आघारकर संशोधन संस्थेची इमारत, पुणे.

आघारकर संशोधन संस्था : (स्थापना – १९४६) पुण्यात असलेली आघारकर संशोधन संस्थाजीवशास्त्रात संशोधन करते. तेथे प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील मूलभूत व उपयोजित संशोधन होते. आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट ही स्वायत्त संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी सलग्न आहे. या संस्थेची स्थापना महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टीवेशन ऑफ सायन्स या नावाने झाली होती. आघारकर संशोधन संस्था हे नाव १९९२ साली, संस्थेचे संस्थापक आणि संचालक डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर ह्यांच्या गौरवासाठी देण्यात आले.

सध्या ही संस्था जीवशास्त्राच्या सहा प्रमुख शाखामध्ये संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाचे कार्य करत आहे. जैवविविधता (बायोडायवर्सिटी) अँड पॉलिओबायोलॉजी, जैविकऊर्जा (बायोएनर्जी), बायोप्रोस्पेक्टिंग, विकासात्मक जीवशास्त्र (डेवलपमेंट बायोलॉजी), अनुवंशिकता आणि वनस्पती प्रजनन (जेनेटिक्स अँड प्लांटब्रीडिंग) या त्या सहा शाखा होत. तसेच, या  संस्थेच्या अब्जांश जीवशास्त्र (नॅनोबायोसायन्स) विभागात शेतकी आणि पर्यावरण या क्षेत्रात अब्जांश तंत्रज्ञानाचा (नॅनो टेक्नॉलॉजी) वापर,  जैवानुकरण (बायोमिमिटिक्स), अब्जांशऔषध (नॅनोमेडिसिन), सूक्ष्मजोडकाम (मायक्रोफेब्रिकेशन) या विषयावर संशोधन करते. नॅनोकणांचे पृथ:करण आणि शुद्धीकरण करण्यासाठी सूक्ष्मपेशींची निर्मिती, औषधी झाडांची उगवण क्षमता वाढविणे, नॅनोकणांद्वारे कीटक नाशकांवर नियंत्रण अशा विविध विषयावर येथे संशोधन चालते. जैवविश्वातील संरचना, प्रक्रिया व साधने यापासून जैवानुकरण  संशोधनासाठी प्रेरणा घेतली आहे. अब्जांश औषधे हा विषय प्रामुख्याने निदान (डायग्नोस्टिक्स), औषधोपचार (डृगडिलिवरी) आणि थेरपिटिक्स याकामी वापरता येतो. दूषित अन्नपदार्थ जलद ओळखण्यासाठी या संस्थेने छोटी छोटी साधने निर्माण केली आहेत. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानसंस्था (DST), वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद (CSIR), भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR),  भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR), जैवतंत्रज्ञानविभाग (DBT), DNES अशा नाना सरकारी संस्थांच्यावतीने या संशोधन संस्थेत शोधप्रकल्प राबविले जातात. शिवाय, ही संस्था देशा-परदेशातील सार्वजनिक तसेच खाजगी संस्थासाठी सल्लागार म्हणून काम करते.

आघारकर संशोधन संस्था. विविध विद्यापीठाशी सलग्न असल्याने, या संस्थेत पदव्युत्तर आणि डॉक्टरेटचे शिक्षण घेण्याची सुविधा आहे. संस्थेतील प्रयोगशाळा अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज आहेत. या संशोधन संस्थेत ज्ञानसंपन्न झालेले शास्त्रज्ञ जगभरात विखुरलेले असून सन्मान्नीय पदावर कार्यरत आहेत. संस्थेचे ग्रंथालय नावाजलेले आहे.

 संदर्भ :

  • ‘संशोधन संस्थायण’, लोकसत्ता, ६ डिसेंबर २०१८.

 समीक्षक : मोहन मद्वाण्णा