आंध्रप्रदेश,तेलंगणाचे लोकसाहित्य संशोधन : तेलुगू भाषा ही आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांची अधिकृत भाषा आहे. तेलुगू हा शब्द आता अधिकृतरित्या स्वीकारला गेला आहे. त्याचा संबंध पूर्वी आंध्रा, अंधाका, आंध्रामू, तेनगू, तिलिंग भाषा, गेन्दु, वडागूआदी शब्द संकल्पानांशी जोडला गेला. संगम साहित्यातील तामिळ व्याकरण पद्धती तोलक्काप्पायिममध्ये वडागू या उत्तर तामिळनाडूत बोलल्या जाणाऱ्या भाषेचा उल्लेख आहे. वडा वींगाडम, तेन कुमारी, उत्तर वेंगाडम या तिरुपती आणि दक्षिण कन्याकुमारीच्या भागात म्हणजेच तामिळनाडूच्या सीमावर्ती भागात ही भाषा बोलली जायची, असा उल्लेख आहे. एतरेय ब्राह्मणात अंधाका असा उल्लेख आहे.

तेलुगू लोकसाहित्य संशोधनाला सुमारे २२० वर्षांचा इतिहास आहे. कॉलिन मॅकेन्झी या संशोधकाने १७९६ मध्ये भूर्जपत्रावरील पोवाड्यांचे संकलन केले होते. लोकसाहित्यातील संशोधनाला १९५२ पासून विद्यापीठ पातळीवर मान्यता प्राप्त झाली. मिशनऱ्यांनी लोकसाहित्याचे संकलन, दस्तावेजीकरण, भाषांतर आणि मान्यतेला प्राधान्य दिल्याचे सिद्ध झाले आहे. हाच धागा पकडून स्थानिक अभ्यासकांनी १९ व्या शतकापासून लोकसाहित्याच्या दस्तावेजीकरण आणि विश्लेषणास प्रारंभ केला. विद्यापीठ पातळीवर संशोधन पदवीसाठी  भाषिक लोकवाड्मयाचा,आदिवासी संस्कृतीचा, लोककलांचा, स्थळ माहात्म्याचा आणि  जाती – पुराणांचा अभ्यास केला. तेलुगू लोकसाहित्याचे आतापर्यंत ५९३ ग्रंथ प्रकाशित झाले असून त्यातील ४०२ लोकवाड्:मयासंबंधी आहेत. लोककलांवरील ९५ ग्रंथ आहेत. सर्वात जास्त ग्रंथ लोकगीतांवरील आहेत. सन २००४ पर्यंत एकट्या लोकगीतांवर १५२ ग्रंथ उपलब्ध झालेले आहेत, यात पोवाड्यांवरील ग्रंथांची संख्या लक्षणीय असून ती ६६ इतकी आहे. लोककथांवर ३७ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. कॉलिन मॅकेन्झी यांनी संकलित केलेल्या तेलुगू लोकसाहित्यातील कू तमराजू कथा,  कटमराजाचा म्हणजेच  कदंबराजाचा  भूर्जपत्रावरील  पोवाडा, पलाना ती वीरचरित्र, पालनाडु राजाचा हस्तलिखित स्वरूपातील पोवाडा, प्रतापरुद्र देवाच्या पोवाड्याचे हस्तलिखित, मातल तिरुवेंगल रायाचरित्र (कडापा जिल्ह्यातील राजा सिद्दावतम) याचे हस्तलिखित स्वरूपातील चरित्र, तंजावूर राजुलाचरित्र म्हणजे तंजावरच्या राजाच्या इतिहासाविषयीचे हस्तलिखीत या सारखी सामुग्री लोकसाहित्याचा बहुमोल ठेवा आहे. ही लोकसाहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातील अभ्यासकांकडून संशोधित केलेली अनमोल साधन सामुग्री आहे. मुद्रित माध्यमांच्या आधीच्या काळात अनेक पोवाडे, लोकगीते भूर्जपत्र आणि हस्तलिखितांच्या द्वारे प्रसारित झाली होती असे कॉलिन मॅकेन्झी  यांनी संकलित केलेल्या सामुग्रीवरून सिद्ध झालेले आहे. संकलनासाठी कॉलिन मॅकेन्झी  यांनी स्वतःच्या संसाधनांमधून पैसे खर्च केले.

