गुजरातमधील जुनागढ येथील गिरनारजवळील प्रसिद्ध प्राचीन तलाव. इ. स. पू. चौथ्या शतकापासून ते इ. स. पाचव्या शतकापर्यंत या जलाशयाची सातत्याने काळजी घेतली गेली, हे विशेष. अद्यापि अवशेष स्वरूपात हे स्थळ पाहायला मिळते.

मौर्य वंशाचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य (कार. इ. स. पू. ३२२—२९७) याचा प्रांत प्रतिनिधी पुष्यगुप्त याने जुनागढ येथील वैशिष्ट्यपूर्ण अशा भूस्तर रचनेचा अंदाज घेऊन हा जलाशय बांधला. यासाठी उर्जयत् पर्वतातून निघणाऱ्या सुवर्ण सिकता व पलाशनी या नद्यांच्या संगम स्थळाचा व तेथे उपलब्ध होणाऱ्या जलस्रोताचा उपयोग करून घेण्यात आला. चंद्रगुप्तानंतर सम्राट अशोक (कार. इ. स. पू. २७२—२३२) याच्या  काळात त्याचा अधिकारी यवनराज तुषास्फ याने स्वतःच्या देखरेखीखाली या जलाशयापासून मोठमोठ्या कालव्यांची निर्मिती केली.

चंद्रगुप्ताच्या काळात बांधलेला हा जलाशय. पुढे अतिवृष्टीने आलेल्या पाण्याच्या वेगवान लोंढ्यामुळे मुळात बांधलेला बंधारा फुटला. त्याला २१० मी. लांब आणि तितकेच रुंद आणि ३७.५ मी. खोल असे खिंडार पडून जलाशयातील सगळे पाणी वाहून गेल्यामुळे तो ओसाड वाळवंटासारखा झाला. ही घटना रुद्रदामन (कार. इ. स. १३०—१६५) या क्षत्रप राजाच्या काळात त्याच्या राजवटीच्या ७२ व्या वर्षी मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदेच्या दिवशी सतत वर्षाव करणाऱ्या पर्जन्यामुळे घडली. वास्तवात ही घटना शके ७२ (इ. स. १५०) च्या सुमारास घडली. तो दिवस १८ ऑक्टोबर किंवा १६ नोव्हेंबर असावा, असे मत जर्मन प्राच्यविद्यापंडित फ्रांट्स किलहॉर्न याने नोंदवले आहे. यावेळी रुद्रदामन याने आपल्या दरबारातील काही वरिष्ठ, अमात्य आणि सल्लागार (मतिसचिव) व कार्यकारी अधिकारी (कर्मसचिव) यांचा जलाशयाच्या दुरुस्तीसाठी असलेला विरोध दुर्लक्षून, जनतेवर कोणताही नवा कर न बसवता, स्वतःच्या वैयक्तिक निधीतून या जलाशयाच्या बंधाऱ्याचे काम केले. तलावाचा बंधारा माती, दगड यांच्या साहाय्याने लांबी, रुंदी, उंची यांमध्ये कोणताही जोड राहू न देता मजबूत रितीने, पूर्वीपेक्षा तिप्पट क्षमतेचे बांधकाम करून दुरुस्त केला. मूळ कालवासुद्धा दुरुस्त करून तीन थरांची रचना करून स्वतःच्या कीर्तीला साजेसा असा हा जलाशय पूर्ववत केला. अनार्त व सुराष्ट्र प्रदेशांतील त्याचा शासक सुविशाख या पल्लव अमात्याने हे बांधकाम पूर्ण केले.

पुढे गुप्त वंश राज्यावर असताना सम्राट स्कंदगुप्त (कार. इ. स. ४५५—४६७) याच्या काळात म्हणजेच गुप्त संवत् १३६-१३८ या काळात (शके ३७७-३७९) हा जलाशय पुन्हा फुटला, तेव्हा स्कंदगुप्ताचा अमात्य पर्णदल व त्याचा मुलगा चक्रपालित याने तो पुन्हा बांधला, अशी नोंद मिळते.

