फिच, वाल लॉग्जडन : ( १० मार्च, १९२३ – ५ फेब्रुवारी, २०१५ )

अमेरिकन अणुभौतिकीशास्त्रज्ञ फिच यांचा जन्म अमेरिकेच्या नेब्रास्का प्रांतातील एका गुराखी कुटुंबात झाला. फिच यांचे शालेय शिक्षण गॉर्डन येथे पूर्ण झाले. पुढील अभ्यासासाठी त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला खरा; परंतु त्यावेळी दुसरे महायुद्ध सुरू असल्यामुळे त्यांच्या अभ्यासात खंड पडला.

फिच यांना १९४३ साली अमेरिकन सैन्यात भरती व्हावे लागले. सैन्यात दाखल झाल्यावर त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यानंतर प्रसिद्ध मॅनहॅटन प्रकल्पासाठी काम करण्यास फिच यांना सांगण्यात आले. यावेळी लॉस अलामॉस (Los Alamos Laboratory) प्रयोगशाळेत तांत्रिक सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. तेथे त्यांना नील्स बोर, जेम्स चॅडविक, एन्रिको फर्मी, रिचर्ड टोलमन यांच्यासारख्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. हा सर्व अनुभव फिच यांच्यासाठी पुढे अत्यंत उपयोगी पडला. यातून प्रेरणा घेत त्यांनी भौतिकशास्त्रज्ञ व्हायचे निश्चित केले.

महायुद्ध संपल्यावर फिच यांनी १९४८ मध्ये मॅक्‍गिल विद्यापीठातून (McGill University) विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी मिळविली. त्यानंतर १९५४ साली फिच यांनी कोलंबिया विद्यापीठातून म्यूमेसॉनयुक्त अणुंमधून (mu-mesonic atoms) बाहेर पडणार्‍या क्ष किरणांचा अभ्यास करून पीएच.डी. पदवी मिळविली. त्यांचे मार्गदर्शक होते १९७५ सालचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते जेम्स रेनवॉटर. म्यूमेसॉनयुक्त अणुंमधून बाहेर पडणाऱ्या गॅमा किरणांचे मापन करण्याच्या प्रयोगाची रचना आणि आवश्यक त्या उपकरणांची मांडणी देखील फिच यांनी केली.

फिच यांनी बरेचसे संशोधनाचे काम ब्रुकहेवन राष्ट्रीय प्रयोगशाळेत (Brookhaven National Laboratory) केले. तेथे त्यांची भेट जेम्स क्रोनिन (S हायपरलींक) यांच्याशी झाली. दोघांनी मिळून प्रिन्स्टन विद्यापीठात के मेसॉनच्या (k meson) विघटन क्रियेचा अभ्यास करून एक क्रांतिकारी निष्कर्ष काढला. त्यांच्या मते मूलकणांमधील घडणारी एखादी आंतरक्रिया आणि स्वतंत्रपणे त्यांच्याच प्रतिकणांमधील आंतरक्रिया (C charge conjugation symmetry) या तंतोतंत एकसारख्या असत नाहीत. तसेच एखाद्या प्रक्रियेची परावर्तित प्रक्रिया (P parity symmetry) मूळ प्रक्रियेसारखी असत नाही. काही मूलकणांच्या आंतरक्रिया हे सममितिचे तत्त्व झुगारून देतात (CP violation – charge conjugation parity symmetryviolation) हाच त्यांच्या प्रयोगाचा निष्कर्ष होता. याच नवीन कल्पनेसाठी त्या दोघांना १९८० सालचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार विभागून दिला गेला.

सध्याच्या विश्वात प्रतिद्रव्यापेक्षा (antimatter) द्रव्य (matter) खूपच मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे. महाविस्फोटापासून (Big Bang) पहिल्या काही सेकंदात सममितिची वरील तत्त्वे पाळली गेली नसल्यानेच ही द्रव्य-प्रतिद्रव्य असमानता निर्माण झाली असली पाहिजे. फिच आणि क्रोनिन यांचे संशोधन या निरीक्षणाला पुष्टी देते.

फिच यांनी निवृत्त होईपर्यंत प्रिन्स्टन विद्यापीठात अध्यापनाचे काम केले. त्यांना लॉरेन्स अवॉर्ड (Lawrence Award), वेदरिल मेडल (Wetherill Medal) आणि नॅशनल मेडल ऑफ सायन्स देऊन सन्मानित करण्यात आले. १९७० ते १९७३ या काळात फिच यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांच्या शास्त्रविषयक सल्लागार समितीवर काम केले. त्याचप्रमाणे १९८८-१९८९ या काळात त्यांनी अमेरिकन फिजिकल सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली.

प्रिन्स्टन येथे फिच यांचे निधन झाले.

संदर्भ :

 समीक्षक : हेमंत लागवणकर