मध्य भारत आणि दख्खनमधील प्रसिद्ध प्राचीन राजवंश. विसाव्या शतकातील सत्तरच्या दशकापर्यंत वाकाटक राजवटीच्या घडामोडींचे अवलोकन गुप्त साम्राज्याच्या परिप्रेक्ष्यातच केले जात असे. विशेषतः या काळातील कला इतिहासाचे गुप्त-वाकाटक अशा संयुक्त शीर्षकाखालीच वर्णन केले गेले. त्यामुळे वाकाटक कालखंडातील कला ही शैलीच्या दृष्टीने स्वतंत्र अशी वैशिष्ट्यपूर्ण कला होती, याची दखल घेतलेली दिसत नाही. परंतु अलीकडे झालेल्या विपुल संशोधनानंतर वाकाटक कालखंडाचे भारतीय कलाइतिहासातील योगदान समोर आले. विशेषत: काही कला प्रकारांमध्ये हा काळ जागतिक कला इतिहासात मानाने गौरविलेला आहे. उदा., अजिंठा. प्रस्तुत नोंदीत शिल्पकला आणि इतर तत्कालीन कलाविशेषांचा विचार केला गेलेला आहे.

वाकाटककालीन वामनशिव प्रतिमा शिल्प.

इ. स. तिसर्‍या शतकाच्या मध्यावधीत वाकाटक घराण्याचे स्वतंत्र अस्तित्व मध्य भारत (दक्षिण माळवा) आणि विदर्भात स्थापित झाले. इ. स. पाचव्या शतकाच्या अखेरपर्यंत वाकाटक प्रबळ राजसत्ता म्हणून दख्खन आणि त्या लगतच्या प्रदेशांवर राज्य करीत होते. या घराण्याच्या मुख्यत: नंदिवर्धन (नगरधन, जि. नागपूर) आणि वत्सगुल्म (वाशीम) अशा दोन प्रमुख शाखा होत्या. उपलब्ध पुरातत्त्वीय साधनांच्या आधारे या दोन शाखांचे ऐतिहासिक अस्तित्व दिसते. वाकाटक राजसत्तेचा परमोच्च सत्ताविस्तार हा प्रवरसेन दुसरा या राजाच्या कालखंडात झाल्याचे अभिलेखीय पुराव्यांवरून स्पष्ट होते. उत्तरेकडे विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेत कुंतल (उत्तर कर्नाटक) देश, तर पूर्वेकडे दक्षिण कोसल (छत्तीसगढ) पासून पश्चिमेकडे कोकणपर्यंत त्यांच्या राज्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव जाणवतो. हा भौगोलिक विस्तार वाकाटक कालखंडातील कला समजण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

सातवाहन काळात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र हा सत्तेच्या केंद्रस्थानी होता. परंतु वाकाटक काळात हे सत्तेचे केंद्र पूर्व विदर्भाकडे स्थलांतरित झाल्याचे दिसते. हा प्रदेश अगदी प्रारंभिक काळापासून विविध प्रकारच्या जनजमातींच्या समुदायांनी व्यापलेला होता. या सामाजिक पार्श्वभूमीचा सुद्धा वाकाटक कलेच्या प्रारंभिक शैलीवर प्रभाव पडला असण्याची शक्यता आहे. वरील संक्षिप्तपणे वर्णन केलेल्या भू-राजकीय परिप्रेक्ष्यातच कलाइतिहास तज्ज्ञांनी वाकाटक कलेची निर्मिती, विस्तार व प्रभावाचा विचार केलेला आहे. वाकाटक कला आणि त्या कलेची वैशिष्ट्ये पुढील प्रश्नांच्या अनुषंगाने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे : वाकाटक कलेची पार्श्वभूमी कशी तयार झाली? वाकाटक कलेची मानक वैशिष्ट्ये कोणती? वाकाटक कलेवर समकालीन इतर शैलींचा प्रभाव होता काय? वाकाटक शैलीचा वाकाटकोत्तर कालखंडात प्रभाव कसा आणि कितपत कायम राहिला? या सर्व प्रश्नांचा संक्षिप्त वेध खालीलप्रमाणे घेता येईल.