सर सी. पी ब्राऊन यांनी तेलुगू भूर्जपत्रांच्या वर्तमानपत्रातील प्रकाशनांसाठी काही अभ्यासकांना निवडले होते. त्यांना ब्राऊन यांनी स्वतःच्या खिशातील पैसे दिले. सर सी. पी. ब्राऊन हे तेलुगू साहित्य संपदा संरक्षित करून ठेवणारे संशोधक होते. त्यांच्या संकलनातील कुमारराममुनी कथा (कुमाररामा यांचा पोवाडा), बोब्बीली कथा (बोब्बीली या अठराव्या शतकातील साम्राज्याची कथा), कावम्मा कथा (बालवयात सतीसहगमन  केलेल्या कावम्माचा पोवाडा), मंजरीद्विपद (स्थानीय पदरचना), यक्षगानम (रंगमंचीय प्रकार), पालना ती वीरगाथा (पलनाडुचा पोवाडा – पलनाडु चुलत भावांमध्ये साम्राज्यासाठी झालेला महाभारतासारखा संघर्ष ) आणि  का तमराज  कथालू ( का तमराजू यांचा पोवाडा) ही सर्व सामुग्री लोकसाहित्याच्या दृष्टीने अतिशय बहुमोल आहे. सर सी.पी. ब्राऊन यांनी तेलुगू पोवाडे यांचे मोल जाणले होते. तसेच वेगवेगळ्या संशोधन पत्रिकांमध्ये अनेक लेख प्रकाशित केले होते. त्या दृष्टीने मॅकेन्झी आणि सर सी. पी. ब्राऊन यांचे कार्य मोठे आहे. त्यातल्या त्यात ब्राऊन यांनी अनेक लेख प्रकाशित केल्यामुळे त्यांचे संकलन, संशोधन कार्य नजरेत भरते. या दोघांनी तेलुगू भाषा, लोकसाहित्य आणि संस्कृती या संबधी फार मोठे साहित्य प्रकाशित केले.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक तेलुगू अभ्यासकांनी त्यांच्या समाज समूहाच्या मौखिक परंपरांचा वेध घेतल्याचे दिसते. सन १९१३ पर्यंत तेलुगू अभ्यासकांनी तेलुगू लोकसाहित्याचे एकूण ३० ग्रंथ प्रसिद्ध केले. त्यातील तीन ग्रंथ इंग्रजी भाषेतील आहेत. स्थानिक अभ्यासकांच्या पहिल्या पिढीने ( १८८९ ते १९०४ चा कालखंड ) स्त्रियांशी संबंधित जानपद गीते ( विधीस्वरूप मंगल आरती ) आणि विवाहसंबंधी गीते यांचे फार मोठ्या प्रमाणावर संकलन केले. लोकगीतांच्या संकलनाला अभ्यासकांनी अग्रक्रम दिलेला असला तरी पोवाडे आणि यक्षगान संहितांचे संकलनही प्रकाशित करण्यात आले. आश्चर्य म्हणजे या काळात लोककथांचे एकमेव संकलन प्रसिद्ध झाले ज्याचे नाव आंध्र देसीय कथावली ( तेलुगू भूमीतील कथा- १८१७) असे होते. तेलुगू भूमीतील या लोककथांचे संकलन श्री राजगोपाल राव यांनी केले. या काळात लोककथांचा लक्षणीय पातळीवर अभ्यास मात्र झाला नाही केवळ संकलन झाले. या लोककथा संकलनासाठी त्या त्या लेखकांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे . या संहितांचे म्हणजे लोककथांचे संकलन करण्यात आले आहे कि स्वतंत्र लेखन करण्यात आले आहे हे समजण्यास मार्ग नाही. काही अभ्यासकांनी लोकगीतांच्या महत्तेबद्दल रॉयल एशियाटिक सोसायटी, इंडियन ऍन्टीक्वेरी मध्ये लिहिले आहे. विसाव्या शतकातील वाङमयाच्या अभ्यासकांनी तेलुगू लोकसाहित्याच्या संशोधनासाठी स्वतःला झोकून दिले. त्यांनी लोकसाहित्याच्या विविध अंगोपांगांचा अतिशय गंभीररित्या अभ्यास केला. अभिजात साहित्याचा समृद्ध वारसा असणारे लोकसाहित्य अनेक अभ्यासकांनी विसाव्या शतकाच्या मध्यावर प्रसिद्ध करून त्याचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी लोकसाहित्याचे महत्व पटवून दिले .स्वतंत्र लेखन, आकाशवाणी वरील भाषणे आणि व्याख्याने याद्वारे त्यांनी लोकवाङमयाच्या सामर्थ्याचा विचार मांडला. त्यांनी पोवाड्यांचे आशय सूत्र, पोवाड्यांचे चलन, त्यातील काव्य आणि सौंदर्य विचारा विषयी अनेक लेख लिहिले. विस्तृत प्रस्तावनांसह पोवाड्यांच्या समीक्षणात्मक ग्रंथांची निर्मिती अनेक अभ्यासकांनी केली .

नेदगुरी गंगाधरम यांना तेलुगू लोकसाहित्याच्या संशोधन इतिहासात अद्वितीय आणि आदरणीय असे स्थान आहे. लोकवाङमयासह लोकसाहित्यातील विविध धारणांच्या संकलनांचे कार्य करणारे ते पहिले संशोधक आहेत. आपण संकलित केलेल्या संशोधन सामुग्रीला संदर्भान्वयी तपशील देणारे ते पहिले संशोधक आहेत. अमेरिकेत संदर्भान्वयी अभ्यासपद्धती सुरु होण्यापूर्वी त्यांनी प्रथम या दृष्टीने अभ्यास सुरु केला. दुर्दैवाने नंतरच्या अभ्यासकांनी संदर्भान्वयी अभ्यास पद्धती पुढे अंगिकारली नाही. नपेक्षा तेलुगू लोकसाहित्य संशोधनाच्या क्षेत्राची स्थिती वेगळी असती. त्यांनी १० हजार पृष्ठांची लोकसाहित्य सामुग्री संकलित केली आहे. अनेकविध लोकगीते, पोवाडे, लोकाख्याने, क्रीडा, प्रहेलिका, वाक्प्रचार, म्हणी, लोककथा, दैवतकथा, लोक गणित, कोडी,  स्त्रियांची मनोरंजनपर गीते, फुलांच्या सजावटीचे प्रकार आणि अन्य पारंपरिक गीते जी लोकवाङमयाचे महत्वपूर्ण अंग आहेत ती संकलित केली. त्यांचे वर्गीकरण केले आणि ग्रंथांद्वारे ही सामुग्री प्रकाशित केली. विद्यापीठ पातळीवर आणि अन्य संस्थात्मक पातळीवर बहुतांश तेलुगू लोकसाहित्य संशोधनाचे कार्य आतापर्यंत झाले आहे .

संदर्भ :

  • B.Rama Raju,Folklore Of Andhrapradesh,National Book Trust,New Delhi,2014.

मराठी भाषांतर : डॉ.प्रकाश खांडगे