असोसिएशन फॉर रिसर्च इन होमिओपॅथी (ए.आर.एच.) : ( स्थापना – १९८६ )

होमिओपॅथीचा एल. सी. इ. एच. (L.C.E.H.) हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले डॉ. श्रीराम शंकर आपटे यांनी इन्स्टिटयूट ऑफ क्लिनिकल रीसर्च या संस्थेत काही काळ काम केल्यावर १९८६ साली असोसिएशन फॉर रिसर्च इन होमिओपॅथी (ए.आर.एच.) ही संस्था स्थापन केली. सध्या संस्थेचे कार्य नव्या मुंबईतील ऐरोली येथील वास्तूमध्ये जोमात चालू आहे.

संशोधनाचा कार्यक्रम व दिशा ठरविण्यासाठी आय. आय. टी. (मुंबई), बी. ए. आर. सी. मुंबई) या मधील तसेच इतर काही शास्त्रज्ञांच्या सहयोगाने संस्थेने आपटे यांच्या पुढाकाराने सायंटिफिक बेसिस ऑफ होमिओपॅथी  हे पुस्तक १९९० साली प्रकाशित केले.

कोणत्याही औषध पद्धतीत रुग्णनोंदीवर आधारित संशोधन (Clinical Research) महत्त्वाचे असते. सन १९९० ते १९९८ या काळात आपटे यांनी संधिवाताच्या रुग्णांवरील होमिओपॅथीच्या उपाययोजनेच्या परिणामांसंबंधी संशोधन करुन इंडियन हॅमॅटॉलॉजी असोसिएशन या राष्ट्रीय स्तरावरीत संघटनेसमोर तीन शोधनिबंध सादर केले. प्रसिद्ध संधिरोगतज्ज्ञ व्ही. आर. जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना या कामामध्ये लाभले. क्लिनिकल रिसर्चमधील सर्वमान्य अशी डबल ब्लाईन्ड क्लिनिकल ट्रायल (ज्यामध्ये डॉक्टर व रुग्ण या दोघांनाही देण्यात येणारे द्रव्य हे औषध – रोजच्या आहारातील साधे द्रव्य प्लासिबो (Placebo) आहे हे माहिती नसते व अशा प्रकारे तुलनात्मक अभ्यास केला जातो) ही पद्धती होमिओपॅथिच्या औषधांच्या बाबतीत उपयुक्त नसते याचे कारण होमिओपॅथीची औषध योजना व्यक्तिसापेक्ष असते. तसेच एकाच रुग्णात रोगाच्या वेगवेगळ्या अवस्थेप्रमाणे औषधात बदल करावा लागतो. त्यामुळे संस्थेने आता आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षणात्मक अभ्यास (Observational Study) म्हणजे विशिष्ट कालावधीत विशिष्ट रोगाच्या आलेल्या सर्व रुग्णांचा अभ्यास या प्रकारचे संशोधन करण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारे केलेल्या अभ्यासातून होमिओपॅथी ही पुराव्यावर आधारित उपचार पद्धती आहे असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांपुढे मांडता येईल असा संस्थेचा मानस आहे.

होमिओपॅथिमधील एक वादग्रस्त विषय म्हणजे औषधाची मात्रा. ही औषधे एवढया सूक्ष्म प्रमाणात दिली जातात की, प्रचलित पृथ:करण पद्धतीने त्यामध्ये औषधाचा अंशच दिसत नाही. २०१० साली प्रा. जयेश बेलारे (आय. आय. टी., मुंबई) यांचा होमिओपॅथिच्या औषधांसंबंधी लेख एका प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. त्यामध्ये त्यांनी होमिओपॅथिमधील काही औषधांमध्ये नॅनो कणांच्या स्वरुपात औषध आढळते असे सिद्ध केले. प्रा. बेलारे यांच्या सहकार्याने क्लिनिकल रिसर्च व मूलभूत संशोधन यांची सांगड घालण्याचे काम संस्थेतर्फे चालू आहे.

त्याचप्रमाणे  साधना साठये (आय. सी. टी., मुंबई) यांनी यकृतामध्ये अतीमद्यपानामुळे येणाऱ्या सूजेसाठी होमिओपॅथिक औषधांचा काय परिणाम होतो अशा प्रकारचे प्रयोग उंदरांवर केले. त्यासंबंधीचा शोधनिबंध एका फार्माकॉलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला.यापुढची पायरी म्हणजे होमिओपॅथिक औषधांचा परिणाम पेशीस्तरावर तपासणे. त्यासंबंधीचे प्रयोग रमेश भोंडे यांनी बंगलोर येथील मणिपाल विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत केले. तसेच पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील सविता दातार यांनी कोंबडीच्या अंडयातील गर्भावर (Chick Embryo) प्रयोग करुन त्यामध्ये होणारा रक्तस्त्राव व त्यावर होमिओपॅथिक औषधांचा होणारा परिणाम या संबंधीचा शोधनिबंध संस्थेच्या संशोधन विषयक वार्षिक सभेमध्ये सादर केला. असोसिएशन फॉर रिसर्च इन होमिओपॅथीच्या सहकार्याने झालेल्या वरील दोन्ही प्रयोगासंबंधीचे शोधनिबंध प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.

थोडक्यात, होमिओपॅथिक औषधांमधील भौतिक पदार्थ, त्यांचे पेशींवर व प्राण्यांवर होणारे परिणाम तसेच रोगोपचारांमध्ये दिसणारे परिणाम अशा वेगवेगळया स्तरांवर संस्थेचे संशोधन आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. त्यासाठी संस्थेने व्यवस्थापनामध्ये एक महत्त्वाचा बदल केला आहे. संस्थेमध्ये काम करणारे डॉक्टर्स हे रुग्णविषयक अभ्यासाबरोबर संशोधनविषयक कामातही सहभागी असतील.

ग्रामीण भागातील लोकांसाठी आरोग्यातून समृद्धीकडे असा एक सर्वांगीण प्रकल्प कोकण भागात संस्थेने कार्यान्वित केला आहे. त्याला जोडून वनस्पतींना होणाऱ्या रोगात होमिओपॅथिक औषधांचा परिणाम तपासण्यासंबंधीचे संशोधनही सुरू आहे. या नव्या प्रकल्पासाठी आपटे यांनी आपला मुक्काम गेल्या २-३ वर्षापासून कोकणात हलवला आहे.

समीक्षक : स्वाती भागवत