लोहिया , शैला द्वारकादास  : (६ एप्रिल १९४० – २४ जूलै २०१३). मराठी साहित्यातील कथाकार, कादंबरीकार आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक. जन्म धुळे येथे झाला. त्यांचे माहेरचे नाव शैला शंकरराव परांजपे. १९६२ मध्ये द्वारकादास लोहिया यांच्याशी आंतरजातीय विवाह करुन त्या अंबाजोगाई, जि. बीड येथे आल्या. त्यांचे शिक्षण बी.ए. पर्यंत एस. पी. कॉलेज, पुणे येथे झाले. एम.ए., एम.फिल., पीएच.डी. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे पूर्ण केले.

शैला लोहिया यांचे वडील शंकरराव पराजपे हे समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते होते. गोवा मुक्ती संग्रामात आणि सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला होता, तर आई शकुंतला परांजपे या साने गुरुजी यांच्या विचाराने प्रभावीत होवून राष्ट्र सेवा दल आणि हरिजन सेवा संघाच्या कार्यकर्त्या होत्या. यांच्या संस्कारात शैला लोहिया घडल्या आणि राष्ट्र सेवा दलाच्या कणा पथकामध्ये तसेच महाराष्ट्र दर्शन आदी सांस्कृतिक प्रबोधनपर कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. याच संस्कारातून त्यांचे लेखन समोर आले. त्यांच्यावर  समाजवादी विचारांचा प्रभाव होता. लग्नानंतर काही दिवस त्यांनी जिल्हा परिषद अंबाजोगाई येथे शिक्षिका म्हणुन काम केले. त्यानंतर १९७० पासून योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ कला व वाणिज्य महाविद्यालय, अंबेजोगाई येथे मराठी विषयाच्या अध्यापक म्हणून काम केले. पुढे वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालय, अंबेजोगाई येथे त्यांनी प्राचार्य म्हणुन काम केले.

शैला लोहिया यांचे साहित्य – कथासंग्रह : स्वरांत (१९८१), आपले आभाळ पेलताना (१९९७), कथाली, मनतरंग, तिच्या डायरीची पाने (२०१०); कादंबरी : इत्ता इत्ता पाणी, जगावेगळा संसार (१९८२), बाबाचा प्रसाद, सुखाची वाट, शोध अकराव्या दिशेचा (२०१३) ; कविता : कविता गजाआडच्या (२००२); लोकसाहित्य : भोंडला भुलाबाई : विधी आणि गाणी , भूमी आणि स्त्री (२०००) इत्यादी.

स्त्री हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू आहे. तिला माणूस म्हणून जगता आले पाहिजे. जातीपातीची बंधने, कर्मकांड यातून तिची निश्चित सुटका व्हायला पाहिजे ही त्यांची परिवर्तनशील भूमिका त्यांच्या कथांतून प्रकट होते. त्यांच्या कथा सामाजिक आशय घेऊन येतात, ह्यात स्त्री पुरुषांचे नाते, सहकार्य हे देहापलीकडचे असते हे सहजपणे त्यांनी सांगितले आहे. सहकार्याला लिंग नसते हा संदेश त्यांच्या कथा देतात. तिच्या डायरीची पाने  या कथासंग्रहात कुटुंबवत्सल आई, खंबीरपत्नी, सृजनशील मनाची शिक्षिका त्यांनी मांडली आहे. स्पृश्य-अस्पृश्य, दलित, स्थानिक श्रमिक महिला याबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरील देहव्यापारावरही त्या कडक शब्दात लिहितात. तसेच राजकारणावरही त्या लिहितात. राजकराण ही सेवा आहे, ते उदरनिर्वाह अथवा व्यवसायाचे साधन नाही. राज्यकर्त्यांना सुद्धा आचारसंहिता असली पाहिजे. ती कुठल्याही सक्ती अथवा कायद्याच्या बडग्यातून आचारणात आणू नये तर त्याला मनाने स्वीकारले पाहिजे हे आपल्या लेखनातून सांगतात. समाजाची स्थिती, स्त्रियांचे प्रश्न पाहुन त्या अस्वस्थ होतात. त्यांचे दुःख, गार्‍हाणी  यांशी संबंधीत लेखनावर भर दिला.

कविता गजाआडच्या  हा काव्यसंग्रह भारत इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीनंतरचा आहे. मुलीच्या जन्मा विषयी असलेली नाराजी सांगून स्त्रीच्या अंतरंगाचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी या कवितासंग्रहातून केलेला आहे. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासात त्यांचा हातखंड होता. भारतातील विधी उत्सव, व्रत आणि गाणी यांच्यातील एकात्मतेचा मूलभूत आधार भारतीय राष्ट्रीयत्व हा आहे हे त्यांनी अभ्यासात सिद्ध केले. भारतभर स्त्रियांचे सण-उत्सव हे स्त्रीच्या आणि भूमीच्या उर्वरा शक्तीशी, सृजनशीलतेशी संबंधित असतात आणि त्यातून भारतीय पातळीवर सांस्कृतिक एकात्मतेचा प्रत्यय येतो, हे त्यांनी त्यांच्या लोकसाहित्याच्या अभ्यासातून अनेक उदाहरणे देऊन दाखवून दिले आहे.

चौथ्या बीजिंग आंतरराष्ट्रीय महिला परिषदेसह पाच महिला परिषदांमध्ये त्यांनी विविध विषयांवर आपले प्रबंध सादर केले होते.शैला लोहिया यांना अनंत-सुमती साठे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला गेला आहे. त्यांच्या साहित्यसेवेबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांचे पती द्वारकादास लोहिया हे सामाजिक कार्यात अग्रेसर होते, त्यांच्या मानवलोक या संस्थेत शैला लोहिया यांचेही महत्वपूर्ण कार्य आहे.

अल्पशा आजाराने अंबेजोगाई येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/91972/8/08_chapter%203.pdf.