्षेत्रामधील प्रदिर्घ अनुभवानंतर विज्ञान महाविदयालय, नांदेड चे प्राचार्य म्हणून २००० साली सेवानिवृत्त झाले.

शेतजमिनीमध्ये रुजणार्‍या बियांना बुरशीचा संसर्ग (seed borne fungal diseases) होण्याची शक्यता जास्त असते. कालिदास देशपांडे यांनी मराठवाडा विभागामधील विविध पिके, त्यांची बियाणे आणि या बियाणांना जमिनीमध्ये रुजल्यानंतर होणारा बुरशीचा संसर्ग याचे सविस्तर वर्गीकरण केले व बुरशीपासून संरक्षण मिळविण्यासाठी शेतकर्‍यांना विविध उपाय योजना सुचविल्या. बुरशी वर्गीकरणामध्ये खालच्या स्तरावर असलेल्या डिटेरोमायसीटीस (Deteromycetes) वर्गातील बुरशीच्या कणावर (Spores)  त्यांनी मौलिक संशोधन करुन या बुरशीव्दारे निर्माण होणारे सेल्युलेज (Cellulase) या विकराची निर्मिती क्षमता आणि प्रतवारी ठरविली. त्याचे हे संशोधन या विकराची मोठया प्रमाणावर निर्मिती करण्यासाठी आज उपयोगी ठरले आहे.

औषधी वनस्पतीवर संशोधन करताना त्यांनी त्यांच्यामधील रोगजंतू नाशक घटकांचा (Antimicrobial agents) अभ्यास केला. कृत्रिमरित्या फळ पिकवणे, कंपोस्ट क्रियेची गती वाढ , विकरांच्या माध्यमातून शेतीजन्य कचर्‍याची विल्हेवाट, तृणधान्यावरील कवकसृष्टी (Aerobiology), तेलबीयांचे बीज आरोग्य, प्रदुषणास संवेदनशील असणार्‍या वनस्पती, औषधी वनस्पतीचे उतीकरण (Tissue Culture) तसेच त्यांच्या रोपांची नर्सरी, प्रशिक्षण आणि तंत्र हस्तांतरण या क्षेत्रात कालिदास देशपांडे यांचे संशोधन उल्लेखनिय आहे. बुरशी क्षेत्रामधील आपल्या संशोधनाचा शेतकर्‍यांना फायदा व्हावा म्हणून त्यांनी सायन्स कॉलेज, नांदेड येथे प्राचार्य असताना वनस्पती विकृती चिकित्सालय (Plant Disease Clinic) सुरु केले होते. या चिकित्सालयाची सेवा प्रत्येक शेतकर्‍यापर्यंत पोहचविण्यासाठी ते नियमितपणे महाविदयालयाच्या प्रांगणात शेतकरी मेळावे घेत. मराठवाडा तसेच सीमेवरील आंध्रप्रदेशामधील अनेक शेतकरी त्यांच्या वनस्पती रुग्णालयात रोगग्रस्त वनस्पतींचे नमुने घेऊन येत, या मेळाव्यात पीकावर पडलेल्या रोगांची संपूर्ण माहिती व उपचार पद्धती शेतकर्‍यांना समजावून सांगण्यात येत असे.

कालिदास देशपांडे यांना ब्रिटनच्या इम्पिरियल कॉलेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, रॉथमस्टेट (Imperial Collages of Science and Technology, Rothamstead) येथे वनस्पती विकृती शास्त्रात (Plant Pathology)  विशेष संशोधन करण्याची संधी मिळाली. त्यांना अनेक पारितोषिकांनी गौरविण्यात आले त्यामध्ये निजाम सरकार रियासत शिष्यवृत्ती आणि डिसेंबर १९९९ मध्ये झालेल्या आठव्या पर्यावरण शास्त्राच्या विश्व परिषदेतील तीन सुवर्ण पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य आयुर्वेद मंडळाचे ते स्वीकृत सदस्य होते.

संदर्भ :

  • “Spore content of air over groundnut field” paper presented in 1st International congress of plant pathology, London (1968)
  • Deshpande K.S and Kulkarni G.M (1990) “ Metabolities of seed borne fungi in relation to the viability of some oil seeds”. Indian Botanical Reporter, Vol:I,20-21
  • Deshpande K.S and Wadge S.S (1980) “Nutritional factors affecting cellulase production by Alternariatenuis Auct” Science and Culture. Vol.46,261-263

समीक्षक : शरद चाफेकर