कोशिबा, मासातोशी : ( १९ सप्टेंबर, १९२६ )

मासातोशी कोशिबा यांचा जन्म जपानमधील तोयोहाशी इथे झाला. १९५१ साली टोकियो विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली आणि न्यूयॉर्क येथील रॉचेस्टर विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्रातील पीएच.डी. मिळवली. १९५८ ते १९६३ पर्यंत त्यांनी टोकियो विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात रिसर्च असोसिएट म्हणून कार्य केले. याच दरम्यान त्यांना शिकागो विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाच्या लॅबोरेटरी ऑफ हाय एनर्जी फिजिक्स अँड कॉस्मिक रेडीएशन या प्रयोगशाळेत प्रभारी संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. १९६३ ते १९७० या काळात टोकियो विद्यापीठात त्यांनी भौतिकशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून आणि पुढे १९७० नंतर प्राध्यापक आणि लॅबोरेटरी ऑफ हाय एनर्जी फिजिक्स अँड कॉस्मिक रेडीएशन या प्रयोगशाळेचे संचालक म्हणून कार्य केले.

कोशिबा यांनी १९८७ साली निवृत्त झाल्यावरही आपले अध्यापनाचे आणि संशोधनाचे कार्य सुरूच ठेवले आहे. टोकियो विद्यापीठात एमेरिटस् प्राध्यापक म्हणून तसेच सर्न विद्यापीठ, हॅम्बुर्ग विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठ अशा जागतिक कीर्तीच्या विद्यापीठांमधून त्यांनी अध्यापनाचे कार्य सुरू ठेवले आहे.

कोशिबा यांनी खगोलीय भौतिकशास्त्र आणि त्यातही वैश्विक प्रारणांमधील कणांवर संशोधन केले आहे. कित्येक वर्ष  शास्त्रज्ञाना गोंधळवून टाकणाऱ्या अणुच्या न्यूट्रीनो ह्या उपकणावर कोशिबा यांनी आपले सर्व संशोधन केंद्रित केले. सूर्याच्या गाभ्यात होणाऱ्या अणुकेंद्रकीय संमीलन ( Nuclear Fusion) प्रक्रियेत हायड्रोजन केंद्रकाचे रुपांतर हेलियमच्या केंद्रकामध्ये होऊन प्रचंड उर्जा बाहेर पडते, असे १९२० पासून ज्ञात होते. पुढे सैद्धांतिक गणनेनुसार वरील केंद्रीय संमीलन प्रक्रियेत असंख्य न्यूट्रीनो कण मुक्त होतात, आणि ह्या न्यूट्रीनो कणांचा वर्षाव सतत पृथ्वीवर होतो हे सिद्ध झाले. परंतु हे न्यूट्रीनो कण अत्यंत अल्प प्रमाणात द्रव्याशी क्रिया करत असल्याने त्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व सिद्ध करणे अत्यंत अवघड ठरले होते.

मासातोशी कोशिबा आणि रेमंड डेव्हिस ज्यूनिअर यांनी १९८० मध्ये न्यूट्रीनो शोधक यंत्राची निर्मिती केली. या यंत्राला कामिओकांडे – २ असे संबोधले गेले. कामिओकांडे – २ हे यंत्र म्हणजे एक प्रचंड मोठी पाण्याची टाकी होती आणि या पोलादी टाकीच्या सभोवताली सगळ्या बाजूंनी न्यूट्रीनोचे अस्तित्व शोधू शकतील असे इलेक्ट्रॉनिक संवेदक बसविण्यात आले होते. टाकीमध्ये असलेल्या जड पाण्यामध्ये (D2O) असलेल्या ड्युटेरीअम ह्या हायड्रोजनच्या समस्थानिकाशी न्यूट्रीनोची क्रिया झाली की इलेक्ट्रॉनिक संवेदकांमधून प्रकाशझोत बाहेर पडेल अशी योजना करण्यात आली होती.

कामिओकांडे – २ हे यंत्र जपानमधल्या जस्ताच्या खाणीमध्ये जमिनीखाली बसवण्यात आले आणि न्यूट्रीनोचे अस्तित्व शोधण्यासाठी प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांद्वारे सूर्याच्या प्रारणामधून न्यूट्रीनो पृथ्वीवर येतात हे कोशिबा यांनी निश्चित केले. त्यानंतर १९८७ साली कोशिबा यांनी आकाशगंगेच्या बाहेरील सुपरनोव्हाच्या विस्फोटामधून बाहेर पडणाऱ्या न्यूट्रीनो कणांचे अस्तित्व प्रयोगाद्वारे सिद्ध केले.

न्यूट्रीनो मूलकणांवर केलेल्या संशोधन कार्यामुळे कोशिबा यांना नोबेल पुरस्काराबरोबरच होम्बोल्ट प्राईझ, इस्रायल राष्ट्राध्यक्षांकडून देण्यात येणारे वोल्फ प्राईझ, अमेरिकन फिजिकल सोसायटीचे पॅनोफ्स्की प्राइझ, बेंजामिन फ्रँकलिन मेडल अशी इतरही अनेक पारितोषिके मिळाली आहेत.

संदर्भ :

  समीक्षक : हेमंत लागवणकर