सुदर्शन जलाशयाची कीर्ती व प्रसिद्धीविषयक शिलालेख जुनागढ या ठिकाणी रुद्रदामन याने खोदून ठेवला आहे. हा शिलालेख जुनागढ शहराच्या पूर्वेस एक मैल अंतरावर गिरनार पर्वताच्या सभोवती असलेल्या दरीच्या लगत एका विशाल प्रस्तराच्या पश्चिम बाजूवर कोरला आहे. या प्रस्तराचे वैशिष्ट्य असे की, सम्राट अशोकाने सात प्रस्तर आदेश खोदून ठेवले आहेत. याच प्रस्तरावर गुप्तवंशीय सम्राट स्कंदगुप्त याने स्वतःचा लेख खोदवला आहे. इ. स. १८३८ मध्ये जेम्स प्रिन्सेप याने लेखाचे वाचन केले. यानंतर लासेन, एच. एच. विल्सन, भाऊ दाजी लाड, भगवानलाल इंद्रजी, योहान ब्यूल्लर यांनी यावर चर्चा केली. किलहॉर्नने एपिग्राफिया इंडिकामध्ये हा लेख पुन्हा प्रकाशित केला. या लेखाची लिपी दक्षिणी वळणाची ब्राह्मी असून भाषा संस्कृत आहे. लेख निर्दोष पद्धतीने लिहिला असून त्यातील विविध शब्द व संज्ञांच्या आधारे तत्कालीन साहित्याची प्रगती लक्षात येते. रुद्रदामन एक उत्कृष्ट प्रशासक होता. त्याने केलेल्या कामामुळे या जलाशयाची कीर्ती सर्वत्र पसरली व सुदर्शन या नावाचा प्रभाव दीर्घकाळ राहिला.

रामटेक येथील केवल नृसिंह मंदिराच्या उजव्या भिंतीवरील कोरीव लेखानुसार वाकाटक राजा दुसरा रुद्रसेन (कार. इ. स. ३८५—३९५) व त्याच्या अज्ञात भगिनीने मिळून ‘प्रभावती स्वामिन्’ नावाचे मंदिर उभारले होते आणि ‘सुदर्शन’ नामक तलाव खोदला होता. त्यासाठी त्यांनी कदलीवाटक या खेड्यात खासगी व्यक्तीकडून जमीन विकत घेतली होती. पुढे वाकाटक राजा देवसेन (कार. इ. स. ४५५-४५८) याने हिस्सेबोराळा (जिल्हा वाशीम, महाराष्ट्र) शिलालेखात नोंदवल्याप्रमाणे त्याच्या स्वामिल्लदेव या आज्ञाधारक अधिकाऱ्याने प्राणिमात्रांच्या हितासाठी सरोवर बांधले. त्याने त्याचे नाव सुदर्शन जलाशय असे ठेवले आहे. वत्सगुल्म माहात्म्यात या परिसरातील तीर्थांचे वर्णन आहे. त्यात सुदर्शन जलाशयाचे वर्णन चंद्रसरोवर असे आले आहे. पूर्तकर्माचा हा वारसा जपताना एकूण जलाशय परंपरेत नोंदवलेला व दीर्घकाळ जतन केला गेलेला, सुदर्शन हा प्रथम जलाशय ठरतो.

संदर्भ :

  • किलहॉर्न, फ्रांट्स, एपिग्राफिया इंडिका, खंड : ८, पृ. ३६-४९, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, नवी दिल्ली, १९०५-०६.
  • मिराशी, वा. वि. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख, मुंबई, १९७९.
  • कोलते, वि. भि. महाराष्ट्रातील काही ताम्रपट व शिलालेख, मुंबई १९८७.
  • पाठक, अ. शं. संपा., इतिहास : प्राचीन काळ (खंड १), महाराष्ट्र दर्शनिका विभाग, मुंबई, २००२.

                                                                                                                                                                              समीक्षक : मंजिरी भालेराव