धर्मनिष्ठ लोकांच्या दृष्टीने अंतिम सत्य सांगणारी आणि पवित्रतर वास्तववादी लोकांच्या दृष्टीने कल्पित व अवास्तव आणि कलावंत-साहित्यिक वगैरेंच्या दृष्टीने कलात्मक सत्याचा अंतर्भाव असलेली विशिष्ट प्रकारची कथा. पुराणकथा, दैवतकथा इ. तिची पर्यायी नावे. ‘मुखाद्वारे जे काही उच्चारले गेले असेल ते,’ या अर्थाच्या ‘मुथॉस’ या ग्रीक शब्दापासून इंग्रजी ‘मिथ’ हा शब्द बनला आहे. त्यामुळे या शब्दाच्या मूळ अर्थानुसार कोणतीही कथा ही मिथ्यकथाच ठरत होती. परंतु काळाच्या ओघात या शब्दाला पवित्र कथा, कल्पित कथा इ. अर्थच्छटा प्राप्त झाल्या.

मिथ्यकथा व कला यांचा एकमेकींच्या निर्मितीवर आणि स्वरूपावर प्रभाव पडतो. किंबहुना मिथ्यकथा हे कला-साहित्याचे अक्षय प्रेरणास्थान मानले जाते. रामायणमहाभारतओडिसी, इलिअड इत्यादींवरून मिथ्यकथा व कला-साहित्य यांचे नाते स्पष्ट होते. साहित्याच्या अन्य कोणत्याही प्रकारात वैश्विक सत्ये व जीवनमूल्ये यांविषयी जो दिव्य-भव्य आशय प्रभावी रीतीने सूचित करता येत नाही, तो मिथ्यकथांमधून करता येतो, हे त्यांचे खास वैशिष्ट्य होय. म्हणूनच, प्लेटोसारख्यांना मिथ्यकथा ही कलेच्या दृष्टीने एक अपरिहार्य गोष्ट असल्याचे वाटत होते. कोलरिज (१७७२ –१८३४),डब्ल्यू. बी. येट्‌स (१८६५–१९३९), डी.एच्‌ लॉरेन्स (१८८५–१९३०)इत्यादींनीही साहित्यनिर्मितीसाठी मिथ्यकथांचा उपयोग केला आहे. ग्रीक शोकांतिका, जपानमधील  नो नाट्य इत्यादींची निर्मिती पुराणकथांच्या आधारेच झाली आहे. नृत्य,चित्र,शिल्प, वास्तू इ. कलांचीही समृद्धी मिथ्यकथांतील विषयांमुळे झाली आहे. मिथ्यकथांच्या अध्ययनाखेरीज या कलांचे परिपूर्ण आकलन व आस्वाद अशक्य आहे.

कलाकृतींच्या निर्मितीसाठी मिथ्यकथांचा उपयोग अनेक पद्धतींनी केला जातो. कलाकृतीमध्ये मूळ मिथ्यकथेचा जसाच्या तसा उपयोग करणे, हा एक प्रकार होय. उदा., वाल्मीकीचे रामायण. मूळ मिथ्यकथेमध्ये परिवर्तन, विस्तार इ. घडवून मग तिचा कलाकृतीसाठी उपयोग करणे,हा दुसरा प्रकार होय. उदा., तुलसीदासाने लिहिलेले रामचरितमानस. मूळ मिथ्यकथेतील वास्तव सत्याचा कलाकृतीसाठी उपयोग करणे, हा तिसरा प्रकार होय. उदा., रूपर्ट ब्रुकचे (१८८७ –१९१५) ‘ॲनन्‌सिएशन’ (देवदूत गाब्रिएल याने कुमारी मेरीजवळ, तिच्या पोटी येशू ख्रिस्त जन्म घेणार असल्याबद्दल केलेले प्रकटीकरण) या विषयावरील काव्य, कीट्‌सचे एंडिमीयन हे काव्य (१८१८). मिथ्यकथांमधील व्यक्ति-प्रसंग आदींचा कलाकृतीमध्ये संदर्भ म्हणून उपयोग करणे, हा आणखी एक प्रकार होय.

मिथ्यकथांचे अस्तित्व व प्रभाव सार्वत्रित आणि सार्वकालीन असल्याचे आढळते. म्हणूनच त्यांची निर्मिती हा मानवी स्वभावाचाच एक भाग आहे, ती मानवाची एक गरज आहे इ. प्रकारचे विचार मानवशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहेत. मानवजातीच्या इतिहासात मिथ्यकथांच्या निर्मितीचे एक युगच येऊन गेले असले पाहिजे,असे अभ्यासक मानतात. आता मानवजात त्या युगापासून फार दूर आली आहे. विज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे एक पवित्र कथा म्हणून असलेले मिथ्यकथेचे महत्त्व क्षीण झाले आहे. मिथ्यकथा हा आता मानसशास्त्रज्ञ व मानवशास्त्रज्ञ यांचा विषय बनला आहे,असे काही अभ्यासक म्हणू लागले आहेत. तथापि मानवाला विश्वातील व जीवनातील गूढतेविषयी जोपर्यंत कुतूहल वाटत राहील, तोपर्यंत त्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मिथ्यकथांची आवश्यकता भासेल, यात मुळीच संशय नाही.

पहा : आख्यायिका; पुराणकथा.

प्रतिक्रिया व्यक्त करा