स्वेट, मिखाईल : ( १४ मे, १८७२ – २६ जून, १९१९ )
स्वेट यांचा जन्म इटलीच्या अस्टी ( Asti ) या शहरात झाला. त्यांची आई इटालियन तर वडील रशियन वंशाचे होते. सुरुवातीला स्वित्झर्लंडमधील लॉझन (Lausanne) आणि नंतर जिनिव्हा (Geneva) शहरात लहानाचे मोठे झाले. १८९३ मध्ये त्यांनी जिनिव्हा विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान आणि गणित विभागातून बी.एस. ही पदवी संपादन केली. परंतु वनस्पतीशास्त्राच्या आवडीने त्यांनी पुढील संपूर्ण आयुष्य या विषयातच घालविले. १८९६ मध्ये त्यांनी वनस्पतींच्या पेशींची रचना आणि शरीरक्रियाशास्त्रावर (cell physiology) सखोल अभ्यास करून पीएच्. डी. पदवी प्राप्त केली.
स्वेट १८९६ मध्ये सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे गेले. स्वित्झर्लंडमधील पीएच्. डी. पदवीस रशियामध्ये मान्यता नव्हती. रशियातील कनिष्ठ पदावरील नोकरीसाठी रशियाचीच मास्टर पदवी आणि वरिष्ठ पदावरील नोकरीसाठी रशियाचीच पीएच्. डी. पदवी आवश्यक होती. त्यावेळी त्यांना रशियन भाषेचे देखील पूर्ण ज्ञान नव्हते.
अखेर डिसेंबर १८९६ मध्ये त्यांना रशियाच्या रशियन अकॅडमी ऑफ सायन्सच्या जैवविज्ञान प्रयोगशाळेमध्ये तात्पुरती नोकरी मिळाली. ते महिलांसाठीच्या वनस्पतीशास्त्रातील पाठ्यक्रमाचे शिक्षक झाले. पुढे रशियाच्या कझान (Kazan) विद्यापीठातून मास्टर डिग्री प्राप्त केली. टोबॅको मोसाईक व्हायरसचा शोध लावणारे विषाणूतज्ञ ईवानोवस्की (Ivanovskii) यांनी स्वेटना पोलंडमधील वॉर्सा (Warsaw) विद्यापीठाच्या वनस्पती शरीरक्रियाशास्त्र संस्थेमध्ये आमंत्रित केले आणि प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नोकरी दिली. पुढे सहाय्यक प्राध्यापक झाल्यानंतर विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र विभागात त्यांनी शिकविण्याचे काम केले.
मिखाईल स्वेट यांच्या स्वित्झर्लंडमधील पीएच्.डी.च्या प्रबंधाचा आणि भविष्यातील संशोधनाचा काही संबंध नव्हता. केवळ वनस्पतींच्या रंगद्रव्यांचा अभ्यास करण्याची त्यांची आवड सुरुवातीपासूनच दिसून येत होती. त्यांचे संशोधन वनस्पतींच्या रंगद्रव्यावर होते. त्यांनी वर्णलेखन या रासायनिक पृथःकरणाच्या पद्धतीचा शोध लावला. वनस्पतीतील रंगद्रव्ये वेगळी करण्यासाठी त्यांनी स्तंभ वर्णलेखनाची (कॉलम क्रोमॅटोग्राफी) पद्धत विकसित केली. यामध्ये त्यांनी कॅल्शियम कार्बोनेट या रासायनिक घटकाचा अधिशोषक (ॲडसॉर्बंट) म्हणून तर पेट्रोल आणि इथर किंवा इथेनॉल यांच्या मिश्रणाचा निक्षालक (इफ्लूएंट) म्हणून वापर केला. ही पद्धत त्यांनी सेंट पीटर्सबर्ग येथील अकराव्या काँग्रेस ऑफ नॅचरॅलिस्टस अँड फिजिशियन्समध्ये सांगितली. याबाबत त्यांचे पहिले लेखन प्रोसिडिंग्ज ऑफ द वॉर्सा सोसायटी ऑफ नॅचरॅलिस्टस, बायॉलॉजी सेक्शनमध्ये प्रकाशित झाले. स्वेट यांनी त्यांचे लिखाण दिल्यावर ते दोन वर्षानंतर प्रसिद्ध झाले. त्यांनी जर्मन बोटॅनिकल जर्नलमध्ये