वाकाटक काळात स्थापत्य कला (लेणी व बांधीव मंदिरे), शिल्पकला, मृण्मयकला, कांस्य शिल्पकला, हस्तिदंत कला आणि चित्रकला इत्यादी कला प्रकार आढळतात. प्रारंभी शिल्पकलेच्या अनुषंगाने वाकाटक कलेचे परिशीलन केले आहे. शिल्पकलेच्या अनुषंगाने वाकाटक कलेचे दोन कालखंड दृग्गोचर होतात. वाकाटक काळातील कलेचा प्रारंभबिंदू म्हणून मांढळ (जि. नागपूर) येथील उत्खननात मिळालेल्या शिल्पांचा विचार करता येईल. या उत्खननात विविध देवदेवतांच्या प्रतिमा मिळाल्या. या प्रतिमा तत्कालीन प्राचीन भारताचा धार्मिक इतिहास आणि दख्खन मधील शिल्पकलेचा संपूर्ण इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.

वाकाटककालीन शिल्प.

सूक्ष्म अभ्यासांती मांडलेल्या निरीक्षणानुसार असे लक्षात येते की, वाकाटक कलेची वैशिष्ट्ये स्थानिक प्रेरेणेतूनच वृद्धिंगत झालेली असावी. या प्रेरणात्मक भागाची पृष्ठभूमी अमरावती, नागार्जुनकोंडा (आंध्र प्रदेश), वनवासी, कनगनहल्ली (कर्नाटक) आणि तेर (महाराष्ट्र) इ. ठिकाणी उपलब्ध झालेल्या शिल्पांवरून स्पष्ट होते. सुबक ठेंगणा बांधा, विस्तीर्ण खांदे, काहीसी जाड शरीररचना, लंब गोलाकार चेहरा, उठावदार विस्तीर्ण भाल प्रदेश, ओठाचा खालील काहीसा समोर आलेला जाडसरभाग, ठळक रेखीव डोळे, काहीसे पसरट नाक, विविध प्रकारची केशरचना (विशेषत: अगदी प्रारंभिक काळापासून कुरळ्या केसांचा अतिशय कल्पक वापर केशरचना करताना शिल्पकारांनी केलेला दिसतो), जाडेभरडे अधोवस्त्र आणि उत्तरीय, ठळक आणि मोजकेच अलंकार, आयुधे इत्यादी. या शिल्पांच्या आधारावर हे ही लक्षात येते की, तत्कालीन यक्ष प्रतिमांचा या शिल्पकलेवर प्रभाव असावा. त्यासोबतच सातवाहन-ईश्वाकु कालखंडाच्या उत्तर काळात ब्राह्मण आणि बौद्ध धर्मात आमुलाग्र बदल घडून येत होता. या बदलांमुळे विविध प्रतिमांच्या निर्मितीसाठी पोषक प्रेरणात्मक पार्श्वभूमी तयार होत होती. त्याची परमावधी आणि परिणती वाकाटक शिल्पकलेत झालेली आढळते.

मांढळ येथे मिळालेल्या प्रतिमांत अष्टमुख शिव (?), द्वादशमुख शिव (सदाशिव ?), संकर्षण (बलराम), वासुदेव (विष्णू), पार्वती, नैगमेष, देवी (दुर्गा) आणि ब्रह्मा इ. शिल्पांचा समावेश आहे. मध्य भारतात गुप्त साम्राज्याचा विस्तार होत होता. याच काळात (कुषाण/उत्तर कुषाण) सुदूर उत्तरेत मथुरेच्या आसपास आणि त्या लगतच्या प्रदेशात शिल्पकलेच्या संदर्भात आमुलाग्र बदल घडून येत होते. विविध कल्पनांचा वापर या ठिकाणी होत होता. या बरोबरच, याहीपलीकडे गांधार प्रदेशात बौद्ध आणि ब्राह्मण धर्मांच्या प्रतिमा निर्मितीच्या संदर्भात वेगवेगळे प्रयोग होत होते. वरील तीन मुख्य ठिकाणी प्रयोगांशी काही अंशी स्पर्धा करेल अशा कल्पनांचा वापर वाकाटक शिल्पकलेत दिसतो. या प्रयोगांच्या आधारावरच वाकाटक शिल्पकलेची मानके तयार झालेली असावी. या शिल्पकलेचे संपूर्ण सौंदर्यशास्त्र स्थानिक असल्याचे या आधारावर स्पष्ट होते. कारण या शिल्पांशी तुलना करावी अशा प्रकारच्या शिल्पांचा पूर्ण अभाव या काळात दिसतो. या काळात तयार होत असलेल्या प्रतिमानिर्मितीवर प्रारंभिक काळातील वैष्णव आणि शैव धर्मांच्या संकल्पनांचा मोठा प्रभाव असल्याचे अभ्यासकांनी निदर्शनास आणले आहे.

