बेथे, हॅन्स : ( २ जुलै १९०६ –  ६ मार्च २००५ )

अमेरिकन शास्त्रज्ञ हॅन्स बेथे यांना १९६७ साली, ताऱ्यांच्या ऊर्जानिर्मितीच्या संशोधनासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शास्त्रज्ञ म्हणून त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी खगोल भौतिकशास्त्र, अणुविज्ञान, पुंजविद्युत गतिकी(Quantum Electrodynamics), सॉलिड स्टेट फिजिक्स या शाखांमध्ये संशोधन कार्य केले. नोबेल पुरस्काराशिवाय अन्य ११ प्रतिष्ठत पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत.

हॅन्स बेथे यांचा जन्म त्या काळात जर्मनीचा भाग असलेल्या स्ट्रॉसबोर्ग या गावी झाला. त्यांचे आई-वडील दोघेही उच्चशिक्षित होते. वडिल स्ट्रॉसबोर्ग विद्यापिठात प्राध्यापक होते.

हॅन्स बेथे यांचे प्राथमिक शिक्षण जर्मनीतील फ्रँकफर्ट येथील गोथ जिम्नॅशियम येथे झाले. मधली काही वर्षे त्यांना क्षयरोग झाल्यामुळे शिक्षणामध्ये खंड पडला. १९२४ मध्ये फ्रँकफर्ट विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला. या विद्यापीठात दोन वर्षे व नंतर म्यूनिक येथील विद्यापीठात अडीच वर्षे अभ्यास करून सैद्धांतिक भौतिकशास्त्रात पीएच्.डी. मिळविली. १९२८ ते १९३३ पर्यंत ते म्यूनिक येथे ट्यूबिंगटन विद्यापीठात भौतिकशास्त्राचे शिक्षक होते. १९३० साली, त्यांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीमुळे त्यांना परदेशांत शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली.

नाझी राजवटीमुळे त्यांना १९३३ मध्ये जर्मनीमधून बाहेर पडावे लागले. ऑक्टोबर १९३३ मध्ये, हॅन्स बेथे यांनी इंग्लंडमध्ये स्थलांतर केले. प्रथम मँचेस्टर विद्यापीठात आणि नंतर ब्रिस्टॉल विद्यापीठात शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली. त्यानंतर १९३५ साली, अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कॉर्नेल विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदी रुजू झाले. १९३७ साली, त्यांना प्राध्यापक पदही मिळाले. या नंतर पुढची पूर्ण कारकिर्द त्यांनी कॉर्नेल विद्यापीठामध्येच रहाणे पसंत केले.

दुस-या महायुद्धाच्या काळात त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना एम.आय.टी.मधील रेडिएशन लॅबमध्ये, मायक्रोवेव्ह रडारवर काम करण्याची आणि नंतर न्यू मेक्सिकोतील लॉस ॲलॅमस इथे बहुचर्चित मॅनहॅटन प्रकल्पावर अमेरिकेच्या अणुबॉम्ब प्रकल्पाचे सदस्य म्हणून संशोधन करण्याची संधी मिळाली. या संशोधनादरम्यान त्यांनी विखंडन प्रक्रियेने स्फोट होणाऱ्या अणुबॉम्बची परिणामकारकता ठरविण्यासाठी रिचर्ड फाईनमन यांच्याबरोबर काम करून बेथे-फाईनमन सूत्र विकसित केले. त्याचप्रमाणे अणुबॉम्बमध्ये स्फोटकांचे किती वस्तूमान असावे, याबाबत संशोधन केले.

हॅन्स बेथे यांचे प्रमुख संशोधन अणुकेंद्रक सिद्धांतावर (Atomic Nuclei theory) होते. १९३४ मध्ये, त्यांनी ड्युटेरिअमचा सिद्धांत (Theory of Deuteron) मांडला. अणुकेंद्रकाच्या वस्तुमानावर अभ्यास करून त्या संबंधातील बरेच वाद निकालात काढले. १९३५ ते १९३८ या काळात, त्यांनी अणुकेंद्रक प्रक्रियेवर सखोल अभ्यास केला आणि नील्स बोहर यांनी मांडलेला अणुसिद्धांत विकसित केला. या संदर्भातील हॅन्स बेथे यांचा निबंध आणि अणुकेंद्रक प्रक्रियांवरील त्यांचे निबंध रिव्ह्यू ऑफ मॉडर्न फिजिक्समध्ये समाविष्ट केले गेले.

ग्रहांना ऊर्जा कशी व कुठून मिळते याचा अंदाज हॅन्स बेथे यांना अणुकेंद्रक प्रक्रियेवरील संशोधनामुळे करता आला. अणुकेंद्रकीय भंजन प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते. सध्याच्या अणुभट्टीमध्ये (Nuclear Reactor) हेच तत्त्व वापरले जाते. अणुकेंद्रकीय संमिलन प्रक्रियेमधूनही ऊर्जा निर्माण होते हे हॅन्स बेथे यांनी दोन प्रक्रियांमधून सिद्ध केले. ताऱ्यांमधून प्रचंड प्रमाणात उत्सर्जित होणारी ऊर्जा अणुकेंद्रकीय संमिलन प्रक्रियेमधून निर्माण होते, हे त्यांनी सिद्ध केले. या संशोधनाबद्दल १९६७ साली, त्यांना नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

वयाच्या ९८ व्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये हॅन्स बेथे यांचे निधन झाले. शेवटपर्यंत शास्त्रीय संशोधनाची कास त्यांनी सोडली नाही. वैज्ञानिक संशोधक म्हणून त्यांच्या ७० वर्षांच्या कारकिर्दीत प्रत्येक दशकात किमान एक, असे वेगवेगळ्या विषयावर संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाले.

संदर्भ :

 

 समीक्षक : हेमंत लागवणकर