बी. ए. विवेक राय : (८ डिसेंबर १९४६). कर्नाटकातील प्रख्यात लोकसाहित्य अभ्यासक,संशोधक. जन्मस्थळ पुंचा गाव, बंतवाल तालुका, दक्षिण कन्नड,कर्नाटक. दक्षिण कर्नाटकातील मंगलोर स्थित विवेक राय यांनी १९८१ मध्ये म्हैसूर विद्यापीठातून लोकसाहित्यात पीएच.डी. पदवी संपादित केली. म्हैसूर विद्यापीठातूनच त्यांनी पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र आणि गणितात बी. एस. सी ही पदवी संपादन केली (१९६७).म्हैसूर विद्यापीठातूनच १९७० मध्ये कन्नड विषयात त्यांनी उच्च श्रेणीत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. पदवी पातळीवर विज्ञानाचे विद्यार्थी असा लौकिक संपादन केलेले विवेक राय यांनी पुढील काळात मात्र राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकसाहित्याचे साक्षेपी संशोधक म्हणून यश प्राप्त केले.
सन २००९ ते २०१२ या कालखंडात जर्मनीतील बुरझबर्ग विद्यापीठात भारतीय विद्याशाखेच्या अध्यासनात त्यांनी निमंत्रित प्राध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारली. जुलै १९८५ ते सप्टेंबर २००४ या कालावधीत त्यांनी मंगलोर विद्यापीठात कन्नडचे प्राध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळली. कर्नाटक राज्याच्या म्हैसूर येथील मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून २८ जून २००७ ते ३० सप्टेंबर २०१० पर्यंत ते कार्यरत होते. त्या आधी हम्पी येथील कन्नड विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी योगदान दिले. २४ सप्टेंबर २००४ ते २७ जून २००७ या कालावधीत कन्नड विद्यापीठात कुलगुरू म्हणून कार्यरत असताना त्यांनी दक्षिण भारतातील कन्नड, तुल्लू, तामिळ, मल्याळम आदी भाषा भगिनींच्या लोकसाहित्य चळवळीला गती दिली.आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांच्या माध्यमातून विवेक राय यांनी संशोधन प्रकल्प पूर्ण केले. अमेरिकेतील शिकागो येथील मॅक आर्थर फाउंडेशन, फिनलँड मधील अकॅडमी ऑफ फिनलँड, जर्मनीच्या ट्युबिन्जेन विद्यापीठाची पाठयवृत्ती, फिनलँडमधील तुर्क विद्यापीठातील कालेवाला इन्स्टिट्यूटची संशोधन वृत्ती अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन प्रकल्पनांचे कार्य विवेक राय यांनी पूर्णत्वास नेले. राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रकल्प देखील त्यांनी यशस्वीरित्या पूर्णत्वास नेले. तुल्लू भागवत हस्तलिखितांचे जतन आणि प्रकाशन, काडेन गोडलू साहित्याचे जतन, कन्नडमधील पाश्चात्य समीक्षा पद्धतीने कन्नड साहित्य समीक्षा, यक्षगान प्रसंग सम्पूत हस्तलिखितांचे जतन आणि प्रकाशन असे राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रकल्प विवेक राय यांनी पूर्ण केले. भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय आणि मंगलोर विद्यापीठ, राष्ट्रीय पुरातत्व विभाग भारत सरकार आणि मंगलोर विद्यापीठ, विद्यापीठ अनुदान आयोग, राष्ट्रीय पुरातत्व विभाग भारत सरकार आणि मंगलोर विद्यापीठ यांच्या सहकार्याने अनुक्रमे हे वरील संशोधन प्रकल्प विवेक राय यांनी पूर्ण केले.
एकूण ४१ ग्रंथाचे लेखन विवेक राय यांनी केले आहे. तुल्लू गाडेगालू , तुल्लू ओगातूगालू , तौलवा संस्कृती, तुलुबा अध्ययना, केलावू विचार गालू, तुलू जानपद साहित्य, अन्वयिका जानपद, भारतीय परंपरा मत्तु साहित्यदाली ओगतू ( भाषांतर ), गिळिसुवे ( सांस्कृतिक समीक्षा ), इरुला कन्नु (सांस्कृतिक समीक्षा), हिंदना हेज्जे (साहित्य समीक्षा), रंगदोलगना बहिरंग, बलगीलानु तेरेदू (ब्लॉक लेखन),जर्मनिया ओलागिनिंदा (हित्यावरील निबंध लेखन ), कन्नड नुदिनादेया बराहगालू, नेत्तरा मादुवे, आखियु समन्वये, चिलियाली बुकम्या, गोपाल नाईक यांनी सादर केलेले सिरी महाकाव्य, दि तुबिन्जेन तुलू म्यॅन्युस्क्रिप्ट, क्लासिकल कन्नडा पोयट्री अँड प्रोज अशा ग्रंथांचे लेखन विवेक राय यांनी केले आहे. कन्नड कादंबरिया मॉडला हेज्जेगलू, काडेनगांडलू साहित्य, शांभवी , मुलिया टिम्मप्पय्यानवरा साहित्य, जानपद आटागालू , यक्षगान प्रसंग सम्पूता, तुलू कवितागालू, पोन्ना कान्ती, भुताराधानेया बन्नागारिये, आग्राला पुरंदरा राय समग्र साहित्य आदी ग्रंथांचे संपादनही विवेक राय यांनी केले आहे.