केवल नृसिंह शिल्प, रामटेक (नागपूर).

वाकाटक कलेचा दुसरा आणि महत्त्वाचा कालखंड प्रवरसेन दुसरा याच्या काळात सुरू झाल्याचे दिसते. या काळातील शिल्पकलेचे नमुने रामटेक, पवनार, मनसर, भद्रावती, भटाळा, पातुर, हमलापुरी, नगरधन, अजिंठा, घटोत्कच आणि सालबर्डी (मध्य प्रदेश) इत्यादी ठिकाणी पाहायला मिळतात. या बदलांचे प्रतिबिंब त्यांच्या तत्कालीन ताम्रपत्रातील मजकुरावरसुद्धा पडल्याचे दिसते. या काळात वाकाटक शिल्पकला मोठ्या प्रमाणात कलेच्या दृष्टीने परिष्कृत झाल्याचे दिसते. आपल्या स्थानिक कलेचे सत्व न विसरता आवश्यक ते बदल या काळात केले गेले. या बदलावर याच काळात उत्तरेत आणि मध्य भारतात जे शिल्पकलेत बदल घडत होते, त्याचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषत: शिल्पांची प्रमाणबद्धता, सुबक आणि रेखीव शरीर रचना. उदा., पवनार (जि. वर्धा)  येथील गंगेची प्रतिमा, गोलाकार चेहरा, सुंदर रेखीव डोळे, तलम वस्त्राचे अंकन, किंचित वाढलेले परंतु, सुबक अलंकरण उदा. मनसर येथील वामनशिव (?) प्रतिमा  इत्यादी. या काळात शिल्पांच्या विषयात सुद्धा वैविध्य आढळते. उदा., पवनार येथे खोदकामात मिळालेल्या रामायण आणि कृष्ण लीलांशी संबंधित शिल्पपट. या शिल्पांमध्ये त्या त्या देवतेच्या प्रकृतीधर्मानुसार त्यांचे दर्शन शिल्पकारांनी घडवल्याचे जाणवते. या काळातील शिल्पांमध्ये एक प्रकारचा राजस भाव प्रदर्शित होतो. त्यासोबतच देवदेवतांच्या शिल्प विषयांचे वैविध्य आणि कल्पकता पुरेपूर जपल्याचे दिसते. उपलब्ध प्रतिमांवरून शैव आणि वैष्णव संप्रदायाचे स्थान या काळात दृढ झाल्याचे स्पष्ट होते.

या काळातील शिल्पकलेच्या परमावधीचे मानबिंदू म्हणून काही शिल्पांचा निश्चितच उल्लेख करता येईल. उदा., रामटेक येथील केवल नृसिंह/रुद्र नृसिंह, मनसर येथील वामन शिव (?) आणि पवनार येथील गंगेची प्रतिमा. ही शिल्पे वाकाटक कलेची स्वयंसिद्ध वैशिष्ट्ये स्पष्ट करण्यास आणि समग्रपणे समजून घेण्यास पुरेशी आहेत. कलाइतिहास तज्ज्ञांनी या शिल्पांची प्रशंसा केलेली आहे. वरील उल्लेखित प्रतिमांत रामटेक येथील केवल नरसिंहाचे शिल्प वाकाटक राजवंशाच्या राजकीय प्रभाव आणि अस्तित्वाचे उत्कृष्ट उदाहरण ठरते.

वाकाटक काळातील शिल्पे ही मुख्यत: अग्निजन्य आणि वालुकाश्म या दोन प्रकारच्या दगडांत शिल्पांकित केली आहेत. माहुरझरी, पवनार, भोकरदन, मनसर, वाशीम आणि नगरधन आदी ठिकाणी उत्खननात उपलब्ध झालेल्या प्रतिमांत लज्जागौरी, नरसिंह, महिषासुरमर्दिनी, विष्णू, गणपती इ. देवतांच्या दगडाच्या प्रतिमा मिळाल्या आहेत. या सर्व प्रतिमा आकाराने जरी लहान असल्या, तरी शिल्पांकनाच्या दृष्टीने तत्कालीन आकाराने भव्य शिल्पांच्या प्रतिकृती वाटतात. या शिल्पांच्या आधारे प्रचलित लोकधर्मासोबतच शैव आणि वैष्णव संप्रदायाचा कसा प्रसार झाला, हे समजावून घेता येते.

