शॉक्ली, विल्यम ब्रॅडफर्ड : (१३ फेब्रुवारी, १९१० – १२ ऑगस्ट, १९८९)

शॉक्ली यांचा जन्म लंडनमधे झाला. त्यांचे बालपण पालो आल्टो या कॅलिफोर्नियातील गावात गेले. त्यांचे वडील विल्यम हिलमन शॉक्ली हे खाणकाम अभियंता होते तर त्यांची आई मेरी शॉक्ली ही स्टँडफर्ड विद्यापीठाची पदवीधर आणि पहिली महिला खाणकाम पर्यवेक्षक होती.

कॅलटेकमधून शॉक्ली यांनी विज्ञान शाखेतील पदवी मिळवली व नंतर मॅसॅच्यूसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून पीएच्.डी. पदवी मिळविली. पीएच्.डी.साठी त्यांनी लिहिलेल्या प्रबंधाचे शीर्षक होते, ‘सोडियम क्लोराईडच्या कणामधील अनुबंध’ नंतर त्यांनी न्यू जर्सी येथील बेल लॅबमध्ये क्लिन्टन डेव्हिसन यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या गटाबरोबर संशोधन कार्य करण्यास सुरुवात केली. १९३८ मध्ये शॉक्ली यांना त्यांनी विकसित केलेल्या ऋणभारित आयन वृद्धिंगत करणाऱ्या उपकरणाचे हक्क मिळाले. या काळात फिजिकल रिव्ह्यू या संशोधनपर नियतकालिकामधे त्यांचे अनेक निबंध प्रसिद्ध झाले.

कोलंबिया महाविद्यालयाच्या अँन्टी सबमरीन वॉरफेअर ऑपरेशन ग्रुपवर संशोधक प्रमुख म्हणून १९४२ मध्ये दाखल झाले. रडार हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. या प्रकल्पावर काम करीत असतांना अनेक नवीन तंत्रांचा शोध त्यांना घ्यावा लागला. या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी ते वॉशिंग्टन, पेंटॅगॉन येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आले. १९४४ मध्ये बी-२९ या बॉम्ब टाकणाऱ्या लढाऊ विमानांच्या वैमानिकांसाठी नवीन रडारचा वापर अचूक लक्ष्यवेध साधण्यासाठी कसा करायचा यावर कार्यशाळा घेतली.

विल्यम शॉक्ली यांनी या काळात केलेल्या कामाचा अहवाल सादर केला. या अहवालाचा १९४५ साली हिरोशिमा व नागासाकीवर बॉम्ब टाकण्याचा निर्णय घेण्यात मोठा वाटा आहे. दुसरे महायुद्ध संपल्यावर विल्यम शॉक्ली पुन: बेल लॅबमध्ये घन स्थिती भौतिकशास्त्र (Solid State Physics) या विषयावर संशोधन करणाऱ्या संशोधक गटाचे प्रमुख म्हणून दाखल झाले. इलेक्ट्रॉनिक उपकरणामधील निर्वात काचनलिकेला पर्याय शोधणे यावर संशोधन अपेक्षित होते. १९५१ साली विल्यम शॉक्ली यांनी ‘जंक्शन ट्रान्झिस्टर’ हे संशोधन जाहीर केले. ते नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस (एनएएस) वर सदस्य म्हणून निवडून आले. नंतर दोन वर्षात एनएएसकडून कॉमस्टॉक प्राईज या पारितोषिकाचे ते मानकरी ठरले.

विल्यम शॉक्ली, जॉन बार्डिन, वाल्टर ब्रॅटेन यांना १९५६ साली ट्रान्झिस्टरच्या शोधाबदद्ल भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नवीन रचनेच्या ट्रान्झिस्टरचे विल्यम शॉक्ली यांनी १९५० ते १९६० या दशकामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कॅलिफोर्नियामधे उत्पादन केले की हा प्रदेश ‘सिलीकॉन व्हॅली’ या नावाने ओळखला जाऊ लागला.

विल्यम शॉक्ली उत्तम व्याख्याते होते.  गिर्यारोहणाचीही त्यांना आवड होती. १९६० च्या सुमारास विल्यम शॉक्ली यांनी वांशिक गुणवत्तेवर (जेनिटिक्स) त्यांचे विचार मांडायला सुरुवात केली. त्यांनी त्यांचे वीर्य एका वीर्य बँकेला दान दिले. भविष्यात चांगली पिढी निर्माण होण्यासाठी कर्तृत्ववान लोकांनी वीर्यदान करावे, असे त्यांचे मत होते. त्यांच्या या मतांमुळे जनमानसात खूप नाराजी निर्माण झाली. परंतु नोबल पुरस्काराचे मानकरी, १३० कोटी डॉलर्सची सेमीकंडक्टर्सची कारखानदारी सुरू करूनही त्यांना त्यांचे वांशिकतेबद्दलचे संशोधन व विचार अधिक महत्त्वाचे वाटत होते.

कॅलिफोर्नियामधील पालो आल्टो येथे वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : हेमंत लागवणकर