हरितद्रव्य (क्लोरोफिल) या विषयावरील दोन शोधनिबंधात वर्णलेखन हा शब्द पहिल्यांदा वापरला. नंतर त्यांनी वर्णलेखनाचे तंत्र, वर्णलेख आणि त्याची उपयोगिता यावरचा निबंध जर्मन बोटॅनिकल सोसायटीला सादर केला. १९०८ मध्ये स्वेट यांनी त्यांचे संपूर्ण काम संकीर्णपणे पुस्तकाच्या स्वरुपात प्रकाशित करण्याचे ठरविले आणि दोन वर्षांनी क्लोरोफिल्स इन द प्लांट अँड ॲनिमल वर्ल्ड या शीर्षकाचे पुस्तक प्रकाशित केले. याच पुस्तकामुळे त्यांना रशियाची डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली. तसेच इम्पेरिअल रशियन अकॅडेमी ऑफ सायन्सने त्यांना एम.एन. अख्माटोव प्राईझ या प्रतिष्ठीत पुरस्काराने सन्मानित केले. पुढे त्यांनी जर्मन आणि फ्रान्समधील अनेक जर्नल्समध्ये आपले शोधनिबंध प्रकाशित केले.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील रशियातील अनेक घटनांमुळे स्वेट यांचे काम बराच काळ अप्रसिद्ध आणि दुर्लक्षित राहिले. प्रामुख्याने, स्वेट यांनी केवळ रशियन भाषेमध्येच आपले संशोधन प्रकाशित केले होते त्यामुळे ते पाश्चिमात्य वैज्ञानिकांना पाहता येत नव्हते.
पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाल्यानंतर स्वेट यांना वॉर्सा विद्यापीठ सोडावे लागले. नंतर स्वेट, रशियातील ईस्टोनियाच्या (Estonia) तर्तू (Tartu) विद्यापीठात वनस्पतीविज्ञानाचे पूर्णवेळ प्राध्यापक आणि उद्यान विभागाचे संचालक झाले. परंतु जेंव्हा जर्मन सैनिकांनी ईस्टोनिया शहरदेखील ताब्यात घेतले, त्यावेळी तर्तू विद्यापीठाचेसुद्धा वोरोनेझ (Voronezh) या मध्य रशियाच्या दक्षिण भागातील मोठ्या शहरामध्ये स्थलांतर झाले आणि स्वेट यांना तर्तू विद्यापीठसुद्धा सोडावे लागले. अखेर ते वोरोनेझमधील न्यू स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक झाले.
स्वेट यांच्या संशोधनाचे विविध क्षेत्रात असलेले महत्त्व आणि उपयोगिता यांचा समाजात पुरेसा सन्मान न होता, वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी घशाच्या आजाराने स्वेट यांचे निधन झाले. मृत्युपश्चात प्रदीर्घ कालावधीनंतर स्वेट यांच्या कामाचे पुनरावलोकन झाले. १९४२ साली एजेपी मार्टिन आणि आरएलएम सिंज यांनी वर्णलेखनाच्या तंत्रातील तत्त्वांचा उलगडा केला आणि त्यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. या तंत्राचा उपयोग संशोधन आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जातो.
संदर्भ :
- Mikhail Tsvet (1872-1919) ‘Physical chemical studies on chlorophyll adsorptions.’
- http://web.lemoyne.edu/~giunta/tswett.html
- ‘Who is Mikhail Tsvet?’ https://www.chromatographytoday.com
- ‘Tsvett’s column’ https://www.chemistryworld.com/opinion/tsvetts-column/6963.article
- https://www.britannica.com/biography/Mikhail-Semyonovich-Tsvet
समीक्षक : रंजन गर्गे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.