अजिंठा येथील शैलगृहांमध्ये असेलेल्या शिल्पांतून बौद्ध धर्माशी संबंधित शिल्पकलेचा वाकाटक काळात कसा विकास झाला, याचे उत्कृष्ट दिग्दर्शन होते. येथील शिल्पकला वाकाटकांच्या वत्सगुल्म शाखेच्या साहाय्याने जरी विकसित झाली असली, तरीही तिचा नंदिवर्धन शाखेशी अन्योन्य संबंध आढळतो. उत्कृष्ट उठावात कोरलेली ही शिल्पे प्रमाणबद्धता, शरीर लय आणि बोलके भाव या वैशिष्ट्यांसाठी ओळखली जातात. अजिंठा येथील शिल्पकलेतून होणारे बुद्धाचे विलोभनीय दर्शन वाकाटक काळातील कलेचा परमोत्कर्ष म्हणून उल्लेख केला जातो. विशेषतः बुद्धाचे महापरिनिर्वाण शिल्प बुद्धाच्या महाकारुणिक अवस्थेचे अप्रतिम भावदर्शन म्हणून भारतीय कला क्षेत्रात उदाहरण दिले जाते. याठिकाणी असलेल्या शिल्पांची प्रमाणबद्धता ही तत्कालीन चित्रकलेशी साधर्म्य आणि संवाद साधणारी आहे, असे कलातज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे.

या काळात शिल्पकलेची जी वैशिष्ट्ये वृद्धिंगत होत होती, त्या वैशिष्ट्यांचा प्रभाव आणि प्रसार वाकाटकांच्या प्रत्यक्ष अंमलाखाली असलेल्या प्रदेशासोबतच त्यांचे मांडलिक असलेल्या प्रदेशांतील शिल्पकलेवर पडलेले दिसते.  उदा., कोकण मौर्य, कदंब, नल, पांडूवंशी, सोमवंशी इ.

वाकाटक सत्तेचा अस्त झाल्यानंतर दख्खनमध्ये वनवासीचे कदंब, बदामीचे चालुक्य, दक्षिण गुजरात, कोकण, माळवा आणि उत्तर महाराष्ट्रात महिष्मतीचे कलचुरी, दक्षिण कोसलमध्ये पांडूवंशी या राजवंशाच्या अखत्यारीत असलेल्या प्रदेशांत जे स्थापत्य आणि शिल्पकला निर्माण होत होती, या सर्वांवर वाकाटक कलेचा मोठा प्रभाव होता. पुढे राष्ट्रकुट काळात वाकाटक कलेच्या पार्श्वभूमीवर दख्खनमधील कलेचा विस्तार आणि प्रसार झाल्याचे दिसते.

वाकाटक काळात मृण्मय कलेचे स्वतंत्र स्थान होते. परंतु सातवाहन काळात मृण्मय कलेचे प्रयोग झाले, तसे वाकाटक काळात आढळत नाहीत. ज्या मोजक्या मृण्मय प्रतिमा पुरातत्त्वीय सर्वेक्षण आणि उत्खननांतून उपलब्ध झाल्या, त्यावरून या काळातील मृण्मय कलेचे आकलन करता येते. हाताने तद्वतच साच्यात तयार केलेल्या मृण्मय प्रतिमा या काळातील मिळतात. प्रतिमांचा विषय आणि त्यांची घडण यांवर तत्कालीन दगडी शिल्पकलेचा प्रभाव दिसतो. उपलब्ध मृण्मय प्रतिमांत विविध प्रकारचे प्राणी, लहान मुलांची खेळणी, अलंकार, शिक्के, शिक्क्यांचे छाप, गृह सजावटीच्या वस्तू, देवदेवतांच्या प्रतिमा मिळालेल्या आहेत. विशेषतः अलीकडेच मनसर, चंदनखेडा आणि नगरधन येथे झालेल्या उत्खननांतून वाकाटककालीन उत्कृष्ट मृण्मय प्रतिमा उपलब्ध झाल्या आहेत. चंदनखेडा (जि. चंद्रपूर) येथील उत्खननात आढळलेली मृण्मय प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण आहे. साच्यात तयार केलेली ही मृण्मय प्रतिमा मूळ स्वरूपात गोलाकार असावी. या प्रतिमेत दर्शनी बाजूस हलक्या उठावात स्त्री आणि पुरुष प्रतिमेचे अंकन असून ते गंधर्व युगल असावे. कारण या अंकनात आकाशस्थ विहरण्याचे प्रतिमांकन अतिशय जिवंतपणे केले आहे. या मृण्मय प्रतिमेवर तत्कालीन चित्रकला आणि शिल्पकलेचाही प्रभाव दिसतो.

