कोबिल्का, ब्रायन के. : ( ३० मे, १९५५ )
कोबिल्का यांचा जन्म मिनेसोटा राज्यातील लिटल फॉल्स नावाच्या एका खेड्यात झाला. त्यांनी येल विद्यापीठातून वैद्यकशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण मिळवल्यानंतर बार्नेस हॉस्पिटलमध्ये त्यांचे वैदयकीय प्रशिक्षण चालू असताना त्यांना अतिदक्षता औषधोपचारामध्ये आवड निर्माण झाली. अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या रुग्णांना जी प्रोटीन कपल्ड रिसेप्टरच्या मदतीने ह्रदयाचे कार्य, रक्तदाब आणि वेदना नियंत्रित करण्यासाठी तात्काळ सेवा द्यावी लागते, त्या जी प्रोटीन रिसेप्टरमध्ये अड्रेनेर्जिक आणि स्नायू संबंधित रिसेप्टरचा समावेश असतो. या क्षेत्रातल्या आवडीमुळेच त्यांनी ड्युक विद्यापीठात ह्रदयाशी संबंधित संशोधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. तेथे संशोधकांना अनेक वर्षे काम करता येते होते. त्याचवेळी अशाप्रकारचे संशोधन ड्युक विद्यापीठात प्रा. रॉबर्ट लेफ्कोवित्झ यांच्या प्रयोगशाळेत चालू होते. ह्रदय आणि अतिदक्षता औषधोपचारासंबंधी मूलभूत संशोधन करण्याची संधी कोबिल्का यांना मिळाली आणि प्रो.लेफ्कोवित्झ त्यांच्याबरोबर त्यांनी संशोधन सुरू केले.
मानवी शरीरातील पेशीमध्ये संदेशाची देवाणघेवाण कशी होते ? पेशींना बाह्यशरीरात काय चालते आहे यासंबंधिची माहिती किंवा इशारा देण्यामध्ये अड्रेनालीन संप्रेरकाची काही तरी भूमिका आहे हे १९६८ च्या सुमारास माहिती होते. कारण, त्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे कार्य जोराने सुरू होते. या रेणुमुळे पेशीला संदेश मिळतात. पण हा रसायनरूपी संदेश ग्रहण होण्यासाठी पेशी आवरणावर त्या रेणूची ओळख पटली पाहिजे. पेशीवर ज्या ठिकाणी अड्रेनालीनची रासायनिक रचना ओळखली जाते, त्याला त्यांनी बीटा-अड्रेनेर्जिक रिसिप्टर साइट असे नाव दिले.
बाह्य परिस्थितीची माहिती पेशीला मिळावी म्हणून अड्रेनालीनचा प्रवेश पेशीच्या अंतर्गत भागात व्हावा लागतोच असे नाही. मात्र, तो रेणू संकेतस्थळाला संलग्न व्हायला हवा. तथापि, या रेणूचा पेशी आवरणावर, संकेतस्थळावर संयोग तरी कसा होतो याकरिता प्रो. लेफ्कोवित्झ यांनी प्रयोगशाळेत अड्रेनालीन तयार करताना त्या रेणूत किरणोत्सर्गी आयोडीनचा समावेश केला. संशोधकांना किरणोत्सर्गी आयोडीनचा मागोवा घेता घेता अड्रेनालीनच्या पेशीबरोबर होणार्या क्रिया-प्रक्रिया समजल्या. लेफ्कोवित्झच्या गटात १९८० नंतर ब्रायन कोबिल्का पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून सामील झाले. त्यांनी हजारो मानवी जनुकांमधून प्रथिनस्वरूपी बीटा-अड्रेनिर्जिक संकेतस्थळ तयार करणार्या जनुकाचा शोध घेतला.
यानंतर कोबिल्का १९८९ मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये संशोधन करायला गेले तेव्हा त्यांनी बीटा-रिसेप्टर’च्या संरचनेचे संशोधन हाती घेतले. त्यासाठी त्यांनी मुख्यत्वेकरून क्ष-किरण स्फटिकशास्त्रातील तंत्र वापरायला सुरूवात केली. अड्रेनालीन जेव्हा पेशी आवरणातील संकेतस्थळाशी संलग्न होते, त्या क्षणी पेशी आवरणाच्या आतून तीन प्रथिनांच्या उपसाखळ्यांनी घडलेली रचना उकलली जाते आणि ते संप्रेरक म्हणजे अड्रेनालीन पेशीला जरूरीचा इशारा देते. या क्षणी अड्रेनालीनची संरचना किंचित बदलते. आश्चर्य म्हणजे, त्या संकेतस्थळाची रचना आपल्या डोळ्यांत प्रकाशग्रहण करणार्या संकेतस्थळाच्या रचनांशी साम्य दाखवतात. या प्रकारच्या रचनांना जी-प्रोटीन कपल्ड रिसेप्टर या नावाने ओळखले जाते.
मानवात अशा संकेतस्थळांची संख्या एक हजारपर्यंत आहे. २००० सालानंतर मानवी जनुकांच्या क्रमवारीसाठी जो प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करून आराखडा तयार केला गेला, त्यावरून हे लक्षात आले होते. ब्रायन कोबिल्का यांनी एक्स-रे क्रिस्टलोग्राफीचे तंत्र आणि इतर काही प्रयोग करून वेगवेगळ्या संवेदना किंवा संदेश देण्या-घेण्यासाठी जे जी प्रोटीन कपल्ड रिसेप्टर असतात, त्यांच्या संकेतस्थळाच्या संरचनांमध्ये साम्य आढळल्याचे शोधून काढले. ती रचना तीन असमान प्रथिनवर्गीय रेणूंची शृंखला असते असे त्यांनी आढळून आले.
ब्रायन कोबिल्का आणि रॉबर्ट लेफ्कोवित्झ हे दोघेही अमेरिकन नागरिक वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर असून या दोघांना त्यांचा जी-प्रोटीन कपल्ड रिसेप्टर या संशोधनासाठी २०१२ सालचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला.
कोबिल्का हे सध्या स्टॅनफर्ड विद्यापीठात प्रोफेसर आहेत. १९९४ साली त्यांना अमेरिकन सोसायटी फॉर फार्माकॉलॉजी अँड एक्स्परिमेंट थेराप्युटिक्स-जॉन आबेल सन्मान मिळाला आहे. सायंस या जगातील अव्वल दर्जाच्या वैज्ञानिक नियतकालिकाने त्यांच्या जी प्रोटीन कपल्ड रिसेप्टर संशोधनाचा २००७ सालचा ब्रेक थ्रू रिसर्च म्हणून गौरव केला होता.
संदर्भ :
- लचके, अनिल – मराठी विज्ञान परिषदेचे मासिक ‘पत्रिका’ अंक, डिसेंबर २०१२.
- https://www.nobelprize.org/nobel_prizes/chemistry/laureates/2012/kobilka-bio.html
समीक्षक : श्रीराम मनोहर