स्माल्टाइट

स्माल्टाइट हे कोबाल्ट जास्त व आर्सेनिक कमी असणारे खनिज आहे. स्माल्ट ही गडद निळ्या रंगाची काच असून तिच्या संदर्भातून स्माल्टाइट हे नाव आले आहे. याचे स्फटिक घनीय आहेत. मात्र हे सामान्यपणे संपुंजित व जालकरूपात आढळते. पाटन अस्पष्ट; भंजन कणमय व ओबडधोबड; ठिसूळ; कठिनता ५.५ – ६; वि. गु. ५.७ – ६.८; चमक धातूसारखी; रंग कथिलासारखा पांढरा, संपुंजित प्रकाराचा रंग पोलादाप्रमाणे करडा, कधीकधी रंगदीप्त व मळल्यामुळे करडसर; कस करडसर काळा; अपारदर्शक. रा. सं. अंदाजे (Co, Ni) As2-x; म्हणजे रा. सं. पुष्कळ वेगळी असू शकते. कधीकधी यात लोह व अत्यल्प गंधकही असू शकते. हे बंद नळीत तापविल्यास आर्सेनिक व उघड्या नळीत तापविल्यास आर्सेनिक ट्राय-ऑक्साइड संप्लवनाद्वारे मिळतात.

स्माल्टाइट पुष्कळ वेळा कोबाल्ट व निकेल यांच्या खनिजांबरोबर खनिज शिरांमध्ये आढळते. कधीकधी हे सोने व तांबे यांच्या धातुकांमध्ये स्फॅलेराइट, गॅलेना, आर्सेनोपायराइट या खनिजांबरोबर आढळते. बोहीमिया, सॅक्सनी, कार्नवॉल, न्यू साऊथ वेल्स, फ्रान्स, स्वित्झर्लंड इ. ठिकाणी हे आढळते. निकेल व कोबाल्ट यांचे गौण धातुक म्हणून याचा उपयोग होतो.

समीक्षक :  श्रीनिवास वडगबाळकर