भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था, पुणे : ( स्थापना – १७ नोव्हेंबर,१९६२ )

      भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था, पुणे

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था ही संशोधन संस्था पुण्यात असून भारतातील उष्णकटी बंधातील हवामानासंबधी संशोधन करते. ही संस्था देशातील मोसमी पावसाचे आणि उष्णकटिबंधीय महासागराच्या हालचालीसंबधीचे संशोधन करणारी एकमेव संस्था आहे. ही एक स्वायत्त संस्था असून, एक शैक्षणिक केंद्र देखील आहे. भारत सरकारच्या भूवैज्ञानिक खात्याच्या अख्यत्यारीत असलेली ही संशोधन संस्था विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आणि हवामान विज्ञान विभागांतर्गत कार्यरत आहे.

या संस्थेची स्थापना पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉंजी (आय.टी.एम.) या नावाने झाली. या संस्थेचे कार्य स्वतंत्रपणे पुण्यातील हवामानविज्ञान विभागाच्या देखरेखीखाली चालत होते. तिथे, देशभरातील  हवामानाचे निरीक्षण करणे, हवामानाचा अंदाज बांधणे, भूकंपासबंधी संशोधन करणे यासारखी संशोधन कामे चालत.

भारत सरकारच्या वैज्ञानिक संशोधन समितीच्या शिफारशीनुसार, १९७१ साली, संस्थेचे नामकरण आय.आय.टी.एम. (Indian Institute of tropical meteorology) असे झाले. तिला स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाला. १९८४ पर्यन्त या संस्थेने केंद्र सरकारच्या पर्यटन आणि नागरी उड्डाण मंत्रालयासाठी संशोधन केले. १९८५ पासून ही संस्था विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या अधिपत्याखाली कार्यरत झाली. २००६ सालापासून आय.आय.टी.एम. भूविज्ञान खात्याच्या नियंत्रणाखाली आणली गेली. तिथे, केवळ पायाभूत नव्हे, तर संगणकीय सुविधा उपलब्ध आहेत. तिथला ‘आदित्य एच.पी.सी.’ हा संगणक देशातील सर्वात मोठ्या संगणकीय क्षमतेपैकी एक होय. तसेच, इथल्या संशोधकांनी ‘प्रत्युष’ नावाचा महासंगणक विकसित केला आहे व तो देशातील सर्वांत वेगवान महासंगणकापैकी एक आहे. त्याचा वेग जास्तीतजास्त ६.८ पेटाफ्लोप्स आहे. ‘प्रत्युष’ हा संगणक दोन ‘हाय पर्फोर्मिंग कम्प्यूटिंग’ (एच.पी.सी.) युनिटचा बनलेला आहे.

संगणकाची क्षमता दर सेकंदास किती फ्लोप्स आज्ञा हाताळू शकतो यावर ठरवली जाते. पेटाफ्लॉप्स म्हणजे 10 15 दहा चा पंधरावा घातांक (1015 = 100000 0000000000.), एवढ्या वेगाने दर सेकंदास ऑपरेशन्स प्रत्युष  संगणक हाताळतो. त्यातले ४.० पेटाफ्लोप्सचे एक केंद्र पुण्याला आहे, तर दुसरे २.८ पेटाफ्लॉप्सचे युनिट उत्तर प्रदेशातील नॉयडाला आहे. ही दोन्ही केंद्रे संयुक्तरीत्या कार्य करतात. या वेगवान महासंगणकाच्या आधारे संशोधक हवामानाचा अंदाज वर्तवितात, मान्सूनमधील मासेमारीसबंधी इशारे देतात, हवेची गुणवत्ता जोखतात आणि भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ या नैसर्गिक आपत्तीशी निगडीत अभ्यास करतात. हवामानासबंधी संशोधन करण्यासाठी लागणारी ‘हाय परफॉर्मेंस कम्प्यूटिंग; सुविधा असलेले जगात जपान,अमेरिका, इंग्लंड आणि भारत हे चारच देश आहेत. तिथे पूर्ण वेळ हवामानशास्त्रावरील मूलभूत संशोधन चालते. त्याच्याशी निगडीत भौतिकशास्त्र, सागरविज्ञान, रसायनशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र या विषयासंबंधी आंतरविद्याशाखीय संशोधनदेखील केले जाते. हवामानशास्त्रातील ‘रेन अँड क्लाऊड’, ‘मायक्रोफिजिक्स’, ‘क्लायमेट व्हेरियाबिलिटी अँड प्रेडीक्शन’, ’एयर पोल्युशन’, ‘ओशन मॉडेलिंग’, ‘ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिसिटी’, ‘ॲटमॉस्फेरिक केमिस्ट्री अँड डायनेमिक्स’, ‘लँड प्रोसेस स्टडीज’, ‘एयरबोर्न मेजरमेंट’ या विषयांवर संशोधन होत असते. या संस्थेत तज्ज्ञ संशोधक आणि कुशल शास्त्रज्ञ कार्यरत आहेत.

या संस्थेत, विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर शिक्षण आणि डॉक्टरेट करण्याच्या शैक्षणिक सुविधा देखील उपलब्ध आहेत, कारण ही संस्था अनेक विद्यापीठाशी संलग्न आहे.

संदर्भ :

  • संशोधन संस्थायण, लोकसत्ता, १३ डिसेंबर २०१८
  • https://www.tropmet.res.in

समीक्षक : मोहन मद्वाण्णा