कन्नड विद्यापीठाच्या तुल्लू साहित्य चरित्रे, समग्र कन्नड जैन साहित्य, शरनारा वाचंगला तुलू भाषांतरा, मंगलुर दर्शना आदी प्रकल्पांचे प्रमुख संपादकपद त्यांनी भूषविले आहे. एकूण ३०० हुन अधिक शोधनिबंध कन्नड आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित करण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये विवेकराय यांनी शोधनिबंध सादर केले. अमेरिका, जर्मनी, जपान, स्वित्झर्लंड, फिनलँड आदी देशांबरोबरच्या परिषदांमध्ये त्यांनी चर्चासत्रांचे अध्यक्षपद, शोध निबंध वाचक म्हणून पदे भूषविली. राष्ट्रीय स्वरूपाच्या अनेक परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतला तसेच ५०० हुन अधिक व्याख्याने दिली .
मंगलोर विद्यापीठ, कन्नडा विद्यापीठ हम्पी, कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठ म्हैसूर, वूरसबर्ग विद्यापीठ जर्मनी, कर्नाटक तुल्लू साहित्य अकादमी मंगलोर या संस्थांचे प्रमुख फेलो म्हणून विवेकराय यांनी योगदान दिले आहे. शिवराम कारंथ यांच्या अध्यासनाचे संचालकपद भूषविलेल्या विवेक राय यांनी शिवराम कारंथ यांच्या कार्याच्या १२५ ध्वनीचित्रफिती तयार केल्या. शिवराम कारंथ यांचे लेखन आठ खंडात प्रकाशित केले. शिवराम कारंथ यांच्या व्याख्यानांचे दस्तावेजीकरण केले. कन्नड विद्यापीठ हम्पी येथे सन २००४ ते २००७ पर्यंत कुलगुरू म्हणून कार्यरत असताना विद्यापीठ आणि संस्थात्मक पातळीवरील संशोधनाच्या संदर्भातले अनेक पथदर्शी करार त्यांनी केले. जर्मनीतील बुरसबर्ग विद्यापीठ, अमेरिकेतील स्टोनीब्रक विद्यापीठ, दक्षिण भारतातील कन्नड, तुल्लू, तामिळ आणि मल्ल्याळम या चार भाषांतील साहित्य आणि लोकसाहित्याच्या संदर्भात कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि केरळ राज्यातील विद्यापीठांसोबत प्विवेक राय यांच्या नेतृत्वाखाली परस्पर साहित्य, लोकसाहित्य आदान -प्रदानाचे सामंजस्य करार करण्यात आले .
जर्मनी, ब्रिटन, दुबई, फिनलँड, कुवैत, कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका, जपान, पाश्चिम जर्मनी आदी देशात विद्याविषयक दौरे त्यांनी केले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनेक समित्यांवर १९९५ ते २००७ या कालखंडात ते सदस्य म्हणून कार्यरत होते. लोकसाहित्याचा नेट या परीक्षेचा साठीचा अभ्यासक्रम तयार करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
दक्षिण भारतातील तुल्लू, कन्नड, तामिळी, मल्याळम या भाषांच्या लोकसाहित्याचा सैद्धांतिक बैठक देणाऱ्या मान्यवर लोकसाहित्य संशोधकांच्या मालिकेत विवेक राय यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. या भाषा भगिनींच्या लोकसाहित्य चळवळीसाठी ‘फॉसिल’ नावाची संस्था कार्यरत असून या संस्थेतर्फे राष्ट्रीय परिषदांचे आयोजन होत असते त्यात मार्गदर्शक म्हणून त्यांचा वाटा मोलाचा असतो. महाराष्ट्रातील प्रख्यात लोकसाहित्य विदुषी दुर्गा भागवत यांच्या लोकसाहित्यातील योगदानाचा गौरवपर उल्लेख विवेक राय यांनी आपल्या लेखनातून केलेला आहे.
संदर्भ :
- https://vivekaraiba.wordpress.com/