वाकाटक काळातील कांस्य शिल्पांचे फार मोजकेच पुरावे उपलब्ध आहेत. या उपलब्ध पुराव्यांमध्ये हमलापुरी (जि. नागपूर) येथे खोदकामात मिळालेल्या कांस्य शिल्पांचा उल्लेख करता येईल. या बुद्ध प्रतिमा असून तत्कालीन कांस्य शिल्पात उत्कृष्ट प्रतिमा म्हणून गणल्या जातात. कांस्य धातूच्या ओतीव प्रकाराद्वारे या प्रतिमांची निर्मिती केली आहे. या कांस्य प्रतिमा सारनाथ (उत्तर प्रदेश) आणि नालंदा (बिहार) येथे प्राप्त झालेल्या कांस्य प्रतिमांशी कलात्मक साधर्म्य दर्शवितात.

वाकाटक काळात इतर कलेच्या प्रकारांमध्ये हस्तिदंतावरील कलाकुसरीच्या वस्तू, हाडांवरील कोरीव काम यांचा उल्लेख करता येईल. या वस्तूंचे प्रमाण तुलनेने फारच कमी आहे. उदा., कज्जलशलाका, सारीपाटच्या खेळातील सोंगट्या, केस विंचरण्याचा कंगवा, चाकू इत्यादी. परंतु कलात्मक दृष्ट्या विशेष उल्लेखनीय असे यांमध्ये आढळून येत नाही.

अशा प्रकारे प्रामुख्याने दोन मुख्य कालखंडात वाकाटक कलेचा विचार करता येतो. मांढळ हे प्रारंभिक काळातील, तर नंदिवर्धन (नगरधन), रामटेक, मनसर इ. ठिकाणी वाकाटक कलेच्या द्वितीय कालखंडातील शिल्पे उपलब्ध झाली. या दोन्ही कालखंडांच्या सूक्ष्म अवलोकनातून वाकाटक कलेचा अभिजाततेकडे झालेल्या प्रवासाचा समग्र अभ्यास करता येतो.

संदर्भ :

  • Bakker, Hans, The Vākātakas : An Essay in Hindu Iconology, Groningen, 1997.
  • Jamkhedkar, A. P. Eds., Gai, G. S. & Asher, M.  ‘Narrative Sculptures from Paunar : A Reappraisal’, Indian Epigraphy ; Its Bearing on the History of Art, pp. 83-86, New Delhi, 1985.
  • Sharma, A. K. & Joshi, Jagat Pati, Excavations at Mansar, Delhi, 2015.
  • Singh, H. N. & Trivedi, Preety A. Mandhal Excavation (1975-77), Nagpur, 2019.
  • Soundara Rajan, K. V. Art of South India-Deccan, Delhi, 1980.
  • Welankar, Vaishali, Vaishnavism : An Iconographic Study, 2 vols., Delhi, 2009.
  • जामखेडकर, अ. प्र. पुरासंचय (भाग १), पुणे, २०१६.
  • मिराशी, वा. वि. वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ, नागपूर, १९५७.
  • मेश्राम, प्र. शा.; खोब्रागडे, प्रि. आणि गणवीर, श्रीकांत, भद्रावतीचे पुरातत्त्वीय वैभव, नागपूर, २००४.

चित्रसंदर्भ : केवल नृसिंह शिल्प, रामटेक, जि. नागपूर (डॉ. अभिजित दांडेकर यांच्या सौजन्याने).

समीक्षक : श्रीकांत गणवीर