हॅल्डन केफ्फर हार्टलिन : ( २२ डिसेंबर १९०३ – १७ मार्च १९८३ )

हॅल्डन केफ्फर हार्टलिन यांचा जन्म ब्लूम्सबर्ग, पेन्सिलव्हानिया येथे झाला. त्यांचे माता-पिता व्यवसायाने शिक्षक होते. लहान असल्यापासूनच हॅल्डनवर  वडिलांचा अतिशय प्रभाव होता. ते जीवशास्त्राचे प्राध्यापक असूनसुद्धा त्यांना खगोलशास्त्र आणि भूगर्भशास्त्र यांमध्ये जास्त रस होता. आपल्या वडलांचा वारसा पुढे चालवत त्यांनीसुद्धा नैसर्गिक विज्ञानामधील आवड जोपासली, हीच आवड त्यांच्या जीवनात कायम राहिली.

हॅल्डन यांचे  प्राथमिक शिक्षण स्टेट नॉर्मल स्कूल या ठिकाणी झाले. १९२३ साली ईस्टन, पेन्सिलव्हानिया  येथील लफ्फाएत्त कॉलेज येथून त्यांनी विज्ञानातील पदवी घेतली. आपले कॉलेज शिक्षक बेवेर्ली डब्ल्यू. कुंकेल यांच्या प्रोत्साहनाने हार्टलिन यांनी पदवीनंतर संशोधन करण्याचे ठरविले. त्यांनी त्यांचा पहिला वैज्ञानिक शोधनिबंध जमिनीवरील आयसोपॉडच्या दृकप्रतिसादावर (visual response) सादर केला.

हार्टलीन यांनी त्यांचा अभ्यास जॉन हॉपकीन्स विद्यापीठ, बाल्टिमोर येथे दृष्टिपटलाच्या विद्युत शरीरविज्ञानावर (retinal electrophysiology) केला. याच विषयावर त्यांना पीएचडीसुद्धा मिळाली. एल्दृड्ज जॉनसन यांच्याकडून संशोधनासाठी देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीमुळे लेपजिग आणि म्यूनिक विद्यापीठातून हार्टलिन यांनी पुढील शिक्षण घेतले. १९४० साली कॉर्नेल वैद्यकीय महाविद्यालयात ते शरीरविज्ञानाचे सहायक प्राध्यापक बनले आणि नऊ वर्षे ते याच स्थानावर कार्यरत होते. त्यानंतर ते जॉन हॉपकिन्स येथे जीवभौतिकशास्त्राचे प्राध्यापक बनले. १९४९ साली त्यांनी याच विद्यापीठातील जीवभौतिकशास्त्राच्या थॉमस सी. जेनकिन्स विभागाचे अध्यक्ष बनले. १९५३ साली रॉकफेलर विद्यापीठ, न्यूयॉर्क येथे ते चेताक्रियाविज्ञानाचे (neurophysiology) प्राध्यापक बनले.

हार्टलिन यांनी काही संधीपाद (arthropods), पृष्ठवंशीय (vertebrates) आणि म्रुदुकाय  (mollusks) सजीवांच्या दृष्टिपटल विद्युत प्रतिसादावार संशोधन केले. संधिपाद  प्राण्यांची दृष्टीसंस्था मानवीय दृष्टिसंस्थेपेक्षा सोपी असते. त्यांनी हा अभ्यास घोड्याच्या नालेसारख्या दिसणार्‍या खेकड्याच्या (Horse Shoe Crab/ Limulus polyphemus) डोळ्यावर केंद्रित केले. जेव्हा एकच दृष्टी चेतातंतू (optic nerve fibre) उत्तेजित ग्राही पेशींशीजोडले गेले, तेव्हा सूक्ष्म एलेक्ट्रोड वापरुन मिळालेल्या पहिल्या विद्युत आवेगाची (electrical impulse) त्यांनी नोंद केली. त्यांना असे दिसून आले की, डोळ्यातील ग्राही पेशी (receptor cells) परस्पराशी अशा पद्धतीने जोडल्या गेलेल्या असतात की एक उत्तेजित झाला तर जवळपासचे दुसरे उदासीन होतात. अशाप्रकारे प्रकाशाची  तीव्रता कमी अधिक होते. वेगवेगळ्या आकारातील फरक ठळकपणे समजतो. हार्टलिन यांनी वैयक्तिक प्रकाश ग्राही पेशी (photoreceptors) आणि चेतातंतू (nerve fibres) यांच्या कार्याचा अभ्यास केला आणि त्यांनी दाखवून दिले की साध्या दृष्टिपटल कार्यप्रणालीमध्ये (retinal mechanism), दृष्टीसंबंधी माहितीच्या एकत्रीकरणात महत्त्वाच्या टप्प्यांचा समावेश होतो.

१९६७ साली हार्टलिन यांना शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. दृष्टीमधील चेताक्रियावैज्ञानिक यंत्रणेचे विश्लेषण या कार्यामुळे त्यांना हे पारितोषिक जॉर्ज वाल्ड व राग्नर ग्राणीत यांच्यासोबत दिले गेले. विविध विद्यापीठांकडून त्यांना सन्माननीय डॉक्टरेटच्या पदव्या मिळाल्या. आपल्या हयातीत ते अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्थांचे सदस्य बनले.

फॉल्सस्टन, मेरीलँड, अमेरिका येथे हार्टलीन यांचा मृत्यू झाला.

संदर्भ :

 समीक्षक : मोहन मद्वाण्णा